मॉस्कोत आहात की पुण्यात ?
यशवंतराव रशियाच्या दौ-यावर गेले असताना त्यावेळी मॉस्को शहरात राहणा-या व मूळचे पुण्याचे असलेल्या नरेंद्र सिंदकरांनी साहेबांना आपल्या घरी जेवायला बोलावले. खरं तर त्यादिवशी रशियातील भारताचे राजदूत श्री. शेलवणकर यांनी साहेबांच्या सन्मानार्थ भोजन समारंभ आयोजित केलेला होता, पण तो रद्द करायला लावून साहेब शेलवणकरांना घेऊन सिंदकरांच्या घरी जेवायला गेले. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर सर्वजण जेवणासाठी डायनिंग टेबलाजवळ आले. टेबलांच्या दोन्ही बाजूंना खुर्च्यांच्या दोन रांगा होत्या. मध्यभागी एक खुर्ची खास साहेबांसाठी ठेवली होती. सिंदकरांनी साहेबांना त्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्यांच्या उजव्या हाताला पहिल्या खुर्चीवर राजदूत शेलवणकर बसले व डाव्या हाताला स्वत: सिंदकर बसले. साहेबांनी टेबलावरील पदार्थांकडे नजर टाकली व म्हणाले , ' अरे व्वा ! चिकन आणि श्रीखंड ? चैन आहे. पण मिसेस सिंदकर कुठयंत ?'
त्यावर आतून बाहेर येत सलूताई म्हणाल्या, ' साहेब, आपण सुरुवात करा. मी नंतर बसेन.'
साहेब लटक्या रागाने म्हणाले, ' मिसेस सिंदकर, मॉस्कोत आहात की पुण्यात ? सगळ्यांच्या नंतर बायकांनी बसयाचं, ही पद्धत इथे तरी सोडा की. या , बसा माझ्या शेजारी. ' मग शेजारी बसलेल्या नरेंद्र सिंदकरांना साहेब म्हणाले, ' सिंदकर, तुम्ही उठा. लेडीज फर्स्ट . बायकोला असंच वागवता वाटतं ! मॉस्कोत येऊन काही सुधारलेले दिसत नाही ! ' नंतर सलूताई साहेबांच्या शेजारी जेवायला बसल्या. गप्पा मारत छान जेवण झाले ; साहेब म्हणाले,' कराडहून जेवण आणल्यासारखं वाटतंय. छान झालंय. सिंदकर, तुम्हाला पोटाची काळजी नाही. एवढी सुगरण बायको मिळाल्यावर दोन घास जास्तच खात असाल.'
अशा अनौपचारिक गप्पांमधून साहेबांमधील कुटुंबवत्सलता व स्त्रियांविषयीचा सहृदयतेचा दृष्टिकोन दिसून येतो.