कथारुप यशवंतराव-भायेरील भानगडीचो मंत्री !

भायेरील भानगडीचो मंत्री  !

केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव एकदा रशियाच्या दौ-यावर गेले होते. मॉस्को शहरातील एका आलिशन हॉटेलात त्यांचा मुक्काम होता. त्यावेळी पुण्याचे नरेंद्र सिंदकर मॉस्कोत रहात होते. यशवंतरावांनी आपल्या घरी जेवायला यावं अशी त्यांची इच्छा होती.  त्यांनी फोन करुन साहेबांना जेवणाचे निमंत्रण दिले. साहेब म्हणाले, ' खरं तर आज रशियातील भारताचे राजदूत शेलवणकर यांनी आम्हा सर्वांसाठी भोजन समारंभ आयोजित केला आहे. पण मला तुमच्याकडे यायला आवडेल. फक्त एक करा, तुम्ही राजदूत शेलवणकरांनाही तुमच्याकडे भोजनाचे निमंत्रण द्या.' त्याप्रमाणे दुपारी साहेब लवाजाम्यासह सिंदकरांच्या घरी गेले. दिवाणखान्यात सोफ्यावर बसल्यावर साहेब सिंदकरांच्या पत्नीला - सलूताईंना म्हणाले ' काय मिसेस सिंदकर ? कसं काय वाटतं मॉस्को ?'

' छान वाटतंय. आता सवय झाली. '

' तुम्हाला रशियन भाषा येते की नाही ?' साहेबांनी हसून विचारले.

' येतं की, पण कामापुरतं. शॉपिंग मलाच करावं लागतं.'

' सिंदकर, तुम्ही मदत करता की नाही शॉपिंग करायला ?'

नंतर मग साहेबांनी सलूताईंची रशियन भाषेची परीक्षा घेतली. त्यांनी विचारलं,

' कोबीला रशियनमध्ये काय म्हणतात ?'

' का पुस्ता '

' म्हणजे ' का विचारता ' या अर्थाने नाही ना ?' सगळे हसू लागले. साहेब म्हणाले, ' आपल्याला हसू येतंय, पण भाषेतील शब्द चमत्कारिक असतात. मी परराष्ट्रमंत्री असताना एका कार्यक्रमासाठी गोव्याला गेलो होतो. तेव्हा ओळख करून देणारा वक्ता म्हणाला, ' हे मिस्टर वाय. बी. चव्हाण, भायेरील भानगडीचो मंत्री.' मी दचकलोच , पण नंतर समजले की ' मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स ' चे ते कोकणी भाषांतर होते '

असे हलके फुलके किस्से सांगून साहेबांनी ती दुपार अविस्मरणीय बनविली.