या पैश्यांचं काय करू ?
यशवंतराव केंद्रात मंत्री होते तेव्हाची गोष्ट. एकदा ते मराठवाड्याच्या दौ-यावर आले होते. संत एकनाथांच्या पैठण जवळून निघाले होते. रस्त्याच्या एका बाजूला दहा - बारा घरांची छोटी वस्ती होती. रस्त्यावर आठ - दहा माणसे उभी होती. काही तरुण तर काही वयोवृद्ध लोक गाडीकडे पहात उभे होते. यशवंतरावांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. गाडी गर्दीजवळ जाऊन थांबली. ' मंडळी का थांबला आहात ?' यशवंतरावांनी विचारले. गर्दीतून दोन म्हातारी माणसे पुढे आली. त्यांनी विचारले, ' चव्हाण साहेबांची गाडी हीच काय ?'
यशवंतरावांना वाटले लोकांना तक्रार किंवा निवेदन द्यायचे असेल. ते गाडीतून खाली उतरले. त्यांना म्हणाले, ' हो, मीच यशवंतराव चव्हाण. बोला काय अडचण आहे ?' ' अडचण काही नाही ' असे म्हणून एका वृद्धाने हातातल्या पिशवीतून एक रुपयांच्या नोटांचा हार बाहेर काढला आणि त्यांच्या गळ्यात घातला. भोवती उभे असलेली लोकांनी नकळत टाळ्या वाजवल्या. या अनेपेक्षित व अकृत्रिम स्वागताने यशवंतराव भारावले. ते म्हणाले, ' बाबा, या पैश्यांचं मी काय करू ?'
' तुला खाऊ घे. तुझ्यासारखा पुत्र व्हावा अशी खूप इच्छा होती. म्हणून तुला खाऊला हे पैसे आणले आहेत. सुखी रहा ' असे म्हणून त्या वृद्धाने यशवंतरावांच्या पाठीवर हात ठेवला. यशवंतरावांनी वाकून नमस्कार केला. प्रेमाने त्यांना आलिंगन दिले व गाडीत जाऊन बसले. सर्वांनी हात वर करून त्यांना निरोप दिला. गाडी निघाली. यशवंतरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. पण आज त्यांना वडिलांची भेट झाल्यासारखे वाटले.