तुमच्या सूचना काय आहेत ?
सन १९७० ची गोष्ट. यशवंतराव तेव्हा केंद्रात अर्थमंत्री होते. त्यांचे स्वीय सहाय्यक श्री. डोंगरे यांची कन्या ज्योत्स्ना हिचा विवाहसोहळा मुंबईत होता. लग्नाच्या आदल्या दिवशी खास निमंत्रितांची एक पंगत झाली. त्यामध्ये यशवंतराव, शरद पवार, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक गोविंद तळवलकर , नरूभाऊ लिमये आणि पाच सहा इतर निवडक मंडळी होती. अॅड. ग. नी. जोगळेकर हे डोंगरे यांचे मेहुणे, अर्थातच तेही पंगतीला उपस्थित होते. डोंगरे घरातील पाहुण्यांची यशवंतरावांना ओळख करून देत होते. अॅड. जोगळेकरांची ओळख करून देताना ते यशवंतरावांना म्हणाले, ' हे माझे मेहुणे, पुण्यातच इन्कमटॅक्स कन्सल्टंट ( कर सल्लागार ) आहेत.' साहेबांनी लगेच जोगळेकरांना विचारले, ' आमच्या खात्याबद्दल तुमच्या काय सूचना आहेत ?'
जोगळेकर स्पष्टवक्ते होते. ते परखडपणे म्हणाले, ' करदात्याला तुमचे खाते शत्रू समजते. एखाद्याची संपत्ती चार लाख असेल तर त्याला दीड दोन हजार रुपये वेल्थ टॅक्स ( संपत्ती कर ) भरावा लागतो. पण रिटर्न भरायला उशीर झाला तर दर महिन्याला एकूण संपत्तीच्या दोन टक्के म्हणजे आठ हजार रुपये दंड करतात. नगरपालिका दरवर्षी व्हीलटॅक्स म्हणून एकशेवीस रुपये घेते. पण तो भरायला उशीर झाला तर मोटारीच्या किंमतीवर दरमहा दोन टक्के दंड आकारते. त्यातलाच हा प्रकार झाला. ' हे ऐकून सारेजण माफक हसले.
यशवंतराव मात्र गंभीरपणे म्हणाले, ' तुमचे म्हणणे लिहून पाठवा, म्हणजे चौकशी समितीला देतो. ' हा विषय तिथेच संपला. पण आश्चर्य म्हणजे त्यानंतर काही दिवसातच कायद्यात बदल करून ही जाचक तरतूद रद्द केली गेली. प्रत्येक माणसाकडून नवे काही शिकण्याची, त्यानुसार धोरणात योग्य तो बदल करण्याची यशवंतरावांची ही नीती, आदर्श प्रशासक कसा असावा हेच सांगून जाते.