कथारुप यशवंतराव-सर्व काही दिल्या घेतल्याचे नसते !

सर्व काही दिल्या घेतल्याचे नसते  !

' नवाकाळ ' दैनिकाचे संपादक निळकंठ खाडिलकर हे अग्रलेखांचे बादशहा म्हणून प्रसिद्ध आहेत. १९७० च्या सुमाराची गोष्ट. त्याकाळी एक उमदे व निर्भीड पत्रकार म्हणून खाडीलकरांची ख्याती होती. यशवंतरावांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. साहेब आपल्याला एवढे प्रेमाने का वागवतात हे खाडीलकरांना समजत नसे. ते तर सातत्याने सरकार आणि काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवित होते, पण यशवंतराव त्यांना खूप मायेने वागवत. एकदा साहेब एकटे बसलेले असताना खाडीलकर त्यांच्या जवळ गेले व म्हणाले, ' साहेब , एक गोष्ट विचारू का ?' साहेब हसून म्हणाले, ' विचार ना. अरे तू मला केव्हाही आणि काहीही विचारायला हरकत नाही.'

' साहेब, मला एक कुतुहल आहे. ' नवाकाळ ' चा खप तो किती ? पंचवीस हजारही नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात. तरीसुद्धा तुम्ही मला इतक्या आपुलकीने का वागवता ?
मोठमोठ्या खपाच्या वृत्तपत्रातील बातमीदारांनाही तुमची अशी आपुलकी लाभत नाही.'

साहेब हसू लागले. आपले काहीतरी चुकले असे वाटून खाडिलकर म्हणाले, ' माझा तुम्हाला काही उपयोग नाही हेही मला समजते. हे जग आणि त्यातही राजकारण, हे दिल्याघेतल्याचे असते. मग माझ्याकडे देण्यासारखे काही नसताना तुम्ही मला इतक्या प्रेमाने का वागवता ? पण मला फार आधार वाटतो तुमच्या आपलुकीचा.... ! नाहीतर कोण विचारतो खप नसताना ?'
साहेब गंभीर होऊन म्हणाले, ' हे बघ , सर्वकाही दिल्याघेतल्याचे नसते. मी काही कुटुंबे आणि काही व्यक्ती मनाने निवडल्या आहेत. मी त्यांना खास आपुलकीनं वागवत असतो. जणू महाराष्ट्राने त्यांची जबाबदारीच माझ्यावर सोपविली आहे.'

चकित होऊन खाडिलकर म्हणाले, ' म्हणजे आपले आमच्याशी असलेले संबंध आपुलकीचे आहेत ?'

' हो , हे संबंध आपुलकीचे आहेत, पण ते आपोआप निर्माण झाले नाहीत. मी ते जाणीवपूर्वक जोपासले आहेत.