कथारुप यशवंतराव-नव्या पिढीला संधी दिली पाहिजे !

नव्या पिढीला संधी दिली पाहिजे  !

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यभर फिरून यशवंतरावांनी पक्ष व सरकार यांच्याविषयी जनतेत विश्वास निर्माण केला. राज्याच्या कानाकोप-यात कार्यकर्त्यांचे जाळे विणले. हे करताना नवे कार्यकर्ते घडविण्याचे त्यांचे काम सुरूच होते. १९६६ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा विरोध असतानासुद्धा त्यांनी शरद पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि विशेष म्हणजे त्यावेळी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी शरद पवार विजयी झाले. त्यानंतर १९७२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळाची यादी तयार करून ती काँग्रेस अध्यक्षांना सादर करून तिला मान्यता घेतली. त्या यादीत शरद पवार यांचे नाव नव्हते व त्यांची तशी अपेक्षाही नव्हती. पण दिल्लीमध्ये जेव्हा वसंतरावांनी इंदिराजींकडून मान्यता घेतलेली यादी यशवंतरावांना दाखवली तेव्हा शरद पवार यांचे नाव न दिसताच यशवंतरावांनी फोनवरून इंदिराजींशी संपर्क साधला व ' नव्या पिढीला संधी देण्यासाठी शरदचं नाव यादीत असलं पाहिजे ' असं सांगितलं. त्या सूचनेला इंदिराजींनी मान्यता दिली व मग गृह व सामान्य प्रशासन या मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

अशाप्रकारे पवार साहेबांना प्रथम आमदार व नंतर मंत्रीपद मिळण्यामध्ये यशवंतरावांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी दाखविलेला विश्वास शरदरावांनी नंतरच्या काळात सार्थ ठरवला व यशवंतरावांची निवड किती अचूक होती हे दाखवून दिले.