आपण खास मोहिमेवर जात आहोत !
यशवंतराव हे श्रेष्ठ दर्जाचे रसिक होते. त्यांची रसिकता कृत्रिम नव्हती, तर तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग होता. एखाद्या नवीन चांगल्या पुस्तकाविषयी ऐकले की यशवंतराव ते पुस्तक आवर्जून खरेदी करायचे. नवीन आणि कलात्मक चित्रपट ते आवर्जून पहायचे.
संरक्षणमंत्री असताना यशवंतराव एकदा पुण्याला आले होते. विनायकदादा पाटील यांना सोबत घेऊन यशवंतराव त्यांचे स्नेही माधवराव आपटे यांच्याकडे गेले. बोलता बोलता माधवरावांनी रिगल चित्रपट गृहात सुरू असलेल्या एका इंग्रजी चित्रपटाचा उल्लेख केला आणि यशवंतरावांनी तो चित्रपट आवर्जून पहावा असे सुचवले. पण देशाचे संरक्षणमंत्री एका साध्या नागरिकाप्रमाणे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा कसा पाहणार ? सुरक्षा व्यवस्था व लोकांच्या गर्दीमुळे अनेकदा इच्छा असूनही ते शक्य नसते. पण यशवंतरावांना ही संधी दवडायची नव्हती. शिवाय त्या दिवशी ते जरा निवांतही होते. त्यांनी कुणालाही न सांगता दुपारच्या तीनच्या खेळाची दोन तिकीटे मागवली. पावणेतीन वाजता ते विनायकदादांना म्हणाले, ' विनायकराव, आपण एका खास मोहिमेवर जात आहोत !'
सुरक्षा अधिकारी व अन्य कुणालाही न सांगता चित्रपट सुरू झाल्यानंतर अंधारात ते दोघे चित्रपटगृहात जाऊन बसले. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून यशवंतरावांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवली होती. दोघांनी चित्रपटाचा आनंद घेतला, पण चित्रपट संपल्यावर लोकांच्या लक्षात आले की यशवंतराव आले आहेत. मग साहजिकच लोकांची गर्दी झाली. देशाचे संरक्षण करणारा माणूस, कोणतेही संरक्षण न घेता सामान्य नागरिकाप्रमाणे थिएटरमध्ये येऊन चित्रपटाचा आस्वाद घेतो याचे लोकांना कौतुक वाटले.