भीमसेनचं गाणं ही जाता जाता ऐकण्याची गोष्ट नाही !
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे आणि यशवंतरावांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यशवंतराव त्यांच्या गायनाचे चाहते होते. पंडितजींचा पहाडी आवाज आणि यशवंतरावाचे पहाडी नेतृत्व यांचे कुठेतरी सूर जुळले होते. महाराष्ट्रातून दिल्लीला गेल्यानंतरही यशवंतराव वेळ मिळेल तेव्हा आणि प्रसंगी वेळ काढून पंडितजींचे गाणे ऐकत असत.
एकदा पंडितजी दिल्लीला गेले होते, त्यांनी यशवंतरावांना फोन करून विचारले, ' काय करताय ?'
' कामं चालली आहेत.'
' गाणं ऐकायचं का ?'
या प्रश्नाचं नेहमीच ' हो ' असं उत्तर देणारे साहेब यावेळी मात्र म्हणाले, ' नको, आज वेळ नाही. भीमसेनचे गाणे ही जाता जाता ऐकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी किमान तीन - चार तासांची सवड हवी.'
एकप्रकारे पंडितजींच्या गायनाला दिलेली ती दादच होती. त्यावेळी पंडितजींच्या गायनाची मैफील झाली नाही. त्यानंतर काही वर्षे निघून गेली आणि १ जून १९८३ रोजी वेणूताई यशवंतरावांना सोडून गेल्या. त्यांच्या मृत्यूने पुरते खचलेल्या यशवंतरावांनी त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी कराडला पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला. ' विरंगुळ्या ' वर भरलेल्या मैफिलीत पं. भीमसेन जोशी संतवाणी गात होते, तर यशवंतराव समोर बसून उदास मनाच्या सुन्या सुन्या मैफिलीत वेणूताईंचे गीत गात होते.