कथारुप यशवंतराव-माझ्या घरी चहाला याल का ?

माझ्या घरी चहाला याल का ?   

यशवंतराव कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे विद्यार्थी होते. आपल्या गुरुजनांविषयी त्यांच्या मनात अपार कृतज्ञता होती. राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना प्रोफेसर डॉ. बोस हे त्यांना इंग्रजी शिकवत असत. बी. ए. च्या वर्गात असताना डॉ. बोस यांनी शिकविलेल्या इंग्रजी कविता यशवंतरावांच्या आयुष्यभर लक्षात राहिल्या. डॉ. बोस यांच्यामुळे त्यांना इंग्रजी साहित्याची गोडी निर्माण झाली. डॉ. बोस यांची शिकविण्याची शैली वैशिष्ट्यपूर्ण होती.

पुढे १९६२ मध्ये यशवंतराव संरक्षणमंत्री झाले. दिल्लीमध्ये त्यांचे वास्तव्य असताना डॉ. बोस हे देखील सध्या दिल्लीमध्ये राहतात असे त्यांना कोणीतरी सांगितले. आपल्या या थोर गुरूची भेट घ्यावी असे यशवंतरावांना वाटले. त्यांनी डॉ. बोस यांना फोन केला व म्हणाले, ' सर, मी तुमचा राजाराम कॉलेजचा विद्यार्थी आहे. तुम्ही माझ्या घरी चहाला याल का ?'

आपल्या एका माजी विद्यार्थ्याने व देशाच्या विद्यमान संरक्षणमंत्र्याने अगत्याने दिलेले निमंत्रण डॉ. बोस यांनी आनंदाने स्वीकारले. ते आणि त्यांचा मुलगा ( जो दिल्ली युनिव्हर्सिटीत प्राध्यापक होता ) यशवंतरावांच्या घरी आले. चहा घेतला, गप्पा मारल्या. कोल्हापुरातील आठवणींना उजाळा दिला व निघून गेले. आपल्या आवडत्या शिक्षकाची भेट घडल्यामुळे यशवंतरावांनाही आनंद झाला. आपल्या गुरुजनांविषयी यशवंतरावांच्या मनात अपार श्रद्धा होती आणि जेव्हा संधी मिळत असे तेव्हा तेव्हा ते ही कृतज्ञता व्यक्त करीत असत.