बेडीमित्र !
तरुण यशवंतरावांनी १९४२ च्या ' छोडो भारत ' चळवळीत भाग घेतला. इंग्रज सरकारने त्यांना राजकैदी बनवून तुरूंगात टाकले. या काळात कोल्हापूरच्या बळवंतराव माने व कराडच्या यशवंतराव चव्हाणांना काही दिवस एकाच बेडीत जोडकैदी म्हणून राहण्याचा प्रसंग आला. दोघांची मैत्री जुळली. पुढे तुरुंगातून सुटल्यानंतर दोघांच्या वाटा वेगळया झाल्या. स्वातंत्र्यानंतर बळवंतराव माने संस्थानांच्या विलीनीकरणाच्या चळवळीत उतरले. धडाडीने काम करू लागले. लोक त्यांना ' वीर माने ' म्हणू लागले. कोल्हापूर संस्थानात त्यांचा दबदबा होता. पण संस्थानांच्या विलीनीकरणानंतर त्यांचे दिवस बदलले. अत्यंत मौनी व अबोल स्वभावामुळे त्यांनी कधीच कोणाकडे स्वत:साठी काही मागितले नाही. शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यात मुकादम म्हणून नोकरी स्वीकारावी लागली. यशवंतराव सक्रीय राजकारणात उतरले. मंत्री, मुख्यमंत्री व नंतर देशाचे संरक्षणमंत्रीही झाले. संरक्षणमंत्री असताना एकदा यशवंतराव कोल्हापूर भागात दौ-यावर आले होते. मागे पुढे पोलीसांच्या गाड्या व मध्ये साहेबांची गाडी असा त्यांचा ताफा चालला होता. ज्या रस्त्याने त्यांच्या गाड्या चालल्या होत्या, त्याच रस्त्यावर योगायोगाने वीर माने यांची ड्युटी होती. पुढे चाललेली पोलीसांची गाडी भरधाव निघून गेली. वीर माने रस्त्याच्या कडेला उभे राहून गाड्या निघून जाण्याची वाट पहात होते. यशवंतरावांची गाडीही पुढे निघून गेली, मात्र पन्नासेक मीटर अंतरावर जाऊन ती थांबली . यशवंतराव आपल्या सचिवांना; श्रीपाद डोंगरे यांना म्हणाले, ' वीर माने दिसतात बहुतेक, गाडी मागे घ्या.'
त्या निर्जन रस्त्यावर संरक्षणमंत्र्यांची गाडी परतून आली. गाडीचा दरवाजा स्वत:च उघडून यशवंतराव झपाझपा चालत रस्त्याच्या कडेला गेले. वीर मानेंना कडकडून भेटले. बेचाळीसच्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी जागवल्या. वीर मानेंची आपुलकीने चौकशी केली. दोघांनाही आनंद झाला आणि काही वेळाने दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. जवळपास २२ वर्षांनी भेटूनही यशवंतरावांनी आपल्याला कसे ओळखले याचे वीर मानेंना नवल वाटले.