कथारुप यशवंतराव-माझा तुमच्यावर विश्वास आहे !

माझा तुमच्यावर विश्वास आहे !  
  
यशवंतराव केंद्रात संरक्षणमंत्री असताना एकदा सरकारी कामानिमित्त हेलिकॉप्टरने गंगोत्रीला गेले होते. हिमालय पर्वतरांगांमधील द-यांमधून हेलिकॉप्टर निघाले होते. पाऊस पडत होता. अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर काही अंतरावर काळे ढग दिसू लागले. पायलटने आपल्या शेजारील सहका-यास विचारले, ' पुढे काही दिसतेय का ?' सहका-याने ' नाही ' म्हणून सांगितल्यावर लगेचच पायलटने हेलिकॉप्टर मागे वळवले. शेजारी यशवंतराव बसले होते. हेलिकॉप्टर माघारी फिरले आहे याची त्यांना कल्पना आली. पण का वळले ते लक्षात आले नाही. त्यांनी शेजारच्या पायलटला कारण तर विचारले नाहीच, पण त्याच्याकडे बघितलेसुद्धा नाही. यशवंतराव आपणास परत का फिरला असे विचारतील म्हणून पायलट त्यांच्याकडे पहात होता. पण यशवंतराव मात्र समोर पहात होते. काही वेळाने एका शाळेच्या पटांगणावर पायलटने हेलिकॉप्टर उतरवले तेव्हासुद्धा यशवंतरावांनी काही विचारले नाही. शेवटी पायलटच म्हणाला, ' सर , पुढे खराब हवा असण्याची शक्यता होती. ढगातून प्रवास करणे जोखमीचे होते म्हणून परत आलो. ' यशवंतराव म्हणाले, ' हेलिकॉप्टरच्या संबंधीचे तुमचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे आणि माझ्यापेक्षा तुमची जबाबदारी मोठी आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही योग्य तोच निर्णय घ्याल अशी मला खात्री होती, म्हणून मी बोललो नाही.'

गेल्या काही वर्षांत हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होण्याच्या अनेक घटना घडल्या. याला पायलटच्या चुकांबरोबरच नेत्यांची घाई आणि अनावश्यक सल्लेही जबाबदार होते. या पार्श्वभूमीवर यशवंतरावांचा संयम आणि विवेक अनुकरणीय आहे.