लोक वाट पहात असतील !
यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंचायत राज विधेयक मंजूर करून घेतले आणि महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची निर्मिती झाली. मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार करीत असताना सुद्धा त्यांचे स्वत:च्या मतदारसंघाकडे बारीक लक्ष असे. आठवड्यातून एकदा तरी ते सातारा जिल्ह्याच्या भेटीवर यायचे. शनिवारी आणि रविवारी असा त्यांचा दौरा असायचा. सर्कीट हाऊसवर मुक्काम करायचा आणि दिवसभर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरायचे असा त्यांचा कार्यक्रम असे. त्यांच्याबरोबर पुण्याचे आयुक्त व सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राजगोपाल असत. दिवसभरात पाच - सहा खेड्यांचा दौरा असे. हजारो कार्यकर्ते भेटत. निवेदने देत. सामान्य लोक आपले गा-हाणे मांडत. यशवंतराव स्वत: अधिका-यांशी बोलून कामाबाबत आदेश देत. एकदा एका खेड्यात यशवंतरावांचा कार्यक्रम होता. यशवंतराव वेळेवर तयार झाले पण त्या गावचे कार्यकर्तेच आले नव्हते. राजगोपाल जीप घेऊन तयार होते. यशवंतराव गाडीत बसले. राजगोपालना म्हणाले, ' कुणाची वाट बघता ? चला.'
राजगोपाल म्हणाले, ' कार्यकर्त्यांची वाट बघतोय .'
त्यावर यशवंतराव म्हणाले ,' चला निघूया. ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांनी अगोदर यायला नको का ? आता थांबायला नको. लोक वाट पहात असतील.'
वेळेच्या व कामाच्या बाबतीत यशवंतराव फार काटेकोर होते.