मला निष्पक्षपाती चौकशी हवी आहे !
१२ जुलै १९६१ रोजी पुण्याजवळचे पानशेत धरण फुटले आणि पुणे शहर जलमय झाले. या महापुरामुळे शहरातील स्थावर मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले. यशवंतराव तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. लोकांना धीर दिला, अनेकांचे पुनर्वसन केले.
या आपत्तीसाठी विरोधी पक्षांनी सरकारलाच जबाबदार धरले व धरणफुटीची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला. या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करावी हा महत्त्वाचा प्रश्न होता. यशवंतरावांना न्या.गजेंद्रगडकरांची आठवण झाली. न्या. गजेंद्रगडकर हे तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, म्हणून अर्थातच ते हे पद स्वीकारू शकत नव्हते. एके रात्री यशवंतरावांनी न्या. गजेंद्रगडकर यांना फोन केला व चौकशी समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव सुचविण्याची विनंती केली. न्या. गजेंद्रगडकर आणि यशवंतराव यांचे मैत्रीचे संबंध असले तरी ते निर्भिड आणि स्पष्टवक्ते होते. त्यांनी यशवंतरावांना फोनवरच विचारले, ' तुम्हाला शासनाला अनुकूल अहवाल देणारी समिती पाहिजे की खरोखरच त्या दुर्घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल देणारी समिती पाहिजे ? कारण मग अशा समितीचा अहवाल कदाचित शासनाला दोषी ठरविणाराही असू शकतो.'
यावर यशवंतराव तात्काळ म्हणाले,' मला या आपत्तीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणारी समिती हवी आहे.'
' तसं असेल तर न्या. बावडेकर या कामासाठी योग्य व्यक्ती आहेत.' न्या. गजेंद्रगडकरांनी सुचविलेले हे नाव ऐकून यशवंतरावांना आनंद झाला. ते म्हणाले, ' माझ्या नजरेसमोर देखील हेच नाव होते, पण मला तुमचा अभिप्राय हवा होता. धन्यवाद...! '
स्वत: न्या. गजेंद्रगडकर यांनीच ' TO the best of my memories ' या आपल्या आत्मचरित्रात वरील आठवण नोंदवून ठेवली आहे. स्वत:ला म. गांधीजींचा नम्र अनुयायी समजणारे यशवंतराव सत्याला सामोरे जायला कचरले नाहीत.