कॉन्फरन्स चांगली झाली पाहिजे !
यशवंतराव मुख्यमंत्री असताना घडलेला हा प्रसंग . १९६२ साली गंगाधर गाडगीळ व त्यांचे सहकारी ' ऑल इंडिया रायटर्स कॉन्फरन्स ' आयोजित करणार होते. या परिषदेसाठी राज्य सरकार काही मदत करेल का, हे पाहण्यासाठी ते एकदा मंत्रालयात यशवंतरावांना भेटायला गेले. यशवंतरावांनी त्यांना ताबडतोब अपॉईन्टमेंट दिली. गाडगीळांनी दोन मुख्य मागण्या केल्या. पहिली मागणी म्हणजे यशवंतरावांनी स्वागताध्यक्ष बनून उदघाटनासाठी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन किंवा पंतप्रधान पंडित नेहरूंना बोलवावे. दुसरी अपेक्षा अशी होती की, राज्याबाहेरून येणा-या प्रतिनिधींना उतरण्यासाठी आमदार निवास ( एम. एल. ए. होस्टेल ) विनामूल्य उपलब्ध करून द्यावे. यशवंतरावांनी दोन्ही मागण्या तात्काळ मान्य केल्या आणि विचारले , ' खर्चाची व्यवस्था काय केली आहे ?' गाडगीळ म्हणाले, ' आम्ही स्मरणिकेसाठी जाहिराती गोळा करणार आहोत. प्रतिनिधींच्या जेवणाची जबाबदारी काही संस्थांवर सोपवणार आहोत. ' साहेबांनी पुन्हा विचारले, ' तुमच्या कॉन्फरन्सला अंदाजे किती खर्च येईल ?' गाडगीळ म्हणाले, ' साधारण पंचवीस हजार रुपये खर्च येईल, असा माझा अंदाज आहे. ' फक्त पंचवीस हजार ? अहो कॉन्फरन्सला पुष्कळ खर्च येतो. पन्नास - साठ हजार सहज लागतात. ' त्यावर गाडगीळ पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाले ,' माझी पूर्ण खात्री आहे की पंचवीस हजारांपेक्षा अधिक खर्च येणार नाही. ' यावर यशवंतराव म्हणाले, ' असे असेल तर ते पंचवीस हजार मीच देतो. तुम्ही पैसे गोळा करण्याच्या खटपटीत वेळ घालविण्यापेक्षा कॉन्फरन्सच्या नियोजनाकडे लक्ष द्या. कॉन्फरन्स चांगली झाली पाहिजे. ' या अनपेक्षित मदतीने गाडगीळ चकीतच झाले.
चर्चा संपल्यावर जाताना त्यांनी हळूच यशवंतरावांना विचारले , ' या पैशासाठी काही अर्ज वगैरे करायला हवा का ? कोणाला भेटावे लागेल ?' साहेब म्हणाले , ' तुम्ही मला फक्त एक पत्र लिहून द्या. हे पैसे मी मुख्यमंत्री निधीतून देईन म्हणजे उगीच नियम आणि फॉरमॅलिटीजचा त्रास तुम्हाला व्हायला नको. ' त्याप्रमाणे गाडगीळांनी लेखी पत्र लिहून दिले. त्यावेळीही अविश्वासाने त्यांनी विचारले, ' मी पुन्हा कधी येऊ ? पत्राची आठवण करून द्यायला हवी का ? कोणाला भेटू ?' साहेब म्हणाले, ' काही गरज नाही. चेक तुमच्याकडे येईल. ' आणि तसंच झालं. थोड्याच दिवसात गाडगीळांना पंचवीस हजार रुपयांचा चेक मिळाला.