असं कधी बोलू नये !
सन १९६२ सालची गोष्ट. यशवंतराव तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. प्रसिद्ध कथालेखक गंगाधर गाडगीळ ' ऑल इंडिया रायटर्स कॉन्फरन्स ' च्या आयोजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटले. परिषदेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यशवंतरावांनी दिले. उदघाटक म्हणून कोणाला बोलवावं याबद्दल चर्चा चालली होती. यशवंतराव परिषदेचे स्वागताध्यक्ष होते व गाडगीळ निमंत्रक होते.
चर्चेच्या ओघात राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् किंवा पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यापैकी कोणाला तरी बोलवावे असे ठरले. यावर गाडगीळ काहीशा उतावीळपणाने म्हणाले, ' नेहरू मोठे आहेत, पण ते नको बुा, ते चटकन् चिडतात. त्यांना सांभाळणं मला जमायचं नाही. आपण आपले राधाकृष्णनना बोलवूया.'
अशाप्रकारे बोलणं खरंतर अनुचित होतं. त्यामुळे उगीच गैरसमज झाले असते. यशवंतरावांना गाडगीळांचं हे बोलणं आवडलं नाही. ते थोडावेळ त्यांच्याकडे बघतच राहिले आणि मग म्हणाले, ' गाडगीळ , असं ' अमका नको ,' तमका नको' असं कधी बोलू नये. ' अमका हवा ' इतकच म्हणावं. '
साहित्यिकांना सुद्धा शिष्टाचार शिकविण्याइतका यशवंतरावांचा नैतिक अधिकार मोठा होता.