कथारुप यशवंतराव-विकेंद्रीकरण की विघटन ?

विकेंद्रीकरण की विघटन ?

१ मे १९६२ रोजी महाराष्ट्रात पंचायत राज कायदा लागू झाला. हा कायदा करण्यापूर्वी त्याचा स्थूल आराखडा यशवंतरावांनी पंतप्रधान पंडित नेहरूंना सादर केला होता. नेहरूंनी तो कायदा काळजीपूर्वक वाचला होता, पण त्यांची पहिली प्रतिक्रिया अनुकूल नव्हती. त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारले, ' हे डिसेंट्रलायजेशन आहे की डिस्इंटिग्रेशन ?' ( हे विकेंद्रीकरण आहे की विघटन ? ) यशवंतरावांना हे पत्र मिळाल्यावर ते अस्वस्थ झाले. त्यांनी लगेच मंत्रालयातील जिल्हा परिषदांचे सचिव श्री. डी.डी. साठे यांना बोलावले आणि त्यांच्यासमोर पंतप्रधानांचे ते पत्र टाकले. पत्र वाचून झाल्यावर साठे म्हणाले, ' पंडितजींना आपण लगेच पत्र लिहूया. तुम्ही त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट करावी, म्हणजे ब-याच गोष्टींचा उलगडा होईल.'

त्याप्रमाणे पं. नेहरूंना भेटण्यासाठी यशवंतराव दिल्लीला गेले. तेथे त्यांनी सत्तेच्या या व्यापक विकेंद्रीकरणामागील भूमिका स्पष्ट केली. आपलेम्हणणे नेहरूंना पटवून दिले आणि मगच नेहरूंनी यशवंतरावांना हा प्रयोग महाराष्ट्रात करण्यास हिरवा कंदील दाखवला. पुढचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. विकेंद्रीकरणाचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला.

नंतर एकदा १९७१ साली दिल्ली येथे भारतातील सर्व जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांची बैठक झाली त्यावेळी केंद्रीय ग्रामविकासमंत्री एस. के. झा म्हणाले, ' महाराष्ट्राची विकेंद्रीकरणाची पद्धती भारतात सर्वोत्तम आहे.'
यशवंतरावांच्या दूरदृष्टीला मिळालेली ही दाद होती. त्यांनी लावलेल्या रोपट्याला आलेले ते मधुर फळ होते.