चंद्रपूरमध्ये कारखाना काढा !
विख्यात कथाकार प्रा. रंगनाथ पठारे यांनी सांगितलेली ही आठवण. शंकर गुहा नियोगी यांच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी ते छत्तीसगड राज्यात गेले होते. पूर्वी हे राज्य मध्यप्रदेश या राज्याचाच एक भाग होते. मध्यप्रदेश व महाराष्ट्र ही दोन राज्ये एकमेकांच्या सीमेला लागून आहेत. उद्योगधंद्याविषयी चर्चा चालू असताना एक वयोवृद्ध व्यक्ती पठारे सरांना म्हणाली, ' आमच्या लोखंडाच्या खाणीचा दल्ली - राजहरा आणि बाकी बराच भाग तुमच्या चंद्रपूर जिल्ह्याला लागूनच आहे. भिलाईला हा पोलाद कारखाना होण्याच्या कैक आधी तुमचे यशवंतराव चव्हाण नावाचे जे मुख्यमंत्री होते, त्यांनी केंद्र सरकारला चंद्रपूरकडे पोलाद कारखाना काढण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. जमीन, जागा, वीज आणि इतर सगळ्या पायाभूत सुविधा तातडीने पुरविण्याची हमी त्यांनी दिली होती. खाणीतून बाहेर काढलेल्या खनिजांची वाहतूक करण्यासाठी चांगले रस्ते तयार करून देऊ, रेल्वेचं काही काम करण्यात महाराष्ट्राचे सरकार सहभागी होईल, शिवाय वाहतुकीचं अंतरही कमीच आहे ' असं सगळं सांगत या प्रकल्पाचा एक आराखडाच त्यांनी केंद्राकडे सादर केला होता . पण या प्रकल्पाची कुणकुण लागल्यावर आमचे माधोचरण, श्यामाचरण आणि विद्याचरण शुक्ला खडबडून जागे झाले. त्यांनी हा प्रकल्प मध्यप्रदेशात व्हावा यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न केले व शेवटी त्यांना त्यात यशही आले. पोलादाचा हा कारखाना मध्यप्रदेशात सुरू झाला. जर हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर फार मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती.
यशवंतरावांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारा हा प्रसंग दूरदेशी जाऊन ऐकल्यावर पठारे सरांचा ऊर भरून आला.