भजी खाताना दादांची आठवण येते !
सार्वजनिक जीवनात वावरणा-या व्यक्तीला स्वत:च्या कुटुंबासाठी फारसा वेळ देता येत नाही. यशवंतराव तर वयाच्या सतराव्या वर्षापासून सार्वजनिक जीवन जगत होते. वेणूताईंना व कुटुंबियांना त्यांचा सहवास फार कमी लाभायचा. यशवंतरावांनाही या गोष्टीचे वाईट वाटायचे. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा सर्व वेळ ते कुटुंबियांसमवेत घालवायचे.
अशाच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत यशवंतरावांचा मुक्काम महाबळेश्वरला होता. सोबत वेणूताई होत्या. थोरल्या बंधूंची लहान मुलेही यशवंतरावांनी आणली होती. त्या सुट्टीत यशवंतरावांनी राजकीय भेटी पूर्णपणे टाळल्या. कुटुंबातील सर्वांशी गप्पागोष्टी करण्यातच त्यांचा दिवस जायचा. प्रत्येकाची ते आपुलकीने चौकशी करायचे. संध्याकाळी वेणुताईंसमवेत फिरायला जायचे. अशाच एका संध्याकाळी वेणूताई आणि यशवंतराव फिरायला निघाले होते. कुठूनही तळलेल्या भज्यांचा खमंग वास आला. नकळत यशवंतराव उदगारले , ' व्वा ! काय मस्त वास आहे ! ' वेणूताई काहीच बोलल्या नाहीत. काही वेळाने दोघेही बंगल्यावर परत आले. हातपाय धुवून यशवंतराव बंगल्यासमोर खुर्च्या टाकून बसले आणि इतक्यात त्यांच्यासमोर एका ताटात गरम भजी आणली गेली. यशवंतराव कौतुकाने म्हणाले, ' हे वेणूबाईंचेच काम असणार ! .'
वेणूताई स्मितहास्य करीत म्हणाल्या, ' तुम्ही भज्यांची आठवण काढलीत, म्हणून मग त्या हॉटेलमधून मागवून घेतली. '
मग भजी खात खात यशवंतराव सांगू लागले, ' लहानपणी मी शाळेत असताना दादा ( थोरले बंधू ) कोर्टात बेलिफ होते. माझी शाळा सुटली की मी सरळ दादांकडे जायचो. मग दादा मला जिरंग्याच्या हॉटेलमध्ये नेऊन भजी देत असत. मला भजी खायची सवयच लागली होती. त्यामुळे भजी तळतानाचा वास आला की माझ्या तोंडाला पाणी सुटते आणि दादांची आठवण येते.'