मी पुण्यातला मुक्काम हलवला. घोडनदीला म्हणजे शिरूरला गेलो. ओळखपाळख काही नव्हती. वेशांतर केल्याने कुणी ओळखण्याचा प्रश्न नव्हता. बाजारपेठेत एक शिंपी कपडे शिवीत होता. त्याचे पुढून दोन-तीन वेळा पुढेमागे गेलो. त्याने मला जवळ बोलावले. मी खरे काय ते सांगितले. त्याला संतोष झाला. तो म्हणाला, चला माझ्याबरोबर. बोळाबोळातून तो एका घरी मला घेऊन गेला. हे माझे घर तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस राहा. गरिबाघरची मीठ-भाकरी खा. मी चांगला आठ-दहा दिवस राहिलो. फार प्रेमळ कुटुंब होते. पुढे मी मुख्यमंत्री झालो. शिरूरला एका कार्यक्रमाला गेलो होतो. मी माझी सारी आठवण शिरूरच्या सभेत सांगितली. आता ते गृहस्थ कुठे असतील माहीत नाही असे म्हणालो. आणि सभेतून एक हात वर आला. साहेब, हा मी येथे आहे, तो शिंपी म्हणाला. मला खूप आनंद झाला. कार्यक्रम संपल्यावर तो येऊन भेटला. खूप गर्दी होती. या माणसाने मला काहीही मागितले नाही. विचारूनही अडचणी सांगितल्या नाही. साहेब, तुम्ही मंत्री झाला. मला लक्षात ठेवले हेच खूपखूप झाले. असे म्हणून गर्दीतून बाजूला झाला.
आमची गाडी आता शिरूरजवळ आली होती. घोडनदी ओलांडली. हे बाळूताई खरेंचं गाव, बाळूताई खरे म्हणजे आपल्या मालतीबाई बेडेकर.
साहेब, त्या शिंप्याचे पुढे काय झाले ?
हां. मी आणि माझे स्वीय साहाय्यक डोंगरे यांचे असे काही जमले होते की विचारू नका. नुसत्या नजरेवरून डोंगरेंना पुढचे कळत असे. तात्काळ डोंगरेंनी त्यांना गाठले, बोलते केले. त्यांना मॅट्रिक झालेला मुलगा होता. नोकरी नव्हती. घरची गरिबी तशीच होती. डोंगरेंनी खिशातून तीन-चारशे रुपये बाहेर काढले. हातावर ठेवले. मुलांना खाऊ न्या म्हणाले. एका कागदावर मुलाचे नाव शिक्षण लिहून आणले होते. मी तात्काळ नगराध्यक्षांना जवळ बोलावले. त्याच्या हाती तो कागद दिला आणि त्याला सांगितले लगचे जिल्हापरिषदेत जा. अध्यक्षांना भेटा. या मुलाच्या योग्यतेने काम द्या नि मला फोन करून कळवा असे सांगितले. त्या ॠणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न केला.
साहेब, वेणूताईंची तुमची केव्हा भेट झाली ?
नाही, त्यानंतर त्या खूपच आजारी पडल्या. फलटणहून मला निरोप मिळाला. मी भाड्याची टॅक्सी केली. रात्री निघालो व फलटण गाठले. वेणूताईंना फार बरे वाटले. मी आलोय यानेच त्यांचा आजार पळाला असे त्यांना वाटले. डॉ. बर्वे यांनी त्यांची जबाबदारी घेतली. एक रात्र राहून लगेच परतायचे असे ठरवून गेलो होतो. पण दुपारीच फलटणच्या पोलिसांनी घराला गराडा घातला. मला अटक झाली. फलटण संस्थानच्या तुरुंगात टाकले. आई भेटायला आली. मला खूप आनंद झाला. तिचे सांत्वन मी काय करणार होतो. आठ-दहा दिवसांनी मला सातारच्या जेलमध्ये हलवण्यात आले. तेथे मला सत्याग्रहींसोबत न ठेवता एका अट्टल दरोडेखोराबरोबर ठेवण्यात आले होते. हे खरे मला तुम्हाला सांगायचे होते, पण मध्येच आपण खाजगीकडे गेलो. त्या दरोडेखोराचे नाव होते म्हातारबा रामोशी. गुन्हेगार असूनही माणूस मोठा रूबाबदार, देखणा आणि उंचापुरा, टापटिपीत राहणारा. अत्यंत सरळ, स्वच्छ बोलणारा, दरोड्यात स्त्रियांवर हात टाकायचा नाही. दरोड्यातला चौथा वाटा गोरगरिबांना वाटून टाकायचा. कोयना नदीच्या काठचा हा रामोशी. मोठा दरारा. कुणाची काही अत्याचारी वागण्याची पद्धती असली की हा तेथे हजर होणार. कोणत्याही समाजातल्या स्त्रीच्या अब्रूचा प्रश्न निर्माण झाला की हा कर्दनकाळ. गोरगरिबांना, अडल्यानडल्यांना हा म्हातारबा आधाराला. टाचेने भिंती चढायचा म्हणतात. सारी राखण यांच्याकडे होती. मी रामोसवाड्यातच लहानाचा मोठा झालो. अनेक रामोशी लहानपणी माझे मित्र होते. ते बिचारे तेथेच राहिले. पण आज मोठे अपराधी वाटते. 'उपरा' वाचेपर्यंत यांचा कधी विचारच आला नाही डोक्यात. समाज म्हणून ही माणसं काय आहेत, कशी जगतात, या गोष्टीत शिरलो नाही, याची मोठी खंत आहे.
गाडी साहेबांच्या दारात होती.
या लक्ष्मण, चार चार घास जेवूया.
नको साहेब, तुम्ही खूप दमला आहात. मीही निघतो.
बरं या.
सुप्रिया, यशवंतरावांना जाऊन अठ्ठावीस वर्षे झाली. पण एखादा दिवसही असा गेला नाही जेव्हा मी त्यांना आठवले नाही, त्यांची आठवण झाली नाही. खरे तर देण्यासारखे त्यांच्याकडे काही नव्हते. होते ते अनुभव, व्यथा, वेदना. कदाचित वेदनांचे आमचे समान नाते आम्हाला अधिकाधिक घट्ट करीत गेले असावे.
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम !
तुझा,
लक्ष्मणकाका