पत्र-२४
दिनांक १८-०९-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
त्यादिवशी सकाळी सकाळी अप्पासाहेब भोसले यांनी गाडी पाठवली. साहेबांनी पुण्यास बोलावले आहे. तेथे दिवसभर तुम्ही बरोबर राहाल. सायंकाळी मुक्कामाला सातारला यायचे आहे. मी पटकन उरकले आणि पुण्याला गेलो. साहेब पुण्यात दादांच्या बंगल्यावर उतरले होते. चतुशृंगीच्या पायथ्याशी त्यांच्या पुतण्याचा बंगला होता. तेथे पोहोचलो. मी पहिल्यांदाच त्यांचे पुण्यातले घर पाहत होतो. चहा झाला. आम्ही नगरला कसल्यातरी कार्यक्रमाला निघालो होतो. त्यासंबंधी किंवा कोणाकडे जायचे आहे यासंबंधी फारसे बोलले नाहीत. त्यांना कदाचित राजकारण या विषयाचा विट आला असेल असेही शक्य आहे.
नेहमीसारखी चौकशी झाली. लक्ष्मण, या तुमच्या पंचायती चालतात त्यासंबंधी मला जाणून घ्यायचे आहे. तुम्ही बोलायचे मी ऐकायचे.
साहेब, आपणास ते कंटाळवाणे होईल.
नाही नाही ते मी संवादीत करेन.
साहेब, माझी गंमत आहे. मी सातवीपर्यंत या लोकांमध्ये होतो. पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी आईवडिलांना सोडून मी या समाजापासून दूर गेलो. तो पुन्हा 'उपरा' लिहीपर्यंत माझा या जमातींशी संपर्कच तुटला होता. आता पुन्हा मी वाड्यावस्त्या, पालांवर, बिर्हाडांवर, हिंडतो आहे. परिस्थिती तीच आहे. जिथे मी यांना सोडले तिथेच ते आहेत. आमच्या पंचायती म्हणजे आमच्या जातींचे सरकार आहे. ते त्या त्या जातीचे सामाजिक जीवन नियंत्रित करते. पंचायतीचे पुढारी जन्माने ठरत नाहीत; ते गुणाने ठरतात. सरपंचाचा मुलगा सरपंच असे नसते. जो न्यायबुद्धीचा आहे, बोलका आहे, बुजुर्ग आहे तो पंच होतो. पंच पाचच असतात. पाचांपैकी तिघे जे मत देतील ते मत मान्य केले जाते. पंचायतीला व्यक्तीच्या जीवनात फार महत्त्व असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत सारे जगणे या पंचायतीच्या हाती असते. कैकाडी जन्माने कैकाडी होत नाही. वडार, लमाण, त्या त्या जातीत जन्मला म्हणून तो त्या जातीचा होत नाही. इतर जातीच्या लहान मुलालाही जातीत घेता येते.
म्हणजे आपसातल्या जातीत की कोणत्याही ?
कोणत्याही जातीतल्या माणसाला कैकाडी होता येते, पण पंचायतीने त्याला जातीत घ्यावे लागते. मला नाही का शशीबरोबर दोनदा लग्न करावे लागले. एकदा कायद्याने आणि एकदा मामाने तिला दत्तक घेतले. मांडीवर बसवून साखर भरवली, म्हणजे रोटीबेटी व्यवहार होतात. अशा शक्यतो लहान मुलाला जातीत घेतात. त्याला भाषा शिकवतात. कोणीही त्याला मुलगी देतो. त्यास उरसांड घेणे असे म्हणतात. आमच्या जमाती बंदिस्त नाहीत. मुले कोणत्याही महिन्यात जन्मली तरी त्यांची नावे ठेवली जातात ती शिमग्याला. होळी हा बंजारा समाजात मोठा सण समजला जातो. त्यांची बारशी त्या सणाला होतात. कुणाची ती आषाढीत होतात. आषाढी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात नामकरणविधी होतो. आषाढात मोठ्या प्रमाणात लग्नेही होतात.
अरे ! गंमतच आहे. आमची लग्ने आषाढात होत नाहीत. श्रावणात तर तोंडही पाहत नाहीत.
आमचे तसे नाही. आषाढात पाऊस असतो. एका जागेला काही दिवस तरी राहावेच लागते. आषाढी जत्रा असतात. सारे मातृपूजक. मातृदेवतांच्या यात्रा याच महिन्यात होतात. नामकरणविधी झाल्याशिवाय त्याला पंचायतीत बसता येत नाही. आषाढी पौर्णिमेला सर्व लहान मुलांना पंचायतीपुढे त्याचे त्याचे मामा उभे करतात. हा मुलगा यांचा आहे, हा माझ्या बहिणीचा आहे, याला समाजात घ्यायचे आहे. आपली परवानगी असावी. असा पंचायतीसमोर प्रस्ताव येतो. सरपंच त्या मुलाच्या आईवडिलांना पंचायतीपुढे बोलावतो. या दोघांचा हा मुलगा किंवा मुलगी आहे. याला समाजात घ्या असे म्हणणे आहे. कुणालाही काही म्हणायचे आहे का ? सारी जमलेली माणसे गप्प बसली, कुणी काही बोलले नाही तर सरपंच दुसर्यांदा तोच प्रश्न विचारतो. पुन्हा शांतच बसले तर सरपंच तिसर्यांदा विचारतो. तरी कुणाला काही म्हणायचे नाही म्हटल्यावर मामाला परवानगी देतो. मुलांचे आईवडील आनंदाने मामाला पोशाख करतात. मुलाला मामाच्या मांडीवर बसवतात. मामा या मुलाचे जावळ काढतो. सौर करतो-चकोटा गोटा. मुलगी असो की मुलगा, सारे केस काढतात. मुलाला नवे कपडे दिले जातात. पंचायतीला जेवण घातले जाते. मुलाचे नाव घोषित होते. सर्व मुलांचे सार्वजनिकरीत्या बारसे होते. कधी गोडाचे जेवण असते तर कधी बकरे कापले जातात. मामाच मुलाचा मालक असतो. आईबाप नाही. बहिणीच्या लग्नात काही विघ्न आले तर मामाच मुलाचे सारे करतो.