लक्ष्मण, माझ्या मनात आहे, बाबासाहेबांचे चरित्र लिहावे. त्या निमित्ताने त्यांचे सारे ग्रंथही वाचून होतील. सलगपणे. साधनांची जमवाजमव करतो आहे. काँग्रेसने त्यांचेवर तसा फार मोठा अन्याय केला आहे. आमचे अनेक सहकारी त्यांना राष्ट्रद्रोहीसुद्धा म्हणत असत. ते गांधींच्या, काँग्रेसच्या विरोधी भुमिका घेत. ती ठामपणे मांडत. संघर्ष करीत, तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांचे असे वागणे हे इंग्रजधार्जिणे वाटावयाचे. इंग्रजांची फोडा, झोडा नि राज्य करा ही नीतीच होती. त्यात आम्हाला म्हणजे काँग्रेसला राजकारण दिसायचे. आमचे बहुसंख्य नेते म्हणवणारे उच्च, मध्यम वर्गातले तरी होते किंवा शहरांमध्ये वाढलेले परदेशात शिकलेले तरी होते. त्यांना डॉ. आंबेडकर डोकेदुखी वाटत असत. खुद्द गांधीबद्दल कितीही प्रेम असले तरी ग्रामरचनेबद्दल किंवा जातींच्या उतरंडीबद्दलची त्यांची मते मला पटणारी नव्हती. माझ्या घरात सत्यशोधकांचा वारसा होता. त्यातून अस्पृश्यता, जातींची उतरंड, त्यातला कोंडमारा मला समजत होता. संधी मिळाली तेव्हा मी जाणीवपूर्वक काही निर्णय केले. डॉ. आंबेडकरांनी सभागृहात अनेकदा महार वतने खालसा करण्याची बिले आणली, पण ती पास झाली नाहीत. ती संधी मला मिळाली. पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि डॉ. आंबेडकरांचे कैक वर्षांचे स्वप्न मी पुरे केले. ज्या वतनाच्या गुलामीमुळे सारा अस्पृश्य समाज वेठबिगारीला जुंपला होता ती जन्मोजन्मीची वेठबिगारी नष्ट झाली. एवढेच नव्हे तर या जमिनीसाठी अस्पृश्यता पाळली जाणार नाही, ती कुणीही ताब्यात घेणार नाही, याचीही कायद्यात तरतूद केली.
१९५६ साली बाबासाहेबांनी धर्मांतर केले. आणि धर्मांतरीत झालेल्या बांधवांच्या सवलतींचा मोठा पेच निर्माण झाला. १९५८-५९ चा सुमार असेल. लक्षावधी लोकांनी धर्मांतर केले होते. हिंदू धर्माचा त्याग करून ते बौद्ध धम्मात गेले होते. मागासवर्गीयांना अनुसूचित जाती म्हणून घटनेनुसार मिळणार्या सवलती द्यायच्या का असा प्रश्न माझ्या मंत्रिमंडळासमोर आला. घटनेचे तसे बंधन नव्हते. डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसविरोध आणि आता धर्मांतराचा प्रक्षोभक निर्णय यामुळे प्रचंड नाराजी मंत्रिमंडळात होती. प्रस्ताव मांडल्याबरोबर खूपच गरमागरम चर्चा झाली. बहुसंख्य सदस्य सवलती देण्याच्या विरोधात होते. माझ्याबरोबर दोन-तीन सदस्य होते. बाकी सारे विरोधी. धर्मबदल झाला म्हणून लगेच मागासलेपण गेले असे होत नाही. मी परोपरीने समजावीत होतो. कायदेशीर, घटनात्मक बंधन नसेलही कदाचित, तरी नैतिक व सामाजिकदृष्ट्या सवलती चालू ठेवणेच न्यायाचे आहे असे माझ्या सद्सदविवेकाला वाटते. मी समजावण्याचे प्रयत्न केले. मीच अल्पमतात होतो. क्षणभर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असेही वाटले, पण विषय स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव आला. मी प्रधानमंत्र्यांशी बोलावे, ते काय म्हणतील तसे करावे असे ठरले. माझा जीव भांड्यात पडला. मी दिल्लीत जाऊन पंडितजींशी बोललो. त्यांनी सारे ऐकून घेतले नि सवलती चालू ठेवण्याच्या बाजूने कौल दिला. मी तसे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले आणि बौद्धाच्या सवलती चालू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. बाबासाहेबांच्या स्वप्नाला मला थोडीशी साथ देता आली याचा फार मोठा आनंद होता. नागपुरातल्या ज्या जागेवर बाबासाहेबांनी आपल्या लक्षावधी अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली ती दीक्षाभूमीची जागा आणि स्मारक उभे करण्यास मदत केली.
१४ एप्रिलला माझ्या आयुष्यात फार महत्त्व आहे. तो बाबासाहेबांचा जन्मदिवस आणि या दिवशी मी माझ्या संसदीय कामाला सुरुवात केली. मी पहिल्यांदा संसदीय सचिव म्हणून १४ एप्रिललाच कामाला सुरुवात केली. माझे राजकारण १४ तारखेला सुरू झाले. हा माझ्या आयुष्यातला मोठाच आनंदाचा दिवस होता. १४ एप्रिल या बाबासाहेबांच्या जन्मदिनी सर्वांना आनंद साजरा करता यावा म्हणून मी सुट्टी जाहीर केली.
दादासाहेब गायकवाडांबरोबर माझी छान मैत्री होती. माणूस फार मोठ्या दिलाचा. मी संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेलो. आता मला खासदार व्हायचे होते. नाशिकची जागा रिकामी होती. नाशिकला दादासाहेब गायकवाड होते. त्यांचेकडे गेलो, गप्पा झाल्या. त्यांनामी संरक्षणमंत्री झाल्याचा खूप अभिमान. त्यांना मी माझ्या मनातली गोष्ट बोललो. त्यांच्यासाठी, त्यांच्या संस्थांसाठी काही करण्याचा मी प्रस्ताव दिला. त्यावर ते उसळून म्हणाले,
'यशवंतराव, असल्या गोष्टी सोडो. तुम्ही देशाची शान आहात. इथून बिनविरोध जाल. यासाठी हा आता कामाला लागतो. पण नाशिकला विसरू मात्र नका. पोराबाळांना हाताला काही कामं मिळतील आसं मात्र करा.'
या माणसाने कधी चहाचा कप घेतला नाही. मी बिनविरोध निवडून आलो. मीही माझा शब्द पाळला. थोड्याच दिवसांत मिग विमानांचा कारखाना ओझरला निघाला.
शामराव गावातून जाऊन त्यांचे काही काम होते ते करून परत आले. मी साहेबांचा निरोप घेतला. पुढे साहेब गेले आणि बाबासाहेबांचे चरित्र लिहिण्याचा त्यांचा संकल्पही अपुराच राहिला.
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका