यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ८-२२-०६-२०१२-६

आता बाकी उरलेले एकंदर सर्व कंगाल, दीनदुबळे, रात्रंदिवस शेतीत खपून कष्ट करणारे निव्वळ अज्ञानी, माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकर्‍यांच्या हल्लीच्या स्थितीविषयी थोडेसे वर्णन करितो, तिकडेस सर्वांनी कृपाकरून लक्ष पुरविल्यास त्याजवर मोठे उपकार होतील.  बांधवहो !  तुम्ही नेहमी स्वतः शोध करून पाहिल्यास तुमची सहज खात्री होईल की एकंदर सर्व लहानमोठ्या खेड्यापाड्यांसहित वाड्यांनी शेतकर्‍यांची घरे दोनतीन अथवा चार खणांची कौलारू अथवा छप्परी असावयाची.  प्रत्येक घरात चुलीच्या कोपर्‍यात लोखंडी उलतणे अथवा खुरपे, लाकडी काथवट व पुंफ्कणी, भानुशीवर तवा, दुधाचे मडके व खाली आळ्यात रांधणाच्या खापरी तवल्या, शेजारी कोपर्‍यात एखादा तांब्याचा हंडा परात, काशाचा थाळा, पितळी चरवी अथवा वाटी नसल्यास जुन्या गळक्या तांब्याशेजारी मातीचा मोखा परळ व जोगल्या असावयाच्या.  त्यालगत चारपाच डेर्‍यामडक्यांच्या उतरंडी.  ज्यात थोडेथोडे साठप्याला खपले, हुलगे, मटकी, तुरीचा कणुरा, शेवया, भुईमुगाच्या शेंगा, भाजलेला हुळा, गव्हाच्या ओंब्या, सांडगे, बिवड्या, मीठ, हळकुंडे, धने, मिरी, जिरे, बोजवार हिरव्या मिरच्या, कांदे, चिंचेचा गोळा, लसूण, कोथिंबीर असावयाची.  त्याचे लगत खाली जमिनीवर काल संध्याकाळी गोडबोल्या भट, पेशनर सावकाराकडून वाढीदाढीने जुने जोंधळे आणलेले, तुराट्यांच्या पाट्या भरून त्या भिंतीशी लावून एकावर एक रचून ठेवलेल्या असावयाच्या.  एके बाजूला वळणीवर गोधड्या, घोंगड्यांची पटकुरे व जुन्यापान्या लुगड्यांचे धड तुकडे आडवे उभे दंड घालून नेसण्याकरिता तयार केलेले धडपे.  भिंतीवर एक लाकडाची मेख ठोकून तिजवर टांगलेल्या चिंध्याचांध्यांच्या बोचक्यावर भुसकट व गोवर्‍या वाहावयाची जाळी.  दिव्याच्या कोनाड्यात तेलाच्या गाडग्याशेजारी फणी व कुंकवाचा करंडा, वरती माळ्यावर गोवर्‍या व तीनधारी निवडुंगाचे सरपणाशेजारी वैरण नीट रचून ठेवली असावयाची.  खाली जमिनीवर कोन्याकोपर्‍यांनी कुदळ, कुर्‍हाड, खुरपे, कुळवाची फास, कोळप्याच्या गोल्ह्या, जाते, उखळ, मुसळ, व केरसुणीशेजारी थुंकावयाचे गाडगे असावयाचे.  दरवाजेबाहेर डाव्या बाजूला खापरी रांजणाच्या पाणईवर पाणी वाहावयाचा डेरा व घागर असून पलीकडे गडगळ दगडाची उघडी न्हाणी असावयाची.  उजवे बाजूला बैल वगैरे जनावरे बांधण्याकरिता आढेमेढी टाकून छपरी गोठा केलेला असावयाचा.  घरातील सर्व कामकाजाचा चेंदा उपसून, पुरुषांच्या पायावर पाय देऊन, दिवसभर शेतीकाम उरकू लागणार्‍या बायकोच्या अंगावर सुताडी घोटा बांड व चोळी, हातात रुप्याचे पोकळ गोट व ते न मिळाल्यास कथलाचे गोट नि गळ्यात मासा-सव्वामासा सोन्याचे मंगळसूत्र, पायाच्या बोटात चटचट वाजणारी काशाची जोडवी, तोंडभर दातवण, डोळेभर काजळ आणि कपाळभर कुंकू, याशिवाय दुसर्‍या शृंगाराचे नावाने आवळ्याएवढे पूज्य, उघडी नागडी असून अनवाणी सर्व दिवसभर गुराढोरांच्या वळत्या करीत फिरणार्‍या मुलांच्या एका हातात रुप्याची कडी करून घालण्याची ऐपत नसल्यामुळे त्याच्या ऐवजी दोन्ही हातात कथलाची कडी व उजव्या कानात पितळेच्या तारेत खरड्यांच्या बाळा, याशिवाय अंगावर दुसर्‍या अलंकाराचे नावाने शिमगा.  हिवावार्‍यात व उन्हातान्हात रांत्रंदिवस शेती खपणार्‍या शेतकर्‍याचे कमरेला लुगड्यांचे दशांचा करगोटा, खादी लंगोटी, टोपीवर फाटकेसे पागोटे, अंगावर साधे पंचे न मिळाल्यास घोंगडी व पायात ठिगळे दिलेल्या अथवा दोरीने आवळलेल्या जोड्यांशिवाय बाकी सर्व अंग सळसळीत उघडेबंब असल्यामुळे त्याच्याने अतिशय थंडी पावसाळ्यात हंगामशीर मेहनत करवत नाही.  त्यातून तो अक्षरशून्य असून त्यास सारासार विचार करण्याची बिलकूल ताकद नसल्यामुळे तो धूर्त भटांच्या उपदेशांवरून हरिविजय वगैरे निरर्थक ग्रंथातील भाकडकथेवर विश्वास ठेवून पंढरपूर वगैरे यात्रा, कृष्ण व रामजन्म, व सत्यनारायण करून अखेरीस रमोजी करिता शिमग्यात रात्रंदिवस मारता मारता नाच्यापोर्‍याचे तमाश ऐकण्यामध्ये आपला वेळ थोडा का निरर्थक घालवितो.  त्यास मुळापासून विद्या शिकण्याची गोडी नाही व तो निव्वळ अज्ञानी असल्यामुळे त्यास विद्येपासून काय काय फायदे होतात हे शेतकर्‍याच्या प्रत्ययास आणून देण्याऐवजी शेतकर्‍यांनी नेहमी गुलामासारखे त्याच्या तावडीत राहावे या इराद्याने शेतकर्‍यास विद्या देण्याची कडेकोट बंदी केली होती.''

सुप्रिया, भट-सावकारांचं हे वर्तन काही एका दिवसाचं नाही.  पिढ्यान् पिढ्या सुरू होतं.  या शोषणाची सारी तर्‍हा यशवंतरावांनी पाहिली होती.  शेतकर्‍याच्या विपन्नावस्थेचं सारं वर्णन त्यांनीही फुल्यांच्या समग्र वाङ्‌मयात वाचलं होतं.  त्याचा परिणाम त्यांच्या मनावर खोलवर झाला होता.  या गुलामगिरीतून शेतकरी, कामगारांची, कष्टकर्‍याची सुटका झाली पाहिजे म्हणून त्यांनी 'कुळकायदा' केला.  'कसेल त्याची जमीन' आणि सोसायट्या, पतसंस्था, बँका सहकारी पद्धतीनं चालवून त्यांनी शेतकर्‍याला त्याच्या दुःस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला.  या भूमिपुत्रानं घेतलेला हा निर्णय म्हणूनच लक्षावधींना गुलामीतून मुक्त करणारा क्रांतिकारक कायदा ठरला.  

पुढे, मी ८१-८२ साली जेव्हा त्यांच्याबरोबर बोललो, तेव्हा 'त्या काळामध्ये कुळकायद्याची अंगमलबजावणी करताना नोकरशाहीचा त्रास झाला नाही काय ?' असं विचारलं.  त्यावर ते हसले आणि म्हणाले, 'एखादा जुना बळावलेला आजार जेव्हा तात्पुरत्या मलमपट्टीनं बरा होत नाही.  तेव्हा असाध्य रोगावर कठोरपणे इलाज करावा लागतो.  तसा इलाज मी केला.  लहानपणापासून पाहिलेलं शेतकर्‍यांचं दुःख, शोषणातून या शेतकर्‍याची सुटका करावयाची तर कठोर कायदा करणं गरजेचंच होतं.  त्यात मी फारसं वावगे केलं असं नाही.  'ज्याचे होते, त्यांना दिले' मी काय केले ?'  असं उत्तर त्यांनी दिलं.  'शेती आणि शेतकरी', 'शेतीपूरक व्यवसाय' हे त्यांच्या चिंतनाचे विषय होते.  आजचे राज्यकर्ते आज हे सारे घड्याळाचे  उलटे फिरवून पुन्हा खाजगी सावकारी, जमीनदारी, सरंजामदारी काही वेळा मागच्या दारानं, तर काही वेळेस खुलेआम करत आहेत.  यशवंतरावांचे अनुयायीच आज सरंजामदारी, भांडवली व्यवस्थेचे आधुनिक दास बनत असल्यानं पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपण पाहत आहोत.  यशवंतरावांचे आणि आमचेही हे मोठे दुर्दैव.  हे पत्र फारच मोठं झालं, पण म. फुल्यांचं अत्यंत उत्कट प्रकटीकरण, शब्दलालित्य, मराठी भाषेचा एक वेगळा बाज, सौंदर्य तुम्हा तरुण मुलांना कळावं यासाठी विस्तार होत असतानाही जसंच्या तसं देण्याचा मोह मला आवरता आला नाही.

सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका