ज्यावर हजारो कातिणींचे पिल्ले आपली खेळ कसरत आहेत. ओमन, वासे, तुळ्यांवर जिकडेतिकडे मेलेल्या घुल्यांची व कातिणींची विषारी टरफले चिकटली आहेत. त्यातून तुळ्या वगैरे लाकडांच्या ठेवणीवर कित्येक ठिकाणी उंदीर व झुरळांच्या विषारी लेंड्यांनी मिश्र झालेल्या धुळीचे लहान लहान ढीग जमले आहेत. फुरसत नसल्यामुळे जेथे चारपाच वर्षातून एकदासुद्धा केरसुणी अथवा खराटा फिरविला नाही. इतक्यात उन्हाळा असल्यामुळे फार तलकी होऊन वळवाचा फटकारा येण्याचे पूर्वी वादळाचे गर्दीमध्ये वार्याचे सपाट्याने कौलाच्या सापटीतून सर्व घरभर धुळीची गर्दी झाली. तेव्हा तोंड वासून घारेत पडलेल्या कुणब्याच्या नाकातोंडात विषारी धूळ गेल्याबरोबर त्यास ठसका लागून तो एकाएकी दचकून जागा झाला. पुढे त्या विषारी ठसक्याने त्याला इतके बेजार केले की, अखेरीस थोडासा बेशुद्ध होऊन तो मोठमोठ्याने विव्हळून कण्हू लागला त्यावरून त्याच्या दुखणाईत म्हातार्या आईने माजघरातून धडपडत त्याच्याजवळ येऊन त्याचे मानेखाली खोगिराची वळी घातल्यानंतर त्यांच्या हनुवटीला हात लावून तोंडाकडे न्याहाळून रडता रडता म्हणाली, 'अरे भगवंतराया, मजकडे डोळे उघडून पाहा, रामभट्टाच्या सांगण्यावरून तुला साडेसातीच्या शनीने पिडा करू नये म्हणून म्या तुला चोरून कणगीतले पल्लोगणती दाणे नकट्या गुजरास विकून अनेक वेळा मारुतीपुढे, ब्राह्मण जपास बसवून, सवाष्ण ब्राह्मणांच्या पंगतीच्या पंगती की रे उठवल्या. कित्येक वेळी बाळा तुला चोरून परभारा गणभट्टाचे घरी सत्यनारायणाला प्रसन्न करण्यानिमित्त ब्राह्मणाचे सुखसोहळे पुरवण्याकरिता पैसे खर्च केले आणि त्या मेल्या सत्यनारायणाची किरडी पाजळली, त्याने आज सकाळी कलेक्टर सायबाचे मुखी उभे राहून तुला त्याजकडून सोयीसोयीने पट्टी देण्याविषयी मुदत कशी देववली नाही रे ? अरे मेल्या ठगभटांनो, तुमचा डोला मिरविला तुम्ही नेहमी मला शनीव सत्यनारायणाच्या थापा देऊन. मजपासून तूप-पोळ्यांची भोजने व दक्षिणा उपटल्या. अरे, तुम्ही मला माझ्या एकुलत्या एक भगवंतरायाच्या जन्मापासून आज दिनापावेतो नवग्रह वगैरेंचे धाक दाखवून शेकडो रुपयांस बुडवून खाल्ले. आता तुमचे ते सर्व पुण्य कोठे गेले ? अरे, तुम्ही मला धर्ममिषे इतके ठकविले की तेवढ्या पैशात मी अशा प्रसंगी माझ्या बच्च्याच्या कित्येक वेळा पट्ट्या वारून, माझ्या भगवंतरायाचा गळा मोकळा करून त्यास सुखी केले असते. अरे, तुमच्यातीलच रागू भरारीने प्रथम इंग्रजास उलटे दोन आणे लिहून देऊन त्यास तळेगावास आणिले. तुम्हीच या गोरे गैरमाहितगार साहेब लोकास लांड्यालबाड्या सांगून आम्हा माळ्या-कुणब्यास भिकारी केले. आणि तुम्हीच आता आपल्या आंगात एकीचे सोंग आणून इंग्रज लोकांचे नावाने मनगट तोडीत फिरता. इतकेच नव्हे, परंतु हल्ली माळी, कुणबी जसजसे भिकारी होत चालले तसतसे तुम्हांस त्यांना पहिल्यासारखे फसवून खाता येईना म्हणून तुम्ही ब्राह्मण टोपीवाल्यास बाटवून पायात बूट पाटलोन व डोईवर सुतक्यासारखे पांढरे रुमाल लावून चोखामेळ्यांपैकी झालेल्या ख्रिस्त भाविकांच्या गोर्या गोमट्या तरुण मुलींबरोबर लग्ने लावून, भर चावडीपुढे उभे राहून माळ्या-कुणब्यास सांगत फिरता की, आमच्या ब्राह्मण पूर्वजांनी जेवढे म्हणून ग्रंथ केले आहेत ते सर्व मतलबी असून बनावट आहेत. त्यात त्यांनी उपस्थित केलेल्या धातूंच्या किंवा दगडांच्या मूर्तीत काही अर्थ नाही. हे सर्व त्यांनी आपल्या पोटासाठी पाखंड उभे केले आहे. त्यांनी नुकताच पटलणीतील परदेशी लोकांत सत्यनारायण उपस्थित करून, आता इकडे तुम्हा सर्व अज्ञानी, भोळ्या, भाविक माळ्या-कुणब्यात नाचवू लागले आहेत. ही त्यांची ठकबाजी तुम्हांस कोठून कळणार ? यास्तव तुम्ही या गफलती ब्राह्मणांचे ऐकून धातूंच्या व दगडांच्या देवाच्या पूजा करू नका. तुम्ही सत्यनारायण करण्याकरिता कर्जबाजारी होऊन ब्राह्मणाचे नादी लागू नका. तुम्ही निराकार परमात्म्याचा शोध करा म्हणजे तुमचे तारण होईल. असो. परंतु तुम्ही आम्हा या भिश्या माळ्या-कुणब्यास उपदेश करीत करीत फिरण्यापेक्षा प्रथम आपल्या जातबांधवांचे आळ्यांनी जाऊन त्यास सांगावे की, तुम्ही आपल्या सर्व बनावट पोथ्या जाळून टाका. माळी-कुणबी, धनगर वगैरे शेतकर्यांस खोटे उपदेश करून आपली पोटे जाळू नका. असा त्यास वारंवार उपदेश करून त्याजकडून तसे आचरण करवू लागल्याबरोबर शेतकर्यांची सहज खात्री होणार आहे. दुसरे असे, की आम्ही जर तुम्हा पाद्याब्राह्मणांचे ऐकून आचरण करावे तर तुमचेच जातवाले सरकारी कामगार येथील गोर्या कामगारांच्या नजरा चुकावून, भलत्यासलत्या सबबी कटवून आम्हा शेतकर्यांच्या मुलाबाळांची दशा करून सोडतील.' इतक्यात शेतकरी शुद्धीवर येताच आपल्या मातोश्रीच्या गळ्यास मिठी घालून रडू लागला.