यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ८-२२-०६-२०१२-३

जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली आहे.  त्यामुळे ऊसाचे बाळगे मोडून हुंडीचीही तीच अवस्था झाली आहे.  मकाही खुरपणीवाचून वाया गेला.  भूस सरून बरेच दिवस झाले.  आणि सरभड गवत, कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत.  जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्यामुळे कित्येक धट्टेकट्टे बैल उठवणीस आले आहेत.  सुनाबाळांची नेसण्याची लुगडी फाटून चिंध्या झाल्यामुळे लग्नांत घेतलेली मौल्यवान जुनी पांघरुणे वापरून त्या दिवस काढीत आहेत.  शेती खपणारी मुले वस्त्रांवाचून इतकी उघडीबंब झाली आहेत की, त्यांना चारचौघांत येण्यास शरम वाटते.  घरातील धान्य सरत आल्यामुळे राताळ्याच्या बरूबर निर्वाह चालू आहे.  घरात माझ्या जन्म देणार्‍या आईच्या मरतेवेळी तिला चांगलेचुंगले गोडधोड करून घालण्यापुरता मजजवळ पैसा नाही, याला उपाय तरी मी काय करावा ?  बैल विकून जर शेतसारा द्यावा, तर पुढे शेतकी कोणाच्या जिवावर ओढावी ?  व्यापारधंदा करावा तर मला लिहिता-वाचता मुळीच येत नाही.  आपला देश त्याग करून जर परदेशांत जावे, तर मला पोट भरण्यापुरता काही हुन्नर ठाऊक नाही.  कण्हेरीच्या मुळ्या मी वाटून प्याल्यास कर्तीधर्ती मुले आपली कशीतरी पोटे भरतील.  परंतु माझ्या जन्म देणार्‍या वुद्ध बसेस व बायकोसह माझ्या लहानसहान चिटकुल्या लेकरांस अशा वेळी कोण सांभाळील ?  त्यांनी कोणाच्या दारांत उभे राहावे ?  त्यांनी कोणापाशी आपले तोंड पसरावे ?'

म्हणून अखेरीस मोठा उसासा टाकून रडता रडता झोपी गेला.  नंतर मी डोळे पुशीत घराबाहेर येऊन पाहतो तो त्याचे घर एक मजला कौलारू आहे.  घराचे पुढचे बाजूस घरालगत आढेमेढी टाकून बैल बांधण्याकरिता छपराचा गोठा केला आहे.''

सुप्रिया, तत्कालीन शेतकर्‍यांची दैन्यावस्था जोतिराव फुल्यांनी इतक्या चित्रमय भाषाशैलीमध्ये दिली आहे आणि शेतकर्‍याचे शब्दचित्र इतकं हुबेहूब आहे की, ते माझ्याच्यानं सांगितल्याशिवाय राहवत नाही.  पत्र थोडं लांबेल हे खरं, परंतु तत्कालीन शेतकर्‍याची स्थिती आणि गती समजावून घ्यायची असेल तर फुल्यांनी रेखाटलेलं हे शब्दचित्र आपण पाहिलंच पाहिजे.  बैलाच्या गोठ्याचं वर्णन करताना ते म्हणतात, ''दोनतीन उठवणीस आलेले बैल रवंथ करीत बसले आहेत.  व एक बाजूला खंडी-सवा खंडीच्या देनतीन रिकाम्या कणगी कोपर्‍यात पडल्या आहेत.  बाहेर आंगणात उजवे बाजूस एक आठ बैली जुना गाडा उभा केला आहे.  त्यावर मोडकळीस आलेला तुराठ्यांचा कुरकुल पडला आहे.  डावे बाजूस एक मोठा चौरस ओटा करून त्यावर एक तुळशीवृंदावन बांधले आहे व त्यालगत खापरी रांजणाच्या पाणईचा ओटा बांधला आहे.  त्यावर पाण्याने भरलेले दोन तीन मातीचे डेरे व घागरी ठेविल्या आहेत.  पाणईशेजारी तीन बाजूला छाट दिवाली बांधून, त्यांचे आत ओबडधोबड फरश्या टाकून एक लहानशी न्हाणी केली आहे.  मिच्या मोरीवाटे वाहून गेलेल्या पाण्याचे बाहेरचे बाजूस लहानसे डबके साचले आहे, त्यामध्ये किड्यांची बुचबुच झाली आहे.  त्याचे पलीकडे पांढर्‍या चाफ्याखाली उगडी नागडी सर्वांगावर पाण्याचे ओघळाचे डाग पडलेले असून खरजुली डोक्यात खवडे, नाकाखाली शेंबडाच्या नाळी पडून घामट अशा मुलांचा जमाव जमला आहे.  त्यातून कितीयेक मुले आपल्या तळहातावर चिखलाचे डोले घेऊन दुसर्‍या हातांनी उर बडवून 'हायदोस हायदोस' शब्दांचा घोष करून नाचत आहेत.  कोण दारू पिट्याची दुकान घालून, कलालीन होऊन, पायात बाभळीच्या शेंगाची तोडे घालून दुकानदारीन होऊन बसले आहेत.  तिला कित्येक मुले चिंचोक्याचे पैसे देऊन, पाळीपाळीने लटकी पाण्याची दारू पेल्यावरती तिच्या अमलामध्ये एकमेकांच्या अंगावर होलपडून पडण्याचे हुबेहूब सोंग आणीत आहेत.

त्याचप्रमाणे घराचे पिछाडीस घरालगत आढे-मेढी टाकून छपरी गोठा केला आहे.  त्यात सकाळी व्यायलेली म्हैस, दोनतीन वासरे, एक नाळपडी घोडी बांधले आहे. भिंतीवर जिकडेजिकडे कोन्याकोपर्‍यांनी घागरी तांबडी गोचडी चिकटली आहेत.  छपराच्या वळचणीला वेणीफणी करताना निघालेले कसोचे बुचके जागोजाग कोंबले आहेत.  त्यालगत बाहेर परसात एके बाजूस कोंबड्याचे खुराडे केले आहे.  त्याशेजारी एकदोन कैकाडी झाप पडलेले आहेत व दुसर्‍या बाजूस हातपाय धुण्याकरिता व खरकटी मडकी-भांडी घासण्याकरिता कडगळ दगड बसवून एक उगडी न्हाणी केली आहे.  तिच्या खुल्या दरजांनी जागोजाग खरकटे जमा झाल्यामुळे त्यावर माश्या घोंघों करीत आहेत.  तर पलकडे एका बाजूस शेणखइ केली आहे.  त्यात पोरासोरांनी विष्ठा केल्यामुळे चहूकडे हिरव्या माश्या भनभन करत आहेत.  शेजारी पलीकडे एका कोपर्‍यात सरमड गवत व कडब्यांच्या गंजी संपून त्यांच्या जागी त्या त्या वैरणींच्या पाचोळ्यांचे लहान मोठे ढीग पडलेले आहेत.  दुसर्‍या कोपर्‍यात गवर्‍यांचा कलवड रचला आहे.  त्याच्या शेजारी बाभळीच्या झाडाखाली मोडक्या औतांचा ढीग पडला आहे.  त्याच्या खाली विलायती धोतरे उगवली आहेत.  त्यामध्ये नुकतीच व्यायलेली झिपरी कुत्री आल्यागेल्यावर गरुगुर करीत पडली आहे.  शेजारी गवानींतील चगळचिपाडांचा ढीग पडला आहे.  बाकी उरलेल्या एकंदर सर्व परसात एक तरुण बाई घराकडे पाठ करून गोवर्‍या लावीत आहे.  तिचे दोन्ही पाय शेण तुडवून गुडघ्यापावतोपर्यंत भरले होते.  पुढे एकंदर सर्व माजघरात उंच खोल जमीन असून येथे पाहावे तर दळण पाखडल्याचा वैचा पडला आहे.  तेथे पाहावे तर निसलेल्या भाज्यांच्या काड्या पडल्या आहेत.  येथे खाल्लेल्या गोंधणीच्या बिया पडल्या आहेत.  तेथे कुजल्या कांद्याचा ढीग पडला आहे.  त्यातून एक तर्‍हेची उबट घाण चालली आहे.