यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ९-०५०७२०१२-१

'आवं मंग बरंच हायकी.  माणसं जागी राहत्यात आन् गुरुजी, लोकसंख्या बी कमी व्हईल !' सारी मस्करी करत हसत व्हती.  आम्ही पोरं त्यांचंच सारं ऐकत व्हतो. डोळे पुस्तकात आन् कान गप्पांत व्हते.  गुरुजी आणि गावकरी यांच्यात गप्पा रंगल्या व्हत्या.  कुणाचाच असा लाईटीवर विश्वास बसत नव्हता.  

'यशवंतरावांनी सारा महाराष्ट्र उजळून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.  राज्यात सगळीकडे आता लाईट जाणार.  कोयनेचं धरण कशाला बांधलंय माहीत हाय ?'  गुरुजी पुन्हा बोलू लागले, 'यशवंतरावांनी मुख्यमंत्री झाल्याबरूबर कोयना नदी हेळवाकजवळ आडवायची ठरीवलं.  पाटण माझं गाव म्हण सांगतो.  छप्पन्न साली धरणाला सुरुवात झाली.  दोन डोंगराच्या मधी धरण बांधलं.  कोयनामायला आडीवलं.  आन् मागच्याच महिन्यात त्याचं उद्‍घाटन पंडित नेहरूंच्या हातनं केलं.  आसं काम दुनियात कुणी केलं नसंल तसलं काम यशवंतरावांनी केलंय.'  आता मातर सारी मंडळी थट्टामस्करी न करता ऐकत व्होती.

'आवं पर त्यानं लाईट कशी व्हती ?'

'कोयना धरणातनं सह्याद्रीला बोगदा पाडला.  आन् पाणी चिपळूनजवळ पोफळीत नेहलं...'

'बया बया बया !  काय सांगता काय ?  ह्य मातर लय मोठं काम झालं बाबा.'

'होय.  जगात नसंल आसलं काम झालं.  पोफळीत यंत्र बसवली.  जनित्र म्हणत्यात त्याला.  पाण्याचा प्रवाह या यंत्रावरनं वेगात जातो.  यंत्राची पाती हालत्यात आन् त्यानं लाईट तयार व्हती.  ती यंत्रातच साठीवत्यात. ती ह्या वायरातनं सार्‍या राज्यात पसरायचं काम चाललंया.'

'गुरुजी, ह्ये म्हंजी लय देवावाणी अचाट काम झालं बगा.  पण गुरुजी हे पाणी पावसाळ्यात कसं आडवणार ?  हे फुटलं तर कसं व्हणार ?'

'पाटील, आवं आपल्या निरगुडीला नाही लागणार.  नगा काळजी करू.'  गावकरी म्हणाला.

पाटलाला दाबीत तात्या म्हणाले, 'गप आयका गड्यांनू, हं गुरुजी सांगा.'

'धरणाला दरवाजे हाईत की.  पाणी वाढायला लागलं की दरवाजा उघडून पाणी नदीत सोडत्यात.  किसना-कोयना दोगी बी भरभरून वाहत्यात.  कोयना म्हंजी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मीच होणार म्हणा की, आन् यशवंतराव भाग्यविधाते.'

'हां, हे कसं बोलला.  लाखात एक बगा.'  सारे गावकरी एकमेकांना टाळ्या देत व्हते.  यशवंतराव आता नुसते नेते नव्हते.  त्याहून काही वेगळे व्हते.  घराघरातल्या माणसाला ते आपल्या घरातलेच वाटत व्हते. प्रत्येकाला आपला 'घरचा माणूस' म्हणून त्यांचा अभिमान वाटत व्हता.  तो गरिबांना वाटत व्हता, तसा श्रीमंतांनाबी वाटत व्हता.  आन् जातीपातीच्या पलीकउं त्यांचं नातं प्रत्येक माणसाशी जोडलं जात व्हतं.  ज्यांच्या दातावर मास होतं ते बी, आन् ज्यांची चूल पेटत नव्हती ते बी यशवंतरावांना आपल्या घरातला माणूस, करता माणूस मानत व्हतं.

गप्पा रंगात आल्या होत्या.  यशवंतरावांच्या राजकारणाची बेरीज-वजाबाकी चालू होती.

'गुरुजी, ही लाईट इल म्हणता, ते चांगलंच हाय, पर मला सांगा, आमा शेतकर्‍यांच्या नशिबात पाणी कवा मिळंल ?  आन् आमच्या मागच्या मोटा कवा जात्याल ?  दिसना दिस मोट चालली तरी बिगा भिजवायला आठ दिवस तरी लागत्यात बगा.  हातापायांची, बोटांची दशा तरी बगा.  लय मरणाचं कष्ट, बैलावाणी राबतुया शेतकरी.  कोर, चतकोर जी काय आसंल ती मीठमिरची कशी खातूया.  ते का सांगावं ?  घाम गाळगाळून मेलो.  सावकारांचं याजच फिटत न्हाय.  यशवंतरावांनी कुळकायदा केला.  देवावाणी धावून आला.  पण सावकार काय बोकांडीचा हालंना.  त्याला काय करावं गुरुजी ?' तात्या म्हणाले.