यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ९-०५०७२०१२-३

असाच आणखी एक धक्का किसन मास्तरांनी दिला गावाला.  एका दिवशी बैलगाडीतनं बरंच आवजाड लोखंडी सांगाडं हिरीवर आलं.  लाकडाच्या पेट्यात हे लोखंड काय हाय ?  सारे पुन्हा कुतूहलानं बगायला लागले.  पांढरीवर धक्के, धक्के आणि धक्के बसत होते.  किसनगुरुजी शिकलेले.  शेजारच्या गावात शिक्षक.  पुरोगामी विचारांचे. सुधारणा करणारे.  पांढरीच्या हिरीला लागून त्यांनी पत्र्याची शेड बांधली.  जराशी खड्ड्यात बांधायला लागली.  हिरीचं पाणी उपसायचं आन् आता आता पिठाची चक्की.  बगता बगता फलटणातली माणसं आली.  त्यांनी भल्या मोठ्या चाकाच्या पुल्या, बारक्या चाकाच्या पुल्या, कापडाचं काळं पट्टं.  कुरुंदाच्या दगडांची जाती, त्याज्यावरती निळ्या रंगाची टोपी.  टोपीला फिरकी, भिंगरी, वर दाणं वतायला लोखंडी सोपासारखी चार सूपं एकमेकाला जोडल्याली.  इतभर नळी त्याला जोडून आत सोडलेली.  इंजिन चालू करायचे.  ते पट्ट्यानं गिरणीला जोडायचं.  शाळंला दांड्या मारून आम्ही पोरं हे बगत बसायचो.  तासन् तास.  तहान नाही का भूक नाही.  इंजिन आणि गिरण, बायांचं तर थवंच्या थवं पाखरावाणी यायचं. लांबनंच बगायचे.  डोक्यावरला पदर तोंडात धरीत 'बया, काय ह्ये आकरीत म्हणावं ?'  प्रत्येकीच्या चेहर्‍यावर चांदणं नुसतं फुलल्यालं.  हासू ओसंडून जात व्हतं.  सार्‍या बायांची पिढ्यान् पिढ्यांची ढोरमेहनत संपणार व्हती.  पहाटं उठायचं आन् जात्यावर दळणं टाकायची, पायली पायली रोज दळायचं.  जात्यावरल्या ओव्या प्रत्येकीच्या तोंडात रसवंती खुलवायच्या.  बरं असो, नको. म्हातारी असो, तरणी असो, की मुलगी, प्रत्येकीला दळावंच लागायचं. तर पीठ मिळणार. पीठ नसंल तर भाकरी कशी व्हणार ?  गरीब श्रीमंत, खालचा-वरचा, कुणी बी असू द्या. भाकरी लागतीच आन् भाकरीला पीठ. चुलीवर खरपूस भाकरी थापायची प्रत्येकाची आई.  पहाटे उठून जात्यावर दळण दळायची, पाणी भरायची, ती आईच.  म्हणून आई बैलासारखं राबायची.  या बाईची, आईची भावना होती.  यशवंतराव तिचा मुलगा होता.  तो पुढं मंत्री झाला आन् जलमाचं पांग फिटलं.  पिढ्यान् पिढ्याचं हातातलं जात सुटलं.  कंबरचा काटा ढिला व्हायचा दळून दळून, वर नवर्‍याच्या लाथा, सासूचा सासुरवास. सार्‍या जलमाचा वनवास तुम्हा मुलींना. त्या पिढीच्या यातना आता समजणार नाहीत.  आम्ही साक्षीला आहोत.  बामणाच्या बाईला दळायला लागायचं, आन् कुणब्याच्या बाईलाही दळायला लागायचं.  इंजिनानं ही क्रांती केली.  पांढरीवरल्या किसनानं गिरण बसावली.  इंजिनातनं काळा धूर बाहेर पडायचा.  त्या पायपीला ड्रायव्हरनं एक पालता जनमलचा गडू बसवला.  आन् काय जादू झाली सांगतो तुला, इंजिन सुरू झालं की सार्‍या गावांत ठोकठोकठोक असा दांडगा आवाज व्हायचा.  टुकटुक वाजायला लागली की, बाया पोरं आपआपली दळणं घेऊन गिरणीम्होरं रांगा लावून उभी र्‍हायाची.  दोन लाकडाच्या दांडक्यावर फुल्या मारलेल्या.  ड्रायवर गिरणीच्या आत, बाकी सारी बाहेर.  दळाप टाकलं की, जाती आवाज करत दळू लागत आन् गिरणीतलं पीठ डब्यात जमा व्हायला लागायचं.  वार्‍यानं पीठ सारीकडं उडायचं.  भिंती पांढर्‍याशिपत, ड्रायवर पांढराच पांढरा, दाडी, मिशा, केस, डोळं, तोंड-सारं पिठानं माखलेलं र्‍हायाचं. सारं गाव दळायला पांढरीवर जमत व्हतं.  हळूहळू इंजिनाची क्रांती गावोगाव पोहोचली.  दळण दळायला लागली, पाणी वडायला लागली.  सार्‍या शिवारातनं इंजिनच इंजिनं. प्रत्येकजण इरिशिरीनं इंजिन घ्यायला लागला.  यालाच क्रांती म्हणतात.  बदल.  बाबासाहेब म्हणाले व्हते तसा, रक्ताचा एक थेंबही न सांडता होणारा बदल.

हजारो वर्षांचा सीतामायचा वनवास.  उखान्यात बाया म्हणत,

'सीतामायचा वनवास बारा सालांचा,

आमचा सार्‍या जलमाचा वनवास की बाई...'

हा पिढ्यांचा वनवास संपायला आरंभ झाला.  'यशवंता, भाऊराया धावूनी आला, घास शेवटचा घालीते भाऊराया' आयाबहिनींना कष्टातून मुक्त करणारा यशवंत आम्ही लहान असताना पाहिला. तुझ्या पिढीलाही तो दिसावा, इतकंच.

सौ. वहिनी, बाबांना सप्रेम नमस्कार.

तुझा,
लक्ष्मणकाका