यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ८-२२-०६-२०१२-१

बा नुसती मान हालवीत व्हता.  काही समजून, काही ना समजून.  दोन पाट्या झाल्या असत्या, पण सुतावाणी सरळ झालेला काका बगणं हेच मोठं कौतिकाचं हाय.

'तर मी काय म्हणतो.  तुमा कैकाड्याची पाचपन्नास घरं आहेत. तुमाला गाव वचकून असतंया.  तवा तू मला मदत करतोस का ?'

'आवं, हे का बोलणं झालं, काका ?'  बा म्हणाला, 'काय बी सांगा की, फलटणला निहून सोडू काय ?'

'नाही रे बाबा, तुमी सर्वजण आहात म्हणून माझ्या जीवाला कसला धोका नाही.  गोष्ट येगळी हाय.'

'बोला, बोला की,' बा म्हणला.

'माझी आठ बिग्यात वीस एकर काळीभोर जमीन हाय.  ती हाय घोडेवाल्याकडं.  ती जमीन मी तुझ्या नावावर करतो.  तुला कूळ म्हणून दाखवतो.  रेकॉर्डचं माझं मी बगतो.  तुला कूळ म्हणून दाखवतो.  त्यातली तुला पाच एकर मोफत देतो.  उरलेली पंधरा एकर तू माझी मला परत दे.  तुझ्यावर विश्वास आहे म्हणून म्हणतोय.  तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल.  माझ्याही पोराबाळांचा आशीर्वाद तुला लागंल.  न्हाय म्हणू नको.'

'आव काका, मला गरीबाला का करायची जमीन ?  दोन पाट्या वळल्या ना की दोन पायल्या ज्वारी येतीया. जमीन करायची म्हंजी लय लडतरी.  बैलं करा, नांगरा, पेरा, काढा.  न्हाय काका न्हाय.  तुमी सारी जमीन देतो म्हणाला तरी न्हाय बा.  हे आपल्याला व्हयाचं न्हाय.  आम्ही घोडंवाल्याला घाबरत न्हाय, हे खरं हाय.  पण जमीन का करायची आम्हांला ?  आमच्यातलं कुणीच न्हाय तयार होणार जमीन घ्याला.  आवं, सोन्याची सुरी आसली म्हण काय झालं ?  उरात कुणी खुपशील का ?  तुमचं मैंदाळ उपकार हाईत आम्हा लोकावर. दुसरं काय बी सांगा.'

काका म्हणाला, 'हात तुझ्या लेका, देव आला द्यायला आन् पदर नाही घ्यायला.  चालू दे, चालू दे तुझं.  येतो मी.'  म्हणीत काकानं सायकलवर टांग टाकली.  फलटणकडे निघून गेला.  बामण गेल्याबरूबर बाजवळ आई आली नि इचारू लागली.  'काय म्हणत होता वो बामन ?'

बानं सारं आईला हाळू आवाजात सांगितलं.  'मग का न्हाई म्हणला ?  चांगलं झालं आसतं.  नशीबच फुटकं बगा.  एक म्हण आकलंचं काम करत न्हाय.  कसं चालून आलत नशीब.  तर माझंच कपाळ फुटकं' आईला फार वाईट वाटलं.

बानं जमिनीच्या  पाच एकरावर जणू पाणी फिरवलं होतं.

बा म्हणाला, 'आग येडे, बामन जवा एकांदी गोष्ट करायला सांगतू, ते बी आपणहून, तवा शान्यासारकं वागावं लागतं. बाकी समद्याचं येगळं आन् बामनाच येगळं. आपला समदा राग व्हटात आन् बामणाचा पोटात.  ते काय उगाच्या उगं जमीन द्याला उठला आसंन, ह्या लफड्यात काय गोच्याड नसंल ?  आपून गरीब कशाला आडकायचं असल्या कज्ज्यात ?  एक गाव उनं तर दस गाव पुणं.  काय ?'

आईनं मान हालवली आणि हे पुराण इथं संपवलं.  फुडं या जमिनीवरनं फार रामायण झालं.  पांडुरंग सस्त्याकडची जमीन आता बी कुणाला तरी वहिवाटीला दिली होती.  प्रत्यक्ष ताबा होता कुतवळाचा.  जमीन कुतवळच करत होते.  पण ती कुळं म्हणून व्हती पाटलाच्या नावानं.  कुतवळ म्हंजी वहिवाट माझी, जमीन माझी, पाटील म्हणे, कूळ मी आहे.  कागदोपत्री मालक मी आहे.  झालं, कलागत सुरू झाली.  पाटलांची आन् कुतवळांची बिग्यातल्या जमिनीवरनं तशी लढाईच जुंपली.  रोज मारामार्‍या, डोकी फुटायची.  रोज दोनचार दवाखान्यात.  पोलिस नाही का फिर्याद नाही.  बामणाची जमीन गावात एक नंबरचा तुकडा. प्रकरण कोर्टात गेलं.  दुसरी जमीन घोडंवाल्याकडं.  जमीनदारीचा थाट होताच.  कुळकायद्यानं आता घोडंवाला मालक झाला.