यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ८-२२-०६-२०१२-४

तेथे खुल्या जमिनीवरी एक जख्ख झालेली म्हातारी खालीवर पासोडी घालून कण्हत पडलेली होती.  तिच्या उशाशी थोड्याशा साळीच्या लाह्या व पितळीखाली वाटीत वरणाच्या निवळीत जोंधळ्याची भाकर कुसकरून केलेला काला व पाणी भरून ठेवलेला तांब्या होता.  शेजारी पाण्यात तहाने मूल टाहो फोडून रडत पडले आहे.  याशिवाय कोठे मुलांच्या मुताचा काळा ओघळ गेला आहे.  कोठे पोराचा गु काढल्यामुळे लहानसा राकेचा पांढरा टवका पडला आहे.  घरातील कित्येक कोनेकोपरे चुना-तंबाकू खाणार्‍यांनी पिचकार्‍या मारून तांबडेलाल केले आहेत.  एका कोपर्‍यात तिघीचौघींचे भलेमोठे जाते रोविले आहे.  दुसर्‍या कोपर्‍यात उकळाशेजारी मुसळ उभे केले आहे.  आणि दाराजवळील कोपर्‍यात केरसुणीखाली झाडून लावलेल्या कचर्‍याचा ढीग साचला आहे.  ज्यावर पोरांची गांड पुसलेल चिंधी लोळत पडली आहे.  इकडे चुलीच्या भाणुशीवर खरकटा तवा उभा केला आहे.  आवलावर दुधाचे खरकटे मडके घोंगत पडल आहे.  खाली चुलीच्या आळ्यात एके बाजूला राखेचा ढीग जमला आहे.  त्यामध्ये मनी मांजरीने विष्ठा करून तिचा मागमुद्दा नाहीसा केला आहे.  चहूकडून भिंतीवर ढेकण पिसा मारल्याची तांबूस रंगाचे पुसट डाग पडले आहेत.  त्यातून कोठे पोरांचा शेंबूड व कोठे तपकिरीच्या शेंबडाचे बोट पुसले आहे.

एका देवळीत आतले बाजूस खात्या तेलाचे गाडगे, खोबरेल तेलाचे मातीचे बुटकुले, दांतवणाची कळी, शिंगटाची फणी, तखलादी आरशी, काजळाची डबी आणि कुंकवाचा करंडा एके शेजेनी मांडून ठेविल्या आहेत व बाहेरच्या बाजूस देवळीच्या किनार्‍यावर रात्री दिवा लावण्याकरिता एकावर तर तीनचार दगडांचे दिवे रचून उतरंड केली आहे.  त्यातून पाझरलेल्या तलाचा ओघळ खाली जमिनीपावेतो पसरला आहे.  त्या सर्वांचे वर्षातून एकदा आषाढ वद्य अमावास्येस कीट निघावयाचे.  दुसर्‍या देवळीत पिठाच्या टोपल्याशेजारी खाली डाळीचा कणुरा व शिळ्या भाकरीचे तुकडे पडले आहेत.  तिसर्‍या देवळीत भाकरीच्या टोपल्या शेजारी थोड्या हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, दुधाचे शिंप व आंब्याच्या करंड्या पडल्या आहेत.  ज्यावर माश्या व चिलटे बसून एकीकडून खातात व दुसरीकडून त्याजवर विष्ठा करीत आहेत.  आणि चौथ्या देवळीत सांधलेल्या जुन्या वाहनांचा व जोड्यांचा गंज पडला आहे.  शेजारी चकमकीचा सोकटा व गारेचे तुकडे पडले आहेत.  एका खुंटीवर अंथरावयाच्या जुन्या जीर्ण झालेल्या घोंगड्या व चवाळीं ठेवल्या आहेत.  दुसरीवर पांघरावयाच्या गोधड्या व पासोड्या ठेवल्या आहेत,  तिसरीवर फाटके मांडचोळणे व बंड्या ठेवल्या आहेत.  नंतर माजघराचे खोलीत जाऊन पाहतो तो जागोजाग मधल्या भिंतीला लहानमोठ्या भंडार्‍या आहेत.  त्यातून एका भंडारीस मात्र साधे गावठी कुलूप घातले होते.  येथेही जागोजाग खुंट्यांवर पांघरुणांची बोचकी व सुनाबाळांचे झोळणे टांगले आहेत.  एका खुंटीला घोडीचा लगाम, खोगीर, वळी व रिकामी तेलाची बुधली टांकली आहे.  दुसरीला तेलाचा नळा टांगला आहे.  शेवटी एका बाजूला भिंतीशी लागून डेर्‍यावर डेरे व मडकी रचून पाच उतरंडी एके शेजेनी मांडल्या आहेत.  शेजारी तुळईला दोन मोळाची शिंकी टांगली आहेत.  त्यावर विरजणांचे व तुपांचे गाडगे झाकून ठेविले आहे.

अलीकडे भला मोठा एक कच्चा विटांचा देव्हारा केला आहे.  त्याच्या खालच्या कोनाड्यात लोखंडी कुर्‍हाडी, विळे आणि विळी पडली आहे.  वरती लहानसे खारवी वस्त्र अंथरून त्यावर रुप्याचे कुलस्वामीचे टाक एके शेजेनी मांडले आहेत.  त्यांच्या एके बाजूस दिवटी बुदली उभी केली आहे व दुसरे बाजूस दोम दोम शादावलाची झोळी, फावडी उभी केली आहे.  वरती मंडपीला उदाची पिशवी टांगली आहे.  खाली बुरणुसावर शेतकर्‍यास गाढ झोप लागून घोरत पडला आहे.  एका कोपर्‍यात जुनी बंदुकीची नळी व फाटक्या जेणासहीत गादीची वळकुटी उभी केली आहे.  दुसर्‍या कोपर्‍यात नांगराचा फाळ, कुळवाच्या फाशी, कोळप्याच्या गोल्हया तुरीची गोधी व उलटी करून उभी केलेली ताक घुसळण्याची रवी आणि तिसर्‍या कोपर्‍यात लवंगी काठी व पहार उभी केली आहे.  सुमारे दोन तीन खणात तुळ्यांवर बकान व शेराचे सरळ नीट वासे बसवून त्यावर आडव्या तिडव्या चिंचेच्या फोकाट्यांच्या पटईवर चिखलमातीचा पेंड घालून मजबूत माळा केला आहे.  ज्यावर राळा, राजगिरी, हुलगा, वाटाणा,  पावटा, तीळ, चवळी वगैरे अनेक भाजीपाल्यांचे बी डेर्‍यातून व गाडग्यातून भरून ठेविले आहे.  वरती कांबिर्‍याला बियाकरिता मक्याच्या कणसाची माळ लटकत असून पाखाडीला एके ठिकाणी चारपाच वाळलेले दोडके टांगले आहे.  दुसर्‍या ठिकाणी दुधा भोपळा टांगला असून तिसर्‍या शिंक्यावर काशीफळ भोपळा ठेवला आहे.  चौथ्या ठिकाणी नळ्यासुद्धा चाडे व पाबारीची वसु टांगली आहे.  कित्येक ठिकाणी चिंद्याचांद्यांची बोचकी कोंबली आहेत.  मध्ये एका कांबीर्‍याला बाशिंगे बांधली आहेत.  वरती पाहावे तर कौलाचा शेकार करण्यास तीनचार वर्षे फुरसत झाली नाही व तयाचे खालचे तुराट्याचे ओमन जागोजाग कुजल्यामुळे गतवर्षी चिपाडाने सांधले होते म्हणून त्यातून कोठेकोठे उंदरांनी बिळे पाडली आहेत.  एकंदर सर्व घरात स्वच्छ हवा घेण्याकरिता खिडकी अथवा सवाना मुळीच कोठे ठेविला नाही.  तुळ्या, कांबीरे, ओमनासहीत वाशांवर धुराचा डांबरी काळा रंग चढला आहे.  एकंदर सर्व रिकाम्या जागेत कातीनीने मोठ्या चातुर्याने अतिसुकुमार तंतूंनी गुंफलेली मच्छरदाणीवजा आपली जाळी पसरली आहेत.