सुप्रिया, तुला सांगतो. यशवंतरावांनी हा कायदा काही स्वतःच्या पोरालेकरांसाठी केला नव्हता. जो जो प्रत्यक्ष राबतो, घाम गाळतो, त्या शेतकर्यासाठी क्रांतिकारक कायदा होता. तो कोणत्या स्थितीत होता, हे आपल्या सर्वांचे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या शब्दातच पाहू या. काय स्थिती होती शेतकर्यांची ? स्वातंत्र्य मिळालं ते केवळ राजकीय नव्हतं. आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्यही होतं. एका वर्गानं दुसर्या वर्गाची लूट करणं म्हणजे स्वातंत्र्य नाही. एका जातीनं दुसर्या जातींना लुटणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं. तो होता एक राजकीय, सामाजिक, आर्थिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा कायदा. पण याचा फारसा विचार आपल्या शहाण्यासुरत्या विद्वानांनी, पुढार्यांनी केला नाही. तो कायदा कोणत्या स्वरूपात आला, तो कोणा एका जातीच्या विरोधात होता काय ? १९४८ सालच्या दंगलीत ज्यांचं नुकसान झालं व्हतं त्यांची भरपाईही यशवंतरावांनीच दिली व्हती. ते यशवंतरावच व्हते. जातीपातीच्या पलीकडे गेलेले यशवंतराव महात्मा फुल्यांना अभिप्रेत असलेला, डॉ. बाबासाहेबांनी संविधानात दिलेला नवा समाज निर्मिण्याचं काम करणारे व्हते. तर काय सांगत व्हतो, महात्मा फुल्यांनी काय स्थिति सांगितली व्हती शेतकर्यांची, ती पाहूया. 'शेतकर्याचा आसूड' या त्यांच्या पुस्तकामध्ये अतिशय कष्टप्रद असं शेतकर्याचं जीवन उभं केलं आहे. ते म्हणतात,
''एक कुळवाडी एके दिवशी नदीच्या किनार्याजवळच्या हवाशीर दाट आंबराईतील कलेक्टरसाहेबांच्या कचेरीच्या तंबूकडून, मोठ्या रागाच्या त्वेषात हातपाय आपटून, दातओठ खात आपल्या गावाकडे चालला आहे. ज्याचे वय सुमारे चाळिशीच्या भरावर असून हिमतीत थोडासा खचल्यासारखा दिसत होता. डोईवर पीळदार पंचाचे पांढरे पागोटे असून त्यावर फाटक्या पंचाने टापशी बांधलेली होती. अंगात खादीची दुहेरी बंडी व गुढवेचोळणा असून पायांत सातारी नकटा जुना जोडा होता. खांद्यावर जोट, त्यावर खारवी बटवा टाकला असून, एकंदर सर्व कापड्यांवर शिमग्यांतील रंगाचे पिवळेतांबूस शिंतोडे पडलेले होते. पायांचया टाचा जाड व मजबूत होत्या खर्या, परंतु काही काही ठिकाणी उकलून भेगा पडल्यामुळे थोडासा कुलपत चालत होता. हाताच्या कांबी रुंद असून, छाता पसरत होता, चोटीशिवाय भवूक दाढीमिशा ठेवल्यामुळे वरील दोन दोन फाळ्या दातांचा आयब झाकून गेला होता. डोळे व कपाळ विशाल असून आतील बुबूळ गारोळें भोर्या रंगाचे होते. शरीराचा रंग गोरा असून एकंदर सर्व चेहरामोहरा ठीक बेताचा होता, परंतु थोडासा वाटोळा होता. सुमारे बारावर दोन वाजल्यावर घरी पोहोचल्यावर जेवण झाल्यानंतर थोडासा आराम करण्याचे इराद्याने माजघराचे खोलीत जाऊन तेथे वलणीवरील बुरणूस घेऊन त्याने जमिनीवर अंथरला आणि त्यावर उशाखाली घोंगडीची वळकटी घेऊन तोंडावर अंगवस्त्र टाकून निजला, परंतु सकाळी उठून कलेक्टरसाहेबांची गाठ घेतली व ते आपल्या चहापाण्याच्या व खाण्यापिण्याच्या नादांत गुंग असल्यामुळे, त्यांच्याने माझी खरी हकिकत ऐकून घेऊन, त्याजपासून मला हप्ता पुढे देण्याविषयी मुदत मिळाली नाही. या काळजीने त्यास झोप येईना, तेव्हा त्याने उताणे पडून आपले दोन्ही हात उरावर ठेवून आपण आपल्याच मनाशी बावचळल्यासारखे बोलू लागला-
'इतर गावकर्यांसारखा मी पैमाष करणार्या भटकामगारांची मूठ गार केली नाही, यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर वाढविला व त्याच वर्षी पाऊस अळमटळम पडल्यामुळे एकंदर सर्व माझ्या शेत व बगाइती पिकास धक्का बसला. इतक्यात बाप वारला व त्याच्या दिवसमासाला बराच खर्च झाला, यामुळे पहिले वर्षी शेतसारा वारण्यापुरते कर्ज ब्राह्मण सावकारापासून काढून त्यास मळा गहाण देऊन रजिस्टर करून दिला. पुढे त्याने मन मानेल तसे, मुद्दल कर्जावरील व्याजाचे कच्च्यांचे बच्चे करून माझा बारवेचा मळा आपल्या घशांत सोडला. ज्या सावकाराच्या आईचा भाऊ रेव्हेन्यूसाहेबांचा दप्तरदार, चुलता कलेक्टरसाहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा मुनसफ आणि बायकोचा बाप या तालुक्याचा फौजदार, याशिवाय एकंदर सर्व सरकारी कचेर्यांत त्यांचे जातवाले ब्राह्मणकामगार, अशा सावकाराबरोबर वाद घातला असता, तर त्याच्या सर्व ब्राह्मण आप्तकामगारांनी हस्तेपरहस्ते भलत्या एखाद्या क्षुल्लक कारणावरून माझा सर्व उन्हाळा केला असता. त्याचप्रमाणे दुसरे वर्षी घरांतील बायकामुलांच्या अंगावरील किडूकमिडूक शेतसार्याचे भरीस घालून नंतर पुढे दरवर्षी शेतसारा अदा करण्याकरिता गावातील गुजर-मारवाडी सावकारांपासून कर्जाऊ रकमा काढल्या आहेत, त्यांतून कित्येकांनी हल्ली मजवर फिर्यादी ठोकल्या आहेत व ते कज्जे कित्येक वर्षांपासून कोडतांत लोळत पडले आहेत. त्याबद्दल म्या कधी कधी कामगार व वकिलांचे पदरी आवळण्याकरिता मोठमोठाल्या रकमा देऊन, कारकून, चपराशी, लेखक व साक्षीदार यांस भत्ते भरून चिर्यामिर्या देता देता माझ्या नाकास नळ आले आहेत. त्यांतून लांच न खाणारे सरकारी कामगार कोठे कोठे सापडतात. परंतु लांच खाणार्या कामगारांपेक्षा, न लांच खाणारे कामगार फारच निकामी असतात. कारण ते बेपर्वा असल्यामुळे त्यांजवळ गरीब शेतकर्यांची दादच लागत नाही व त्यांच्या पुढे पुढे करून जिवलग गड्याचा भाव दाखविणारे हुशार मतलबी वकील, त्यांच्या नावाने आम्हा दुबळ्या शेतकर्यांजवळून कुत्र्यासारखे, लांचांचे मागे लांचांचे लचके तोडून खातात. आणि तसे न करावे तर सावकार सांगतील त्याप्रमाणे आपल्या बोडक्यांवर त्यांचे हुकूमनामे करून घ्यावेत. यावरून कोणी सावकार आता मला आपल्या दारापाशी उभे करत नाहीत ! तव्हा गतवर्षी लग्न झालेल्या माझ्या थोरल्या मुलीच्या अंगावरील सर्व दागिने व पीतांबर मारवाड्याचे घरी गहाण टाकून पट्टीचे हप्ते वारले. त्यामुळे तिसा सासरा त्या बिचारीस आपल्या घरी नेऊन नांदवीत नाही. अरे, मी, या अभागी दुष्टाने, माझ्यावरील अरिष्ट टाळण्याकरिता माझ्या सगुणाचा गळा कापून तिच्या नांदण्याचे चांदणे केले ! आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून ? बागाइतांत नवीन मोटा विकत घेण्याकरिता जवळ पैसा नाही.