यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ७-१६ जून २०१२-१

'आरं, बगितलयास की त्यानला.'

मी माझा हट्ट सोडत नव्हतो.  धोतराचा सोगा धरून रडत होतो.  

आई कळवळून म्हणाली, येवढं पॉर कळवळून रडतया तर का न्हाई नेत ?  बानं माझं गठुळं उचाललं आन् खांद्यावर मारलं.  निघालो पाय पाय बोडक्याच्या वाडीला.  एका कोपर्‍यातलं हे गाव निरगुडीपास्नं दोन कोस तर गिरवीपास्नं कोसभर.  आम्ही माळावरनं झपाझपा चालत निगालो.  सारी पोरं, मास्तर, गावकरी पायपाय चालत निगालेते.  जत्रंवाणी गर्दी झाली.  ज्यो त्यो यशवंतरावांचं गुणगान गात व्हता.  बेलिपाचा पोरगा.  बेलिप म्हंजे काय ?  मला ठाव नव्हतं.  इचारायची सोय बी नव्हती.  सारी गर्दी बोडक्याच्या वाडीला सरकत व्हती.  साळेचं उद्‍घाटन हे निमित्त.  बाकी सारी माणसं जमली होती ते यशवंतरावांचं भाषण ऐकायला.  बाच्या खांद्यावर बसून चालण्यात फार मजा असते.  तू कधी बाबांच्या बसली असशील काय ?  अशी माळरानातल्या वाटेनं चालली असशील काय ?  गंमत असते !  मजेत बा शीळ वाजवीत असतो.  मला त्याच्या डोक्यावर खरं तर ठेका धरायचा असतो.  त्यावेळी 'विठ्ठला तू वेडा कुंभार' हे गाणं खूप प्रसिद्ध होतं.  बा तेच गुणगुणत होता.

आम्ही आसं पाहोचलो, तर गर्दीऽऽ ही मरणाची.  कोण पुढं जाऊ देणार ? तेवढ्यात पोलिसांच्या शिट्ट्या वाजू लागल्या.  लाल दिव्याच्या गाड्या भरवेगात कार्यक्रमाच्या जागी आल्या.  खडाखडा गाड्यांचे दरवाजे वाजले.  पांढर्‍या कापडांतली डझनानं पुढारी माणसं स्टेजवर आली.  स्टेज म्हणजे शाळंच्या वरांड्याला धरूनच बांधलेलं लाकडी फळ्यांचं मचान. सारी माणसं उठल्यानं धूळ उडाली.  तसं माईक सांगू लागला, 'खाली बसा, खाली बसा'. माणसं खाली बसली.  शाळंतल्या मुलांनी कण्हेरीच्या फुलांची आरास केली व्हती.  कमानीला लावलेल्या सिंद्धीच्या झाडांच्या फडांना रंगीबेरंगी चुरमुरे चिकटवलेले.  सुंदर फुलांच्या गुच्च्यासारखे ते दिसत व्हते.  सार्‍यांच्या नजरा पोरांच्या सजावटीनं सुखावल्या होत्या.  आंब्याच्या पानांची तोरणं, झेंडूच्या माळा, मखमलीच्या फुलांचा सुवास चारी बाजूनं दरवळत व्हता.  गावातल्या पुढार्‍यांनी मंत्र्यांचे स्वागत केलं.  हारतुरे झाले, आमच्या शाळंतल्या पोरांनी स्वागतगीत फार छान म्हटलं.  त्यात जगताप गुरुजींचा ऊर अभिमानानं भरून आलाता.  सारी पोरं, गुरुजी खुशीत व्हते.  आमच्या शाळंला मान मिळाला होता ना !  सभा सुरू व्हती.  कमालीची शांतता व्हती.  शिवारात कुणाच्या तरी मळ्यात विहिरीवर मोट चालली व्हती.  तिच्या चाकाचा कुईकुई असा छान आवाज येत व्हता.  मोटकरी आपल्या बैलांना रिजवीत मोठ्या खड्या आवाजात मोटंवरचं गाणं म्हणत व्हता.  शेतकर्‍याच्या या स्वागतानं यशवंतराव भलतेच खूश दिसत व्हते.  खेड्यापाड्यातले शिक्षक, विद्यार्थी, हजार-दोन हजार ग्रामस्थ जमलेले.  सार्‍यांच्या डोक्यावर गांधी टोपी असल्यानं सभा पांढर्‍या टोपीतल्या बगळ्यांनी सजवल्यासारखी दिसत व्हती.  माझी सारखी चुळबूळ चालली व्हती.  अखेर बानं मला खांद्यावरनं खाली उतरवलं.  मी गर्दीतनं वाट काढत माझ्या शाळेतल्या पोरांच्या घोळक्यात सामील झालो.  तवा बरं वाटलं.  यशवंतराव बोलायला उभे राहिले.

'गड्यांनो, यायला जरा उशीर झाला.  तुम्हाला उन्हात बसवून मी उशिरा आलो.  येताना त्या मोटकर्‍याची झिल मला तुम्हापर्यंत यायला देईना.  गाडी थांबवली, बांधाबांधानं विहिरीकडं गेलो.  तर हा पंढरीचा विठूराया शेताला पाणी देण्यात दंग.  कुणीतरी पुढारी येतोय हे त्याच्या ध्यानात बी नव्हतं.  मी विहिरीच्या काठाला उभा राहून मोटंवरलं गाणं ऐकत खिनभर उभा राहिलो.  त्यानं मला पाहिलं.  धावत आला.  मिठी मारली.  गळाभेट झाली.  मला पंढरीची वारी झाली.  त्याची अस्तुरी गुडघाभर चिखलातनं आली.  पोरं दोन-तीन दारी धरीत होती.  गुउघ्याएवढी पोरं आईबापाला मदत करीत होती.  शेतकरी मोट सोडून 'ह्या आलोच सभेला' म्हणून बैलं सोडू लागला.  त्याला मी अडवला.  काम सुरू ठेवायला सांगितलं.  पोरं शाळंत घालायला सांगितलं.  आन् धावत आलो.'

हे म्हटल्याबरूबर टाळ्यांचा नुसता पाऊस पडला.  हिरीवरचं चाकाचं वाजणं, तारस्वरातलं मोटकर्‍याचं गाणं चालूच होतं.  सुप्रिया, तेव्हा इंजिनं नव्हती.  मोटंनंच रानं भिजवायची.  बागायती जवळपास नसायची.  तुला सांगतो, क्वचितच गावातल्या शिवारात एखाद्या शेतकर्‍याकडं बागायती व्हती.  बाकी सारी रानं जिरायती.  पावसाच्या जिवावर पिकणारी.  त्यानं शेतकर्‍याघरी अठराविश्व दारिद्रय.  अन्नदात्याच्याच पदरात पसाभर पडत आसंल तर बाकीच्यांना काय मिळणार ?  शाळा नावाला व्हत्या.  पाच-पाच दहा-दहा मैलांवर शाळा असायची.  गोरगरिबांची, खेड्यापाड्यातली पोरं कशी शिकणार ?  त्यानं सारेच अडाणी.  यशवंतरावांसारखा नेता म्हणजे या जनतेच्या नाडीवर बोट असणारा नेता.  संवेदनशीलता म्हंजे काय, ते मोठा झाल्यावर मला कळायचा लागलं.  ही संवेदनशीलता आज औषधालाही सापडत नाही राजकारणात, समाजकारणात.