एकदा आळंदीला काँग्रेसजनांचं शिबिर होतं. त्या वेळी आम्ही आळंदीला गेलो. सौ. वेणूताई व मी (काँग्रेसचे तसे सक्रिय मेंबर नसल्यामुळे) अर्थातच शिबिराला गेलो नाही. तेव्हा आम्ही दोघीच कितीतरी वेळ गप्पा मारीत आळंदीतल्या एका देवळात बसलो होतो. शिबिराकडून आक्का आणि साहेब परतल्यावर मी विचारलं होतं, ‘‘किती वेळ आम्ही दोघींनी ज्ञानदेवाची तीच पोज बघत बसायचं? मुक्ताईनं या वेळात कितीतरी मांडे भाजून काढले असतील ज्ञानदेवाच्या पाठीवर !....आम्ही दुस-या सर्व देवळांमधून जाऊन येऊ शकलो असतो की सहज...’’ यावर सारेच हसले होते.
चव्हाण साहेबांनी आम्हा सर्वांवरच मनापासून प्रेम केलं. ज्या वेळी ते आमच्याशी बोलत त्या वेळी त्यांची नजर प्रेमानं, कौतुकानं ओथंबलेली अशी असायची. गंभीरही व्हायचे कधी कधी, नाही असं नाही. आमची आई गेल्यानंतर ते तसे ब-याच कालावधीनंतर आले होते. तरी सर्वांचीच मनं या वेळी भरून आली होती. आम्हाला खुद्द साहेबांबद्दल नाही म्हटलं तरी काळजीच वाटत होती. कारण राजकीय दृष्ट्या ते तेव्हा सुपरिचित अशा कुंपणावरच्या स्थितीत होते. आणि सौ. वेणूतार्इंची तब्येतही तेव्हा काळजी करावी अशीच होती. त्यामुळे त्या काळजीचाही ताण त्यांच्यावर पडलेला स्पष्ट दिसत होता. तब्येत खरकलेली दिसत होती... काही प्रसंगी शब्द मुके होतात. अशा वेळी वातावरणातला एकूण जडपणा हलका करण्यासाठीच शब्दांचा आसरा शोधला जातो. त्यानुसारच माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘चहा घेणार ना?’’
तेव्हा कुठं ते नेहमीप्रमाणे हसून म्हणाले, ‘‘हो, स्वत: कर. आणि साखर कमीच बरं का. एक छोटा चमचा.’’
...असे कितीतरी प्रसंग आठवणीत साठवलेले आहेत. स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेच्या वेळी त्यांनी हाती घेतलेला मंगल कलश हिमालयाच्या संकटकाळी त्याच्या संरक्षणासाठी सह्याद्रीचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी घेतलेली धाव, त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून केलेली कामगिरी, सगळ्या धकाधकीच्यास जीवनात देखील सतत जिवंत ठेवलेली रसिकता, आणि ठेवलेला व्यासंग, मधूनमधून केलेलं लेखन आणि आवर्जून ऐकावीत अशी त्यांची उत्कृष्ट भाषणं..अशा कितीतरी गोष्टी आहेत, की ज्यांच्या आठवणीनं कोणाही मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येईल?
चव्हाणसाहेबांच्या बाबतीत माझ्या मनात नेहमी विचार येत असे, की ताश्कंदला लालबहादूर शास्त्रींचा अगदी आकस्मिक अनपेक्षित मृत्यू घडला तेव्हा, त्या दौ-यात त्यांच्याबरोबर असलेल्या चव्हाणसाहेबांनी हे दैवाचं भयाण नाट्य कसं सहन केलं असेल?.. त्यांना तेव्हा काय वाटलं असेल.. या प्रश्नाचं उत्तर सौ. तार्इंच्या मृत्यूनंतर आम्ही तिघी बहिणी त्यांना भेटायला गेलो त्या वेळच्या त्यांच्या व्याकूळ नजरेत मिळालं... इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर टी. व्ही पाहात असताना घडलेल्या तीन मूर्ती भवनात दिसलेल्या त्यांच्या खचून वाकून उभ्या राहिलेल्या आकृतीच्या दर्शनात मिळालं !