मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३७

१३७. सायेब आमचे मायबाप – सरवर (साहेबांचा नोकर)

सायेब आमचे धनी, आम्ही नोकर, सायेबांचा स्वभाव फार प्रेमळ. त्यामुळे त्यांनी दिल्लीला येतोस का म्हटल्यावर मी त्यांचेबरोबर आलो. त्यांनी मला मुलासारखे सांभाळले. माझे लगीन करून दिले.

माझ्या मुलाचे नाव त्यांनी सलीम ठेवले व त्याचे पालनपोषण केले. बाईसायेब फार लाड करीत. त्याला तरू बाळ म्हणत.

बाईसायेब तर खरोखर माऊली होत्या. त्यांचे मन फार मोठे होते. इतके की, आकाश त्यात झाकून जाईल! रोज सकाळी त्या चारला उठायच्या. देवाची पूजा स्वत: करायच्या. रांगोळी काढायच्या. नेपाळच्या शंकराची आरती करायच्या. त्या सणाचे दिवशी दानधर्म करणार. रोज सर्व नोकरांना नाष्टा देऊन मग दिवसाचे काम सुरू करणार.

माझी आई आजारी पडली तर सायेबांनी व बाईसायेबांनी मला प्लेनने मुंबईला पाठवले. त्यांचे फार उपकार.

आई मेली तरी मी नंतर गेलो नाही. बाईसायेब आजारी तर कसा जाऊ? बाईसायेबांनी तर पालनपोषण केले मग त्यांना बरे नसताना कसा जाणार?

सायेबांचे घरी आम्ही नोकर घरच्याप्रमाणे. मी मुसलमान पुण्याचा. गंगाराम नेपाळचा. वासू मंगलोरचा. नारायण राणीखेतचा. मोहनिंसग हरयाणाचा. विनोद लुधियानाचा. शेखर व घनश्याम गढवालचे. सगळे वेगवेगळ्या धर्माचे. पण सायेबांचे दरबारी सर्व एकत्र. ते सर्वांना सांभाळून घ्यायचे. आमचे हे धनी फार प्रेमळ. आम्हाला ते नोकर न मानता कुटुंबातले मानायचे. आमच्यावर त्यांचा फार जीव होता.

पण सायेब गेले. बाईसाहेब गेल्या. आम्ही पोरके झालो. देऊळ राहिले. पण विठ्ठल रखुमाई? आम्ही कुणाचे दर्शन घ्यावे? चांदीचे ताटात आम्हाला सोन्याच घास देणारे गेले. आम्ही कुणाकडे पाहावे?

त्यांच्याबरोबर ३५ वर्षे राहिलो. दिवस कसे गेले कळले नाही. पण आता दिवस जाता जात नाहीत. मन भरून येते.

शेवटी मी स्वत: त्यांची सगळी सेवा केली. आज ते स्वप्नात येतात. पण समोर का येत नाहीत?