मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १००-१

त्यानंतर सरकारी घोषणा होऊनही दोन-तीन वर्षे होऊन गेली. सन १९५९-६० साल उजाडले. त्या वर्षी महापौर श्रीयुत वासुदेव बळवंत गोगटे हे झाले होते. त्यापुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना त्यात रु.१० (दहा लाख) लाखाची तरतूद करण्यात आली होती. ह्या बजेट तरतुदीचा आधार घेऊन श्री.गोगटे यांनी संधी साधून माननीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री हे पुण्यात आले असताना त्यांची सर्किट हाऊसवर भेट घेतली. भेटीच्या वेळी मी त्यांच्याबरोबर होतो. भेट सकाळी ११ चे सुमारास झाली. भेटीच्या वेळी अंदाजपत्रक ना.यशवंतराव यांना दाखविले व का भेटीस आलो याचे कारणही सांगितले. मागे दोन-तीन वर्षांपूर्वी केलेल्या सरकारी घोषणेचाही उल्लेख करून आठवण करून दिली. त्यावर मुख्यमंत्री हसले व म्हणाले, ‘‘अहो गोगटे साहेब, काय म्हणावे तुम्हाला व तुमच्या महानगरपालिकेला? अहो ते आश्वासन दोन-तीन वर्षांपूर्वीचे आहे. आता काळ बदलला आहे. तुम्हाला माहीत आहे की,महाराष्ट्र-गुजराथ यांचे फाळणीचे काम सुरू झाले आहे !

काही आयोग नेमून त्यांचे कार्य सुरू झाले आहे. निरनिराळ्या विषयांच्या फाईल्स काढल्या असून त्यांचीही फाळणी करण्याचे काम चालू आहे. शिवाय फायनान्स हे खाते आज ना.जीवराज मेहता यांच्या हाती आहे. अशा परिस्थितीत तुमच्या स्टेडियमसाठी जी रक्कम द्यावयाची ती कोण देणार? आम्ही सर्व जण फाळणीमध्ये गुंतून राहिलो आहोत. शिवाय दुसरी एक अडचण पुढे आली आहे. अशा त-हेची आर्थिक मदत (ग्रॅंट) एकट्या पुणे शहराला सरकारने का म्हणून द्यावयाची असाही प्रश्न पुढे आला आहे. त्याबरोबर राज्यातील इतर शहरांचाही विचार करावयास पाहिजे. अशा वातावरणात तुमचा प्रश्न कोण हाती घेईल! आपण इतके वर्षे जसे थांबलात तसेच आणखी दोन-तीन वर्षे थांबा. त्यानंतर ही परिस्थिती निवळेल आणि त्यानंतर सरकार याबद्दल विचार करील.’’

ना. यशवंतरावांचा हा उपदेश ऐकून घेतल्यावर महापौर उठले व आम्ही दोघेही शून्य मनाने बाहेर पडलो.