९७. एक अगत्यशील प्रशासक – श्री. प. मराठे
श्री. यशवंतराव चव्हाण हे मला चांगले ओळखीत होते आणि मीही त्यांना चांगला ओळखीत होतो. पण ही ओळख राजकारणी मुत्सद्यांमधील नव्हे किंवा घरगुती स्वरूपाचीही नव्हे. तर श्री. यशवंतराव एक मंत्री व मी एक सनदी नोकर यांमधील ती ओळख होती. तरीही त्यांच्या स्वभावाचे निरनिराळे पैलू स्पष्ट होतील असे थोडेफार प्रसंग आमच्या एकूण पंधरा सतरा वर्षांच्या ओळखीत घडलेले आहेत.
सन १९६४ मी सांगलीला सुपरिंटेण्डेण्ट ऑफ पोलीस (S.P) असतांची गोष्ट आहे. यशवंतराव त्या वेळी गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री नव्हते. ते सकाळी सांगलीस आल्यावेळी त्यांच्या स्वागताकरिता प्रोटीकोलप्रमाणे मी हजर होतो. परत आल्यावर सुमारे तास दीड तासाने मला त्यांचेकडून बोलावणे आले. मी गेलो. त्यांनी मला एका वेगळ्या खोलीत बोलावून घेतले व आपले म्हणणे सांगितले.
यशवंतराव : अहो त्या xxx एम् .एल्. ए. वरील अफरातफरीची फिर्याद काढता येईल का?
मी : हे सद्गगृहस्थ हरिजन असून एका मल्टिपरपज सोसायटीचे चेअरमन आहेत. ते सेशनमध्ये असताच्या काळातल्या हिशेबांवर त्यांनी सह्या केल्या आहेत व त्या काळातील तारखांचे सांगली मुक्कामाचे चेकही दिले आहेत. अकाऊंटन्ट पैसे खाऊन गायब झाला आहे. सदर M.L.A नी पैसे खाल्लेले नाहीत. पण सकृतदर्शनी ते दोषी आहेत. त्यांना आरोपी न केल्यास अकाऊंटटचा बचाव असा राहील की चेअरमनने पैसे खाल्ले आणि माझा बळी जात आहे. शिवाय कोर्ट पोलिस ताशेरे झाडण्याचाही संभव आहे. मी कागदपत्र स्वत: वाचले आहेत. मी इतकेच करू शकतो की, कोर्टाने त्या M.L.A ना डिस्चार्ज केल्यास सरकारी वकील हरकत घेणार नाही. त्याची हमी मी घेतो. या उपरही त्यांचेवरील फिर्याद काढून घ्यावी असे आपले म्हणणे असेल तर सरकारी लेखी आदेश असणे आवश्यक आहे असे मला वाटते.
श्री यशवंतराव :- अन्याय्य आदेश सरकार कसा देईल?
म्हणजे त्या प्रकरणावर पडदा पडला. मंत्री असतानाही त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होती, नाही का?
सन १९६४ सालीच दिवाळीचे दिवसांत त्यांना मी फराळाचे आमंत्रण दिले व श्री. वसंतदादा पाटील यांनी त्यांना वेळात वेळ काढून आमचेकडे आणावे असे ठरले. त्याप्रमाणे एका सायंकाळी ते हजर झाले. माझा मोठा मुलगा मनोहर हा उत्तम कविता करीत असे. वयाचे आठवे वर्षापासून त्याचा हा छंद होता त्याचा ‘‘फुलोरा’’ नावाचा संग्रह प्रसिद्ध झाला होता. तो त्यांना चाळण्यासाठी मी दिला. यशवंतरावांनी आधी फराळ न करता तो कवितासंग्रह चाळला व आपला अभिप्राय दिला. तो खालीलप्रमाणे:-
चि.मनोहर मराठे यास अनेक आशीर्वाद.
तुझ्या कविता आज चाळून पाहिल्या. कवी जन्मावा लागतो असे जे म्हणतात ते तुझे वय व तुझ्या कविता वाचल्यानंतर खरे वाटू लागते. जन्मजात प्रतिभेला व्यासंगाची जोड मिळाली तर तुझ्या हातून (Classic ) अक्षर-वाङ्मय निर्माण होईल असा विश्वास वाटतो. तुझ्या भोवतालच्या जगाकडे सहानुभूतीने पाहून तू तुझे जीवन अनुभूतीने समृद्ध करशील, तर भारताला हवी असलेली जिवंत वाणी तुझ्या कवितेतून ऐकावयास मिळेल यात मुळीच शंका नाही.
माझ्या सर्व शुभेच्छा!
सांगली यशवंतराव चव्हाण
अभिप्राय लिहिल्यानंतर त्यांनी फराळ केला. यावरून त्यांच्या रसिक मनाची कल्पना नक्कीच येते!
हा माझा मुलगा कॅनडामध्ये पंचवीस वर्षांचा असता मोटार अपघातात जागचे जागी दिवंगत झाला. त्याची यशवंतरावांना कल्पना नव्हती. निवृत्त होण्यापूर्वी पुण्याच्या सर्किट हाऊसवर त्यांना भेटून निरोप घेण्यासाठी मी गेलो होतो. अगत्याने त्यांनी ‘आपला कवी मुलगा काय करतो?’ म्हणून चौकशी केली. त्यांना मी दु:खद हकिगत सांगताच दिलगिरी व्यक्त करून आपणास दुखविण्याचा माझा इरादा नव्हता. परंतु माहीत नसल्यामुळे मी चौकशी केली असे उद्गार काढले.
त्यांचे टासीव अगत्य, तसेच मनाचा हळुवारपणा, या घटनेने स्पष्ट होतो.