मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०१

१०१- प्रागतिक विचारांचे व कनवाळू वृत्तीचे यशवंतराव चव्हाण – ज. बा. कुलकर्णी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताच मंत्रालयातील वातावरण पार पालटले. पूर्वीची कुंद हवा नाहीशी झाली. सर्वत्र चैतन्य सळसळू लागले. आपल्यातील मुख्यमंत्री झाला ह्या भावनेने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. आपली गा-हाणी दूर होतील असे गोर-गरिबांना वाटू लागले आणि त्यांची मंत्रालयात ये-जा सुरू झाली. थोडक्यात मंत्रालयात एक प्रकारे निर्भयतेचे वातावरण निर्माण झाले आणि सर्वत्र उत्साह संचारला. या परिस्थितीचा फायदा घेण्याचे आम्ही मंत्रालयातील कर्मचारी संघटनेच्या मंडळींनी ठरविले व यशवंतरावांच्याकडे युनियनसाठी मंत्रालयात जागा देण्याची आग्रहाची विनंती केली.

मंत्रालय कर्मचारी संघटना नुकतीच कोठे स्थापन झाली होती. संघटनेला कार्यालयासाठी जागा नसल्यामुळे अडचण भासत होती. यशवंतरावांच्या प्रागतिक विचारांची आम्हाला कल्पना असल्यामुळे आम्ही ही मागणी मांडली होती. वास्तविक त्या वेळेस मंत्रालयाच्या इमारती नुकत्याच पूर्ण झाल्या होत्या. जुन्या मंत्रालयातून हलविण्यात आलेल्या विविध खात्यांची दप्तरे येऊन पडली होती. या खात्यांना खोल्यांचे वाटप चालू होते. अशा वेळेस ही विनंती करण्यात आली होती.

याला उत्तर काय देणार याबद्दल आमची द्विधा मन:स्थिती झाली होती. परंतु यशवंतराव नकार देणार नाहीत अशी श्रद्धा होती. याच वेळेस आम्ही मंत्रालयाच्या पटांगणात कार्यक्रम आयोजित केला. यशवंतरावांना या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलाविले. त्यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले. उद्घाटनाच्या भाषणात संघटनेने जागेसाठी केलेल्या मागणीचा उल्लेख केला आणि संघटनेच्या कार्यालयासाठी मंत्रालयात चांगली जागा दिली असल्याचे घोषित केले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आमची काळजी कायमची दूर झाली. त्या काळी मंत्रालयात संघटनेसाठी जागा देणारे महाराष्ट्र हे भारतात एकमेव राज्य होते. ही गोष्ट केवळ यशवंतरावांच्या युनियन्सबद्दल असणा-या आस्थेमुळेच होऊ शकली.

यशवंतरावांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ग्रंथप्रेम. उत्कृष्ट ग्रंथांचा संग्रह करणे ही एक त्यांची खास आवड होती. त्यांच्या मलबार हिलवरील निवासस्थानी अशा उत्तमोत्तम निवडक ग्रंथांचे एक ग्रंथालय होते. आमचे एक मित्र त्यांचे हे ग्रंथालय लावण्यास वेळोवेळी जात. आणि मग ते यशवंतरावांच्या ह्या विलक्षण छंदाचे अनेक किस्से आम्हाला ऐकवीत.

कित्येक वेळा असे होई की, अनेक चांगल्या ग्रंथांच्या वरती एक छोटा कागद लाविलेला असे आणि त्यावर स्वहस्ताक्षरात लिहिलेले असे ‘‘सोबतचे पुस्तक मी संपूर्ण वाचले आहे. चांगले आहे. आपणही वाचावे.’’ ही शिफारस मंत्रिमंडळातील त्यांच्या एखाद्या सहका-याला केलेली असे. यशवंतराव एवढ्या कामाच्या तुफान गर्दीत ग्रंथांचे वाचन तरी कधी करतात याचे सर्वांना आश्चर्य वाटे.

यशवंतरावांचे सामान्यांवर अपार प्रेम होते. त्यात कृत्रिमपणा नव्हता. ढोंगीपणा तर मुळीच नव्हता. याचे कारण ते त्या ग्रामीण भागातून जन्माला आले होते त्या मातीची त्यांना शेवटपर्यंत जाण होती. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना हजारो लोक भेटायला येत. या लोकांची अनेक प्रकारची गा-हाणी असत. पक्ष कार्यापासून ते तहत वैयक्तिक दु:खापर्यंत ! परंतु ते न रागावता त्या सर्वांची गा-हाणी शांत चित्ताने ऐकत व आपल्या परीने शक्य ती मदत करीत.

एकदा आम्ही संघटनेचे कार्यकर्ते चर्चेसाठी यशवंतरावांच्याकडे गेलो होतो. बोलण्याच्या ओघात ते सहजरीत्या म्हणाले, ‘‘हे पाहा, मंत्रालयाची इमारत म्हणजे हॉस्पिटल आहे. येथे जो येतो तो रोगी असतो. ज्याचा रोग कोठेच बरा होत नाही, तो या ठिकाणी होतो. यास्तव आपण सर्वांनी त्यांचा रोग जाणला पाहिजे. त्यांचे दु:ख सर्वांनी सहानुभूतिपूर्वक ऐकून घेऊन ते दूर करण्याचे आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत.’’

या अंत:करणात नकळत दडून बसलेल्या कनवाळू वृत्तीमुळे यशवंतरावांच्याकडे आलेल्या बहुतेक सर्वांना त्यांची भेट मिळे. यासाठी त्यांनी एक प्रथा पाडली होती की, ज्यांना सबंध दिवसात भेट मिळाली नाही त्या सर्वांना सायंकाळी पाचनंतर शिपायाने आत खोलीत सोडायचे. आम्ही त्याला गंमतीने यशवंतरावांचा दरबार म्हणायचो. या दरबारात यशवंतराव प्रत्येकाला खुर्चीजवळ बोलावून त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे आणि एकदोन मिनिटांत त्याचे म्हणणे ऐकून त्याला मार्गस्थ करायचे. कोण आपल्याला जमीन मिळाली नाही म्हणून, तर कोण आपण बेकार असल्याचे गा-हाणे मांडायचा. त्यांच्याकडे अर्ज भरल्यास त्यावर तेथेच टिपणी करून किंवा पत्ता घेऊन त्यावर आदेश देऊन ते कार्यालयात कागद रवाना करायचे. या उपस्थितीत अनेकजण निमंत्रण पत्रिका घेऊन आपल्या घरातील मंगल कार्यासाठी आशीर्वाद मागायला आलेले असायचे. ते सर्वजण परिचित असायचे अशातला भाग नव्हता. उलट बहुसंख्य अपरिचित असायचे. परंतु यशवंतरावांवरील असीम प्रेमाने ते यायचे आणि यशवंतरावही त्यांना मोकळ्या मनाने आशीर्वाद द्यायचे.