तेथे उभे असताना साहेबांच्या दृष्टीसमोर क्षणभर गतेतिहास जिवंत झाला होता. जेथे स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांना व त्यांच्या सवंगड्यांना काही वेळा स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते, तीच ही जागा होती. या आंदोलकांच्या घरची मंडळी त्या वेळी त्यांच्यासाठी जेवणखाण घेऊन आली, की त्यांना बंद फाटकाबाहेरच थांबावे लागे. इतकेच नव्हे तर त्या वेळचे फौजदार या सर्व लोकांना जरब बसावी म्हणून आंदोलकांना हंटरने मारत व आरडाओरड करून सर्व नातेवाईकांना घाबरून सोडत. त्या वेळची मन:स्थिती अतिशय अस्वस्थ करून टाकणारी असे आणि आज त्याच ठिकाणी ते वेगळ्या परिस्थितीत आले होते!...परिस्थितीत केवढे अंतर पडले होते?...
१९४८-४९ चा सुमार होता. मध्यंतरी सौ.वेणूताई खूपच आजारी असल्यामुळे त्यांना मिरज येथील इस्पितळात ठेवण्यात आले होते. शक्य होईल त्या त्या वेळी साहेब इस्पितळात येऊन जात असत. ब-याच दिवसांच्या औषधोपचारानंतर त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली. त्याप्रमाणे साहेबांना कळविण्यात आले. साहेबांच्या इस्पितळातील या भेटीच्या वेळीही नेहमीप्रमाणे मी सावलीप्रमाणे त्यांच्याबरोबर होतोच.
साहेबांच्या भेटीच्या वेळी डॉक्टरांनी त्यांना वेणूताई आजारातून पूर्णपणे ब-या झाल्याची खात्री दिली. पण त्याचबरोबर शरीर संबंध टाळण्याचीही सूचना दिली. शरीर संबंध वर्ज्य न केल्यास तो जीवितालाच अपात्र ठरण्याचीही शक्यता सांगितली. डॉक्टरांच्या या सूचनेनंतर क्षणभर दोघेही अवाक् बनले. त्यातून प्रथम सावरल्या त्या वेणूताई. अश्रुपूर्ण नेत्रांनी त्या साहेबांना म्हणाल्या, ‘‘डॉक्टरसाहेब काय म्हणालेत ते ऐकलंत ना? आपल्या कुलाला कुलदीपक हवाच. पण मला ते शक्य नाही. आपण आता दुसरं लग्न केलंच पाहिजे. हीच माझी इच्छा आहे.’’ त्यांचे हे मनोगत ऐकणारे साहेब गहिवरले आणि सद्गदित शब्दांनी त्यांच्या दोन्ही दंडांना धरून म्हणाले, ‘‘वेणू माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरी स्त्री येणेच शक्य नाही. मला कुलदीपक नसला तरी चालेल, पण तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ राहणार नाही. माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत तूच माझी जीवनसाथी राहशील. दुसरं लग्न मी कदापिही करणार नाही.’’
उत्कट भावनेने ओथंबलेले साहेबांचे ते शब्द ऐकून वेणूताईही उत्कटतेने अश्रू ढाळू लागल्या. त्या दोघांच्या आयुष्यातला तो भावनोत्कट क्षण पाहून मी अक्षरश: भारावून गेलो. आपले वचन साहेबांनी अखेरपर्यंत अत्यंत निष्ठेने पाळले!
साहेबांच्या बरोबर वावरण्याची मला संधी मिळाली, त्यांच्या जिव्हाळापूर्ण वागणुकीचा अनुभव अनेकदा मला घेता आला. माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला त्यांनी अगदी घरगुती जिव्हाळ्याने वागविले. केवळ त्यांच्याबरोबर ‘‘ड्युटी’’ असतानाच नव्हे, तर नंतरही त्यांनी अगदी अगत्यपूर्वक आठवण ठेवून विचारपूस केल्याचा अनुभवही मला घेता आला. हा जिव्हाळा, ही एकरूपता फार कमी ठिकाणी आणि फार कमी वेळेला अनुभवता येते.