मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०३

१०३- यशवंतराव: रक्तात समाजवाद मुरलेला नेता – आचार्य अत्रे

केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री अशी महत्त्वाची खाती एकापाठोपाठ एक सांभाळण्याचा मान मिळालेले यशवंतराव हे एकमेव महाराष्ट्रीय आहेत. वयाची पंचावन्न वर्षे उलटण्यापूर्वीच ही महत्पदे यशवंतरावांनी हस्तगत केली हेही लक्षात घेतले पाहिजे. यशवंतरावांना पिढीजात श्रीमंती, नामांकित घराणे, वडिलोपार्जित नावलौकिक, विनासायास शिक्षण अथवा एखाद्या श्रेष्ठ नि वजनदार नेत्याची प्रथमपासून मेहेरनजर यांपैकी कशाचेही पाठबळ नव्हते.

सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या खेड्यातील एका सामान्य माणसाचा यशवंतराव हा मुलगा. एका अशिक्षित, गरीब नि खेडवळ कुटुंबातला मुलगा, जेमतेम शाळेच्या काही इयत्ता ओलांडण्याऐवजी कॉलेजमध्ये जाऊन वकिलीची परीक्षा पदवी उत्तीर्ण झाला. हाच विशेषत: त्या काळात मोठा पराक्रम मानला जायचा. पण केवळ तेवढ्यावरच समाधान न मानता राजकारणात शिरुन नि १९४२ मधील प्रतिसरकारच्या लढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावून, यशवंतरावांनी सातारा जिल्ह्यात स्वत:चे नाव गाजविले आणि पुढे मुंबई राज्याच्या विधिमंडळात आमदार म्हणून ते निवडून आले. पण तेवढ्यावरही न थांबता प्रथम त्या राज्याच्या मंत्रिमंडळाचे ते संसदीय चिटणीस , मग त्या राज्याचे एक मंत्री नंतर द्विभाषिकाचे आणि त्यामागून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यानंतर भारताचे संरक्षणमंत्री आणि त्या पाठोपाठ भारताचे गृहमंत्री अशा एकाहून एक मोठ्या यशाच्या पाय-या यशवंतराव भराभर चढत जे गेले ते निव्वळ प्रखर बुद्धिमत्तेच्या, असामान्य कर्तबगारीच्या, लवचिक मुत्सद्देगिरीच्या नि कणखर चिकाटीच्या बळावर होय, यात तिळमात्र शंका नाही.

यशवंतरावांसंबंधी आम्ही नेहमीच अनेक चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो. यशवंतरावांच्या अंगी असलेल्या गुणांची आम्हाला ओळख असल्यामुळेच नि त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे या अपेक्षा आमच्या असतात. यशवंतरावजींच्या रक्तात समाजवाद मुरलेला आहे. त्यांनी राजे लोकांच्या तनख्याबाबत जे पुरोगामी धोरण पत्करले त्यावरून ते स्पष्ट झाले आहे. यशवंतरावांशी आमचे कितीही राजकीय नि पक्षीय मतभेद असले तरी व्यक्तिश: आम्ही त्यांना आमचे मित्र मानतो आणि त्यांनीही आमच्याशी सदैव मैत्रीचे वर्तन ठेवले आहे.

यशवंतरावांच्या बुद्धिमत्तेचा पल्ला केवळ राजकारणापुरताच मर्यादित नाही. ते एक साहित्यप्रेमी, कलाप्रेमी नि नाट्यप्रेमी रसिक आहेत. संभाषण चतुर आहेत. शिष्टाचारात निपुण आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रसन्न आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी आम्हाला आपुलकी वाटते. राष्ट्राचे आणि महाराष्ट्राचे हित साधण्याचे कार्य त्यांच्याकडून व्हावयाचे आहे.