१०४- खंबीर नेते-यशवंतराव चव्हाण - बाळासाहेब पाटील
महाराष्ट्राचे एक खंबीर नेते म्हणून यशवंतरावांनी महाराष्ट्रात भरीव कामगिरी केली व देशात महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवून ठेवली. यशवंतराव चव्हाण हे आमचे तर जिव्हाळ्याचे मित्र होते. ‘दैनिक सत्यवादी’ च्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त ते महनीय अध्यक्ष म्हणून खास उपस्थित होते. हा ३६ वा वर्धापन दिन कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात अपूर्व थाटाने साजरा झाला होता. आम्ही त्यांना आमच्या वतनगावी, कोथहीलाडीला नेले होते व बैलगाडीला शंभर बैलजोड्या जुंपून त्यांची गावातून शाही मिरवणूक काढली होती. त्यांच्या मार्गावर वाटेत असंख्य कमानी उभ्या केल्या होत्या. मिरवणुकीच्या वेळी वाटेत सुवासिनी त्यांना पंचारतीने ओवाळीत होत्या व भक्तिभावाने त्यांच्या पायावर पाणी घालत होत्या. या भव्य मिरवणुकीचे चावडीजवळ भव्य सभेत रूपांतर झाले. ती सकाळची वेळ असताना देखील त्या सभेस पंचवीस हजारावर स्त्री-पुरूष उपस्थित होते. कोथळीतील ती सभा पाहून यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, ‘‘बाळासाहेब, कोथळीची ही सभा पाहून मला कराड येथील जाहीर सभेची आठवण झाली, इतकी ही सभा भव्य आहे.’’ यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या जागा भूषविल्या.
१९७९ मध्ये त्यांना श्री.चरणसिंग मंत्रिमंडळात उपपंतप्रधानपद मिळाले. पण हे मंत्रिमंडळ अल्पजीवी ठरले. यानंतर लोकसभा विसर्जित झाली व लोकसभेच्या नव्या निवडणुका लागल्या. त्यात इंदिरा काँग्रेसचे बहुमत प्रस्थापित झाले. पण श्रीमती इंदिरा गांधी यांनी यशवंतरावांच्याकडे कधी असूयेने पाहिले नाही. त्यांच्या कर्तृत्वाला श्रीमती इंदिरा गांधी मानीत असत. देशाच्या विकासासाठी त्यांनी त्यांची मदत घेतली व त्यांना आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनविले. यशवंतराव चव्हाणदेखील श्रीमती इंदिरा गांधींना शेवटपर्यंत सहकार्य देत होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातून नवी दिल्लीत गेले आणि त्यानंतर अखिल भारतीय राजकारणात त्यांचे असे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री अशा महत्त्वाच्या जागा विभूषित केल्या. त्यांची बुद्धिमत्ता असामान्य होती. त्यांची वक्तृत्वशैली लोकोत्तर होती. लोकांवर ते छाप पाडीत असत. ते नेहमी हसतमुख असत. आपल्या हास्याने ते लोकांची निम्मी मने जिंकून घेत असत. त्यांची स्मरणशक्तीही मोठी तीव्र होती.