९५. सोफ्याचे भाग्य - एक निवृत्त सेवक
यशवंतराव मुख्यमंत्री झाले तेव्हा मी कराडला, पी.डब्ल्यू.डी.मध्ये हेडक्लार्क होतो. कराड हे त्यांचेच गाव असल्यामुळे तेथे ते वारंवार येत. एका भेटीत, तिथल्या सरकारी विश्रामगृहातला सोफा चांगला आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना सोफा आवडला म्हटल्यावर ते जवळपासच्या जिल्ह्यात ज्या ज्या गावी जातील त्या त्या ठिकाणी आवडता सोफा नेण्याचे खात्याने ठरविले. हे काम खात्याने माझ्याकडे सोपविल्यामुळे त्यांचा दौरा असे त्या ठिकाणी सोफा वेळेवर पोहोचेल हे पाहावे लागे.
एका मुक्कामात साहेब आत विश्रांती घेत होते. तिथे असलेले कर्मचारी झाडाखाली डबा खात होते. मी एकटाच जेवत नव्हतो. इतक्यात साहेब बाहेर आले आणि खूण करून मला बोलावीत म्हणाले, ‘‘अहो आजची वर्तमानपत्रे पाहायला मिळालेली नाहीत. मिळतील का? ’’ मी लगेच जाऊन सर्व वर्तमानपत्रे आणून दिली. त्यांनी कुठल्या खात्यात आहात, काय करता याची विचारपूस केली. मी हेडक्लार्क आहे. हे समजल्यावर ते म्हणाले, ‘‘अरे माफ करा हं. मग स्वत: कशाला गेलात? शिपायाला पाठवायचे किंवा दुस-या कुणाला पाठवा म्हणायचे.’’ मुख्यमंत्र्यांची ही भूमिका पाहून मी थक्क झालो. तेव्हापासून साहेब मला नावाने ओळखू लागले. पुढे कुठल्याही दौ-यात भेटल्यावर ‘‘काय सोफा ड्यूटीवर का?’’ एवढे तरी ते विचारीत.