शब्दाचे सामर्थ्य ८६

२०

कर्मवीर भाऊराव पाटील

साठ वर्षांपूर्वी त्या वेळच्या समाजपरिस्थितीचे अत्यंत सहृदयतेने परीक्षण करून गरिबांच्या शिक्षणाच्या प्रश्नाला कै. कर्मवीर अण्णांनी हात घातला. लोकांमध्ये सार्वजनिक कामाच्या आवडीचा अभाव, डोक्यावर परकीय सत्तेचा वरवंटा, साधनांची कमतरता, हे सर्व असूनही, गरिबांबद्दल वाटणारी कणव, त्यासाठी करावे लागणारे श्रम व मनाचा निर्धार हीच फक्त कै. भाऊराव अण्णांच्या हातांत साधने होती. प्राथमिक शिक्षणापासून त्यांनी या कामाची सुरुवात केली. परंतु त्यांच्या कामाची सामाजिक वैशिष्ट्ये होती. आदिवासी, हरिजन व दलित वर्गांच्या मुलांना हाती धरून त्यांच्या विकासाचे काम त्यांनी धैर्याने हाती घेतले.

आपल्या देशातील सामाजिक दोषांची मार्मिक जाणीव असलेल्या भाऊरावांचे व्यक्तित्व अत्यंत चित्रदर्शी होते. ते प्राचीन काळातील ॠषीसारखे दिसत आणि तसेच त्यांचे जीवन साधे आणि काटकसरीचे असे. बहुजनांच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम केले.

ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध आणि सामाजिक विषमतेविरुद्ध दंड थोपटून उभ्या राहिलेल्या सत्यशोधक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रथम पदार्पण केले, तेव्हा ही चळवळ मुख्यतः लढ्याच्या स्वरूपाची होती. आपल्या स्वभावजन्य हिरिरीने आणि प्रामाणिकपणे भाऊराव तीत सहभागी झाले. परंतु समाजामध्ये ही जी सामाजिक आणि आर्थिक विषमता दृढमूल झालेली आहे, तिला शिक्षणाचा अभाव आणि मुलांची मने घडविण्याच्या विधायक प्रयत्‍नांची उणीव या गोष्टी जबाबदार आहेत, हे त्यांना लवकरच कळून आले.

अस्पृश्यतेची दरी केवळ कायद्याने बुजविली जाणार नाही. या समस्येकडे अधिक व्यापक अशा सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि मुख्य म्हणजे, अस्पृश्यांना राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घ्यायला हवे, हे भाऊरावांनी ओळखले. या अस्पृश्य जाती कित्येक शतके समाजापासून अलग पडलेल्या होत्या. दारिद्रय, अज्ञान आणि सामाजिक बहिष्कार यांचे तीव्र चटके त्या जातींना अनेक शतके सहन करावे लागले.

विषमता आणि सामाजिक श्रेष्ठता-कनिष्ठता यांच्याविरुद्धच्या लढ्यामध्ये आधुनिक शिक्षण हेच प्रभावी शस्त्र ठरू शकते, याची भाऊरावांना जाणीव झाली. सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये सर्व जातींच्या मुलांना प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी प्रत्यक्ष प्रयत्‍न करून त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध विधायक युद्ध पुकारले. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करून त्यांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. गरिबांसंबंधी भाऊरावांना किती कळकळ वाटत होती आणि ही गरिबी दूर व्हावी, यासाठी शिक्षणप्रसार व्हायला हवा, यावर त्यांची केवढी प्रगाढ श्रद्धा होती, हे या वसतिगृहांवरून दिसून आले. अस्पृश्यतानिवारण आणि मागास समाजांमध्ये शिक्षणप्रसार या दोन गोष्टींवर भाऊरावांनी शेवटपर्यंत निग्रहाने आणि निकराने भर दिला.

सुरुवातीला भाऊरावांनी स्वतःची शाळा काढली नाही. प्रथम लक्ष दिले, ते सर्व जातीजमातींची गरीब मुले एकत्र राहतील आणि स्वतः श्रम करून शिक्षणाचा खर्च भागवतील, अशी वसतिगृहे उभारण्याकडे. स्वप्रयत्न, आणि स्वावलंबन यांना पुढे अधिकाधिक महत्त्व प्राप्त होत गेले. ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोहोचल्याशिवाय तेथे संपूर्ण परिवर्तन घडून येणे अशक्य आहे, हे भाऊरावांना लवकरच उमगले. त्यांनी जी वसतिगृहे काढली होती, ती मोठ्या गावांतच होती, कारण तेथे शालेय शिक्षणाची तोपर्यंत व्यवस्था होती. म्हणून भाऊरावांनी ज्या खेडेगावांमध्ये प्राथमिक शाळा नव्हत्या, तेथे त्या सुरू करायचे कार्य आरंभिले. पश्चिम महाराष्ट्राच्या दूरच्या आणि दुर्गम भागांमध्ये प्राथमिक शाळा काढणे हे खरोखरीच अतिकठीण काम होते. परंतु भाऊरावांना एकदा ही गरज जाणवल्यावर त्यांनी कोणत्याही अडचणीची किंचितही फिकीर केली नाही. प्राथमिक शाळा काढण्यामध्ये यश प्राप्त झाल्यावर त्यांनी माध्यमिक आणि विद्यापीठीय शिक्षणाकडे आपले लक्ष वळविले. अशा रीतीने क्षितिजे विस्तारत असतानाही भाऊरावांची मूलभूत श्रद्धा आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या कार्याचे स्वरूप या सर्व शिक्षणसंस्थांमध्ये प्रतीत होत असे.