शब्दाचे सामर्थ्य ८८

२१

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे

महर्षि विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांनी आपले सबंध आयुष्य सर्वस्वी समाजसेवेसाठी व अस्पृश्योद्धारासाठी वाहिले, अशा या थोर पुरुषाच्या आयुष्यातील आठवणी आठविल्या, की त्यांच्याविषयीचा आदर दुणावतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून आपले कार्य आत्यंतिक निष्ठेने, तळमळीने करीत राहणे हा गुण असामान्य व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आढळतो. महर्षि शिंदे यांच्या बाबतीत मला त्याचे प्रत्यंतर येते. लहानपणची गरिबी, त्यात अनेक कौटुंबिक आपत्तींची भर, असे असूनही स्वाभिमान न दुखावता जेवढी मदत मिळेल, तिच्यावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. स्वतःच्या दारुण परिस्थितीचा व प्रेमळ मातापित्यांच्या धार्मिक प्रवृत्तीचा त्यांच्या मनावर जो परिणाम झाला, त्यामधूनच त्यांना धार्मिक शिक्षण घेण्याची प्रेरणा झाली व मँचेस्टर येथे हे शिक्षण घेऊन परत आल्यावर त्यांनी धर्मप्रचाराचे काम हाती घेतले. या कार्यातूनच पुढे त्यांनी केलेल्या अस्पृश्योद्धाराच्या महान कार्याचा उदय झाला.

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासंबंधीची माझी एक जुनी आठवण सांगतो. १९३३ साली माझे मित्र श्री. मूळचंदभाई यांच्या सल्ल्याने मी कराडमध्ये माझ्या मित्रांच्या मदतीने अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्याचे ठरविले. हरिजनांसाठी सुरू होणारी ही शाळा त्यांच्याच आशीवार्दाने सुरू व्हावी, यासाठी त्यांना बोलवायचे ठरले; तरी पण प्रत्यक्षात श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यापर्यंत पोचायचे कसे, आणि कुणाच्या आधाराने, हा प्रश्न होता. अखेर मीच स्वतः पुण्याला जाऊन श्री. शिंदे यांना आणण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे ठरले, आणि ठरल्याप्रमाणे निघालोही.

श्री. शिंदे यांची आणि माझी पूर्वीची जानपछान नव्हती, साधी ओळखही नव्हती. तरी पण त्यांना त्यांच्या घरी जाऊन मी भेटायचे, असे ठरवले. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर मी पहाटे उतरलो होतो. तिथेच नळावर तोंड धुतले. पायजमा, कोट, टोपी हा त्या वेळचा साधा वेष. तो बदलण्याचेही कारण नव्हते. पण उजाडेपर्यंत थांबणेच आवश्यक होते. सकाळीच मग स्टेशनवरून निघून आठ-सव्वाआठपर्यंत मी त्यांच्या घरी पोचलो. श्री. शिंदे घरीच होते. नमस्कार करून मी येण्याचे कारण सांगितले. त्यासरशी ते माझ्याकडे पाहतच राहिले. सुरुवातीला ते फारसे बोलले नाहीत. पण एकूण मनुष्य मला मोठा 'टफ्' वाटला.

'तू एक साधा पोर, तुझ्या सांगण्यावरून मी कसा येऊ?' विठ्ठल रामजी म्हणाले.

मी काही सांगण्याचा प्रयत्‍न करत होतो. त्यांनी मग मला तास-दोन तास ठेवून घेतले. मधून-मधून ते काही बोलत असत, काही विचारीत असत. माझ्या हालचाली बारकाईने टिपत असत.

अखेर ते म्हणाले,
'मी येईन, पण माझ्या काही अटी आहेत.'
'आम्ही सर्व अटी पाळू.' मी म्हणालो.
'कुठं उतरवणार मला?' शिंदे.
'माझ्या घरीच उतरवणार आहे.' मी म्हटले.
'घरच्या माणसांची संमती घेतली आहेस?' शिंदे.
'हो!' मी दाबून होकार दिला.
'माझ्याबरोबर जेवायला हरिजनाला आणावं लागेल. घरचे लोक मान्यता देतील?' शिंदे.
'हो.' मी पुन्हा होकार दिला.
'घरी कोण कोण आहेत?' शिंदे.
'आई, थोरले बंधू आहेत; पण ते नाही म्हणणार नाहीत.' मी सांगितले.