शब्दाचे सामर्थ्य ८३

१८

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हटले जाते. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', या मंत्रातून त्यांनी देशाला प्रेरणा दिली. या दोहोंचाही भारतीय जनतेच्या मनावर कायमचा ठसा उमटला आहे. पण त्यांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा खोलवर अभ्यास केला असता असे आढळून येईल, की या दोन्हींचा समन्वय झालेला आहे. लोकमान्य टिळक हे नुसते कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते. ते जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे जन-नेते होते. आपली वृत्तपत्रे सुरू करताना जी परिस्थिती होती, तिचे राजकीय विश्लेषण करून त्यांनी आपले राजकीय डावपेच ठरवले होते.

लोकमान्य टिळकांच्या राजकीय डावपेचांचे तीन भाग करता येतील. राष्ट्रीय शिक्षणाच्या साह्याने आणि वृत्तपत्रांतून मोहीम उघडून लोकांची आणि समाजाची वृत्ती बदलता येईल, असे त्यांचे मत होते. 'केसरी' तून लेख लिहून त्यांनी विविध विषयांवर वादविवाद केले. या लेखांमधून त्यांनी मवाळांवर कडक टीका केली. त्याचप्रमाणे ब्रिटिश सरकारवरही प्रखर टीकास्त्र सोडले. एकदा त्यांच्या एका निकटच्या स्नेह्याने त्यांना सुचवले की, त्यांनी आपले लेख इतक्या कडक भाषेत लिहू नयेत; नाही तर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला जाईल. त्यावर टिळकांनी उत्तर दिले, 'माझे शब्द आत धुमसणार्‍या अग्नीतून बाहेर येतात. त्यांचे परिणाम काहीही झाले, तरी त्याला माझा इलाज नाही.'

यावरून त्यांच्या स्वभावातील बंडखोर वृत्तीचे दर्शन होते. टिळकांचे लेख लोकांना मूलभूत विचार करायला प्रवृत्त करणारे आणि जनमत तयार करणारे होते. आपल्या लिखाणांतून त्यांनी उच्चार-स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क प्रस्थापित केला. वृत्तपत्र-स्वातंत्र्यासाठी झगडणारे पहिले पत्रकार असा टिळकांचा उल्लेख करता येईल.

काँग्रेसच्या व्यासपीठावरून राजकीय चळवळींना प्रोत्साहन देऊन टिळकांनी दुसरी आघाडी उघडली होती. वादविवाद घडवून आणणारी संस्था असे काँग्रेसचे स्वरूप असू नये, तर राजकीय बदल घडवून आणण्याचे एक प्रभावी साधन असे काँग्रेसचे स्वरूप असावे, असे टिळकांचे मत होते. लोकांच्या आशा-आकांक्षा आणि मते व्यक्त करणारी चळवळ काँग्रेसने करावी, असे त्यांना वाटत होते. विनंती करून आणि निषेध नोंदवून राजकीय हेतू साध्य करण्याचा काळ मागे पडला आहे, अशी टिळकांची खात्री होती. राजकीय चळवळीसाठी जनतेला तयार करण्याची वेळ आली आहे, असे त्यांचे म्हणणे होते.