शब्दाचे सामर्थ्य ८२

प्रतापगडच्या शिव-पुतळ्याचे अनावरण झाल्यावर आम्ही परत निघालो, तेव्हाची एक आठवण पंडितजींच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीची व ऐतिहासिक उपपत्ती लावण्याच्या चिंतनशील मनाची द्योतक आहे. प्रतापगडच्या-मोर्च्याचा, निदर्शनाचा कार्यक्रम संपवून निदर्शक गटागटाने परतत होते. काही सायकलींवरून चालले होते, जवळजवळच्या गावांतील मंडळी पायीच चालली होती. पण निदर्शनांच्या वातावरणातून ती अजून बाहेर आलेली नव्हती. अशाच वेळी आमची मोटार जाताना दिसली, म्हणजे त्यांना मोठा जोश चढे आणि मोठमोठ्या घोषणांनी ते वातावरण दणाणून सोडत.

पं. नेहरू हा सगळा प्रकार न्याहाळत होते. ब-याच वेळाने ते म्हणाले,
‘तुम्हांला गंमत सांगतो, पंजाबचे लोकही खूप संतापतात. तुमच्या मराठ्यांप्रमाणेच तेही रागीट आहेत; पण कितीही रागावले, तरी लवकर थंड होतात. मराठ्यांचे तसे नाही, ते रागावतात उशिरा व थंड व्हायलाही त्यांना वेळच लागतो. लवकर संताप विसरणे त्यांना शक्य होत नाही, असे दिसते. ’जवळूनच घोषणा देत चाललेल्या एका निदर्शकांच्या पथकाकडे बोट दाखवून ते म्हणाले, ‘बघ, निदर्शने होऊन तीन तास झाले, तरी त्यांच्या घोषणांचा जोर काही कमी झालेला नाही.’

१९६२ च्या नोव्हेंबरमध्ये मी दिल्लीला गेलो आणि पंडितजींच्या नित्य सहवासाचा, विचारविनिमय, मार्गदर्शन यांचा लाभ मला झाला. १९६४ च्या मे महिन्यापर्यंत म्हणजे जवळजवळ दीड वर्ष मी त्यांना अगदी जवळून पाहिले, सहा महिने ते चांगले क्रियाशील होते, पुढे पुढे ते झपाट्याने थकत गेले, आणि घडणा-या घटनांचे तटस्थ साक्षीदार म्हणून वावरताना आम्ही पाहिले.

१९३१ साली कराडच्या स्टेशनवर एक तरुण विद्यार्थी म्हणून पं. नेहरूंचे दर्शन घेतले होते. तेव्हा आपल्या या नेत्याच्या अगदी निकट, त्यांचा सहकारी म्हणून, मित्र म्हणून राहण्याची संधी आपल्याला मिळेल, अशी कल्पना स्वप्नात सुद्धा मला शिवली नव्हती. पण त्यानंतर त्यांचा सहकारी म्हणून काम करण्याचे भाग्य माझ्या वाट्यास आले. त्यांच्यासमवेत काम करताना माझे मन धन्यता व कृतज्ञता अशा संमिश्र भावनांनी भरून येत असे. विद्यार्थी असताना आमचा नेता म्हणून त्यांना मानले, ते, त्यांचे पुरोगामी विचार, इतिहासाकडे पाहण्याची त्यांची शास्त्रीय दृष्टी, भारताच्या स्वातंत्र्य-लढ्याची जगाच्या स्वातंत्र्य-लढ्याच्या संदर्भात त्यांनी केलेली मांडणी या सगळ्यांचे आम्हांला आकर्षण होते, यामुळे.

आज इतक्या वर्षांनंतर, आम्ही चुकीच्या मार्गाकडे आकर्षित झालो नाही, भलत्याच राजकीय दैवताच्या मागे लागलो नाही, अशा समाधानात आम्ही आहो. अनुयायांच्या विश्वासास पात्र ठरणे ही यशस्वी नेतृत्वाची एक कसोटी मानली, तर पं. नेहरूंचे यश अलौकिकच म्हणावे लागेल.