शब्दाचे सामर्थ्य ९०

२२

डॉ. राजेंद्रप्रसाद

भावी इतिहासकार जेव्हा स्वतंत्र भारताचे वर्णन करील, तेव्हा काही विसंगतींच्या, अभावांच्या आणि अपयशांच्या वर्णनावरून तो अशा ठिकाणी येऊन थांबेल, की जेणेकरून त्याच्या लेखणीस आमचे उगवते स्वातंत्र्य म्हणजे आमची राष्ट्रीय परंपरा आणि भावी महत्त्वाकांक्षा याची दृढ आधारशिला आहे, असे लिहिणे भाग पडेल. स्वतंत्र भारताच्या प्रथम राष्ट्रपतिपदी डॉ. राजेंद्रप्रसादांची निवड होईल, त्यात तिळमात्रही शंका नव्हती. ज्याप्रमाणे नदी पर्वतमय भूभाग सोडून मैदानात अवतीर्ण होताना तिच्या पाण्याबरोबर वाहत येणारे छोटे-छोटे गोटे आणि माती खाली बसते आणि तिचे पाणी स्वच्छ व निर्मळ दिसते, त्याचप्रमाणे राजनीतीच्या दंग्याधोप्याचा काही काळ उलटल्यानंतर भूतकाळातील सतरा वर्षांचा इतिहास आणि तत्संबंधी घटना स्पष्टपणे बौद्धिक क्षितिजावर स्थिरावलेल्या दिसतील. अशा स्थितीत कोणासही समजणे अवघड होणार नाही की, बारा वर्षांपर्यंत राष्ट्रपतिपदावर विराजमान होऊन ज्या परंपरा आणि संसदीय पद्धतीचा पाया राजेंद्रबाबूंनी घातला, भारतीय स्वातंत्र्याच्या स्थैर्यासाठी ती एक सर्वांत मोठी उपलब्धी मानावी लागेल.

महात्मा गांधींच्या जीवनाची व विचारसरणीची छाप भारतातील ज्या थोड्या व्यक्तींवर बव्हंशाने पडलेली आहे व गांधीजींचे गुण ज्यांचे ठायी उत्कटत्वाने वास करीत आहेत, अशा व्यक्तींमध्ये डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे स्थान अत्यंत श्रेष्ठ होय. बहुतेक विश्वविद्यालयीन परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून त्यांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेची चमक दाखविली. चंपारण्यातील चळवळीत त्यांना सत्याग्रहाचे पहिले पाठ मिळाले व याच ठिकाणी त्यांनी आपल्या भावी राजकीय जीवनाची पूर्वतयारी केली. पाटणा येथील प्रमुख न्यायालयात एक नामांकित वकील म्हणून त्यांनी जे यश संपादन केले, त्याने कीर्ती व संपत्ती या दोहोंचाही लाभ त्यांना घडला; परंतु या दोहोंच्या मोहात न पडता त्यांनी देशकार्यासाठी त्यावर पाणी सोडले. डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारताच्या राष्ट्रीय लढ्यात बजावलेली मोलाची कामगिरी, १९३४ साली बिहारमध्ये झालेल्या प्रचंड धरणीकंपाच्या वेळी त्यांनी केलेले सेवाकार्य व दाखविलेले संघटनाकौशल्य, १९४६ साली त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अन्न व शेतकी मंत्री या नात्याने बजाविलेली बहुमोल कामगिरी, अत्यंत कठीण काळात त्यांनी वेळोवेळी वाहिलेली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा व स्वतंत्र लोकसत्ताक भारताचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी भूषविलेले थोर स्थान, तसेच, त्यांच्या ठायी वसत असलेल्या बुद्धिमत्ता, विद्वत्ता, कर्तृत्व, धडाडी वगैरे अनेक गुणांचे उत्कृष्ट दर्शन घडते. भारतीय संस्कृतीमध्ये जे जे थोर, उदात्त व आदर्श असे आहे, ते ते डॉ.राजेंद्रप्रसादांच्या ठायी आहे, असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती होईलसे वाटत नाही. त्यागमय जीवनाचे ते मूर्तिमंत प्रतीक आहेत. विद्वत्ता व विनयशीलता या दोहोंचा समन्वय त्यांचे ठायी चांगला साधला आहे.

आमच्या विद्यमान स्वातंत्र्यास आमच्या भूतपूर्व राष्ट्रपतींनी इतके महान योगदान दिले, त्याचे मुख्य कारण त्यांच्या अद्‍भुत व्यक्तिमत्त्वातून साकार होते. त्यांचा स्वभाव सरळ आणि सात्त्विक होता. हे उच्चविद्याविभूषित होते, त्यांचे विचार आदर्श होते, त्यांच्या कार्याने आणि अनुभवाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्या गुणांचा समावेश झाला होता, हे सर्व विलक्षणच म्हणावे लागेल. राजकीय क्षेत्रात ते कितीही महान असले, त्यांचा बौद्धिक स्तर कितीही उंच असला, तरी ते एक असाधारण महामानव होते. आपल्या प्राचीन ग्रंथांत आणि शास्त्रांत आदर्श पुरुषाची जी व्याख्या केली गेली आहे, राजेंद्रबाबू त्या व्याख्येच्या कसोटीवर पूर्णपणे उतरतात. संयम, समन्वय, सात्त्विकता, सौम्यता, इत्यादी त्यांच्या स्वभावाचे अविभाज्य घटक होते. त्यांच्या उच्चशिक्षणाने यात अधिकच भर टाकली. त्यांच्यांतील तपी आणि त्यागी वृत्तीने जीवनाला अधिकच विकसित केले. यातूनच त्यांनी देशसेवेची शोभा वाढविली. ओजस्वी प्रतिभा, उदारप्रवृत्ती, नम्रता, सरळपणा, सहिष्णुता यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण झाली, याचे प्रत्यंतर राजेंद्रबाबूंशी बोलणा-या कोणत्याही व्यक्तीस काही क्षणांतच येते. माझ्या मते त्यांचे श्रेष्ठ जीवन आणि त्यांचा राजनीतिक तथा संविधानिक दृष्टिकोन आमच्या स्वातंत्र्याच्या प्रारंभिक वर्षांतील सर्वांत मोठा उत्कर्षच मानावा लागेल.

या गोष्टींचे आश्चर्य तर वाटतेच, परंतु हे निर्विवाद सत्य आहे की, त्यांच्या सरळ स्वभावाने, त्यांच्या स्वाभाविक महिमामयी प्रवृत्तीने आणि सहज स्वाभाविक बुध्दीने त्यांच्यांतील असाधारण मावनतेस आणि सखोल द्रष्टेपणास पुष्टी दिली होती. या गुणांमुळे कोणत्याही समस्येच्या निवारण-प्रसंगी त्याचा नीरक्षीरविवेक-स्वभाव स्पष्ट होतो. ही गोष्ट वेगळी आहे, की आम्ही त्यांच्यापासून किती लाभ घेतला. परंतु हे निर्विवाद आहे, की कोणत्याही समस्येचे विश्लेषण आणि परिणाम तोच असतो, जो राजेंद्रबाबू आमच्यापुढे ठेवतात.