'घरी त्यांना विचारलं आहे का?' शिंदे.
'नाही!' मी म्हणालो.
'मग, हो कसा म्हणतोस ?' शिंदे.
'माझे सर्व जातींचे मित्र माझ्या घरी येतात. आईची त्याबद्दल कधी तक्रार नसते.' मी सांगितले.
'पण तुझ्या घरी हरिजनांची पंगत कधी झाली आहे का?' शिंदे.
'आपल्याबरोबर ही पंगत होईल, याची मला खात्री आहे.' मी जरा ठामपणाने बोललो.
श्री. विठ्ठल रामजी यांचा कराडला येण्याचा होकार घेऊनच मी परतलो.
हे आता सारे कसे जमावे, अशी धास्ती मनात डोकावत होती. मित्र बरोबर असणे वेगळे आणि घरात तशी पंगत होणे वेगळे. आईकडून होकार मिळण्यावरच पुढचे सारे अवलंबून होते.
कराडला आल्यानंतर मी कोणती जबाबदारी घेऊन आलो आहे, हे आईला जरा भीत-भीतच सांगितले. क्षणार्धात तिने होकार दिला. 'विठ्ठल रामजी यांना व हरिजन मित्राला आनंदाने आपल्याकडे येऊ द्या.' असे ती जेव्हा म्हणाली, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.
श्री. शिंदे यांनी स्वतः तिला याबद्दल विचारले, तेव्हा ती माउली म्हणाली,
'मला सारी मुलं सारखीच. त्यात कसली जातपात?'
कराडच्या बुधवार पेठेत - त्या वेळच्या महारवाड्यात हे नाइट स्कूल श्री. शिंदे यांच्या हस्ते मग सुरू झाले.
दोन-तीन वर्षे आम्ही सर्व मित्र त्या ठिकाणी स्वतः शिकवायला जात असू.
शिंदे यांचा आमच्याकडील तो मुक्काम मोठा बहारीचा झाला. ते स्वतः खूश होऊन परतले.
महर्षि अण्णासाहेब शिंदे यांच्या सार्वजनिक आयुष्याचा परिपोष त्यांच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास, विश्वधर्मापासून सुरुवात होऊन 'समाजसुधारणा, समाजसेवा व राष्ट्रोद्धार' अशा टप्प्यांनी झाला.
तत्कालीन महाराष्ट्रात समाजसुधारणेच्या ज्या ज्या चळवळी झाल्या, त्यांत महर्षि शिंद्यांचे प्रामुख्यांने अंग होते. परंतु त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मौलिक कार्य म्हणजे अस्पृश्यांची त्यांनी केलेली महान सेवा. आपले सर्व जीवन त्यांनी या कार्यासाठी वेचले. जातिनिरपेक्ष बुद्धीने त्यांनी हे कार्य सतत केले. तत्कालीन सरकारचीही या कार्यात त्यांनी सहानुभूती मिळविली. एवढेच नव्हे, तर सतत प्रयत्न करून राष्ट्रीय सभेलाही हे कार्य हाती घेण्यास त्यांनी प्रवृत्त केले. या कार्याचा पुढे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली प्रचंड वृक्ष फोफावला.
महर्षि शिंद्यांनी आपल्या हयातीत केलेली धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय क्षेत्रांतील कामगिरी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात अद्वितीय गणली जाईल. इतक्या निरपेक्ष, निरलस व तळमळीने काम करणा-या एका थोर समाजसेवकाचा आदर्श तरुण पिढीपुढे सतत राहावा व त्यापासून त्यांना शक्ती व स्फूर्ती मिळावी, अशी इच्छा मी व्यक्त करतो.