शब्दाचे सामर्थ्य ८४

या शतकाच्या पहिल्या दशकातले त्यांचे राजकीय डावपेच याच तत्त्वावर आधारित होते. १९०७ साली त्यांनी पुढील अर्थाचे विचार व्यक्त केले होते, 'आम्ही क्रांतीच्या मार्गाचा अवलंब करीत आहोत, असे वाटण्याची शक्यता आहे, हे खरे आहे. ही एक प्रकारची क्रांतीच आहे. कारण नोकरशाहीने सरकारसंबंधी ज्या कल्पना लोकांपुढे ठेवल्या आहेत, त्यांत आम्हांला पूर्णपणे बदल घडवून आणावयाचा आहे. ही क्रांती रक्तहीन क्रांती असेल, हे खरे. पण रक्तपात होणार नसला, तरी लोकांना कष्ट करावे लागणार नाहीत, असे समजणे मात्र चुकीचे आहे. कष्ट खूप करावे लागतील. पण कष्ट केल्याखेरीज काहीही मिळवता येणार नाही. क्रांती रक्तहीन असेल; पण कष्ट करावे लागणार नाहीत किंवा तुरुंगात जावे लागणार नाही, असा त्याचा अर्थ नाही.'

१८९७ साली महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता, तेव्हाच टिळकांनी आपली राजकीय चळवळ सुरू केली होती. ब्रिटिश नोकरशाहीवरचा आणि ब्रिटिशांच्या कार्यक्षमतेवरचा लोकांचा विश्वास नष्ट करणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते, म्हणून ते म्हणाले होते, 'ठरवलेल्या धोरणाच्या पलीकडे जायचे नाही, असा नोकरशाहीने निर्धार केला आहे. राज्यकर्त्यांकडून काही अपेक्षा करणे अयोग्य आहे. लोकांनी कितीही तक्रारी केल्या, तरी आपले धोरण बदलावयाला राज्यकर्ते तयार होत नाहीत. तक्रारींचा काही उपयोग नाही. तक्रारींच्या जोडीला स्वावलंबन नसेल, तर तक्रारींना काहीच अर्थ नाही. विनवण्या, विनंती-अर्ज आणि तक्रारी यांना जनतेचा जोरदार पाठिंबा नसेल, तर काहीही उपयोग नाही.'

टिळक लोकशाहीवादी होते व काँग्रेसच्या मदतीने राजकीय चळवळीत मूलभूत बदल घडवून आणावा, असे त्यांचे मत होते. तरुण मंडळींना राजकारणाचे शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कॉलेज सुरू करावे, अशी त्यांची कल्पना होती. काँग्रेसचे स्वरूप 'सामान्य जनतेचा पक्ष' व्हावे, म्हणून ते प्रयत्‍न करीत होते. मवाळांशी झगडा करण्यासाठी त्यांनी सुरत-काँग्रेसचे व्यासपीठ निवडले, त्यांत त्यांना फारसे यश आले नाही. पण त्या काँग्रेसला जे तरुण कार्यकर्ते आले होते, त्यांच्या मनांवर त्याचा जबरदस्त पगडा बसला. तेव्हापासून ते १९१६ मध्ये लखनौमध्ये काँग्रेस काबीज करीपर्यंत त्यांनी काँग्रेसच्या राजकारणात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी सतत कार्य केले.
हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेला राजकीय आघाडीवरून संघटित विरोध करावयाचा, हाच त्यांचा मुख्य हेतू होता. त्याच दृष्टिकोनातून ते सामाजिक प्रश्नांकडे बघत. समाजातील समजुतींवर आणि कल्पनांवर मतभेद झाल्याने काँग्रेसमध्ये दुफळी झाली, तर राजकीय चळवळीचे सामर्थ्य कमी होईल, असे टिळकांना वाटत होते. देशाचे राजकीय सामर्थ्य वाढविण्यासाठी सर्व प्रयत्‍न झाले पाहिजेत, असे त्यांचे मत होते.

समाजसुधारणेच्या बाबतीत पाश्चात्त्य कल्पनांचा आणि पाश्चात्त्य विचारसरणीचा अविचाराने स्वीकार करण्याला त्यांचा विरोध होता. 'गीतारहस्या' मध्ये त्यांनी हिंदू तत्त्वज्ञानावर जे विचार व्यक्त केले आहेत, त्यांतून त्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो.