शब्दाचे सामर्थ्य २५७

आत्ताचा काळ, तसं पाहिलं, तर एका अर्थानं अतिशय उत्पाताचा काळ आहे. लोकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. जाणिवा निर्माण झाल्या आहेत. नव्या जाणिवा निर्माण होत आहेत. नवी पिढी संपूर्ण वेगळ्या पार्श्वभूमीवर वाढली आहे. या परिस्थितीची, प्रेरणांची जाणीव असणारं नेतृत्व देशात आहे, ही आशेची गोष्ट आहे. याच आत्मविश्वासानं आणि आशेनं आंतरराष्ट्रीय व आर्थिक क्षेत्रांतील उत्पाताच्या स्थितीच्या या काळात हजारो वर्षं संकटाला तोंड देऊन उभा राहिलेला भारत स्वतंत्र मार्ग काढील, असा विश्वास वाटतो. उत्पातांतून मार्ग काढण्यासाठी अनेकांची जीवनं त्या तर्‍हेनं गेली आहेत. यापुढेही जातील. शेवटी व्यक्ती महत्त्वाची नाही, समाजजीवन, त्याला प्रेरणा देणारं ध्येय, विचार हे महत्त्वाचं असतं.

मला आठवतं, ३२ साली मी जेव्हा तुरुंगात होतो, त्या वेळी 'स्वातंत्र्य कशासाठी?' या विचारानं आम्हां तरुणांना घेरलं होतं. आम्ही आमच्या जीवनाची व्याख्या त्या वेळी बनवीत होतो आणि आदर्श जीवन ते - ज्यात मानवतेबद्दलचा जिव्हाळा आहे - असं आमचं उत्तर तयार झालं होतं. विचाराची बैठक जमली होती. त्यामुळेच अडचणीत आलो, त्या त्या वेळी थोर व्यक्ती, साधी माणसं, त्यांचे रागलोभ हे घडत राहूनही विचाराची, प्रेरणेची संगत असल्यानं त्यातून बाहेरही पडलो, जीवनात अनेक चढउतार झाले, तुफानं आली, शांतताही निर्माण झाली, सत्तेच्या राजकारणात संघर्ष उफाळले, संशय पसरले.

मी सत्तेवर नव्हतो, तेव्हा आणि आज आहे, तरीही तत्त्वज्ञानाशी मी प्रामाणिक राहिलो आहे. काँग्रेस पक्षाचं बोट धरून माझा राजकीय जीवनाचा गेल्या तीस-चाळीस वर्षांचा प्रवास झाला आणि काँग्रेस हेच माझं जीवन बनलं.

पक्षाच्या आणि व्यक्तीच्या जीवनात मतभेदाचे प्रसंग अनेकदा निर्माण होतात. काँग्रेस पक्षात ते आजवर अनेकदा झाले. तरीपण काँग्रेसचा गंगौघ पुढेच जात राहिला. या गंगौघात मी स्वतःला तरुण वयातच झोकून दिलेलं आहे. ते या प्रवाहाबरोबर सतत आणि सातत्यानं राह्यचं, या प्रतिज्ञेनंच! या गंगौघात खळबळ माजली, त्या प्रत्येक वेळी काठावरील लोक माझ्या निर्णयाकडे बघत राहिले, हे मला माहीत आहे. पण त्यांची प्रत्येक वेळेला निराशा झाली असली पाहिजे. अगदी बत्तीस-चौतीस सालातील समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून तो बावन्न सालातील शेतकरी, कामगार पक्षाच्या स्थापनेच्या वेळीही ! आणि अलीकडे काँग्रेसमध्ये फूट पडली, त्या वेळीही ! देशापुढील आव्हानं ही राज्यकर्त्या पक्षासमोरील आव्हानं असतात. त्यांच्याशी मुकाबला करताना मतभेदाच्या ठिणग्या उघडतातही. पण खरी कसोटीची वेळ तेव्हाच निर्माण होते. दादाभाई नौरोजींपासून आजच्या काँग्रेसकडे पाहत राहिलं, तर तिच्यात कितीतरी परिवर्तन घडलं आहे. यांतली काही परिवर्तनं माझ्या समोरची आहेत. पण एखाद्या पक्षाची दखल घेताना एका प्रश्नाकडे, कुठल्या एका समस्येकडे किंवा कुठल्या एका कार्याकडे पाहून चालत नाही. सर्व प्रकारची समग्रतेनं शहानिशा करावी लागते. अशी शहानिशा मी अनेकदा केली आहे आणि जीवनाचं तत्त्वज्ञान निश्चित केलं आहे.

पण आज मनाला शांतता आहे. समाधान आहे. सत्तेत असलो, किंवा सत्तेच्या बाहेर असलो, तरी माझी वैचारिक संगत कधी सुटणारी नाही. जीवनाची लढाई संपलेली आहे, असं नव्हे. अंतापर्यंत ती चालू राहणार आहे. त्यासाठीच जीवन समर्पित आहे. कोणी रागावतात, कोणी रुसतात. आज तसे असतीलही. पण आपल्याबरोबर कुणी आहे - नाही - सत्तेवर आहे - नाही - हा भाग मला दुय्यम वाटतो. समाधान आहे कामाचं; ज्यांच्यासाठी काम करायचं आणि स्वातंत्र्य मिळविण्याचा ध्यास धरला, त्या कामाचं ! या कामात अनेकांचं सहकार्य मिळालं, त्या सर्वांच्याबद्दल मनात कृतज्ञता आहे. मागे वळून पाहताना असं दिसतं, की कोणाबद्दल मनात असूया नाही, राग नाही. आहे, ते समाधान. केलेल्या कामाचं-कराव्या लागणा-या कामाचं ! सातव्या मजल्याचा चढ त्यासाठीच चढतो आहे, सहा दशकं मागे टाकून सत्तरीकडे निघालेला मी, मागे वळून पाहतो, तेव्हा विचाराची संगत, ज्ञान ही माझी जीवनाची प्रेरणा आहे. आणि सामान्य दलिताबद्दलचा जिव्हाळा हा माझा साथी आहे. हेच माझं समाधान, आजचं-उद्याचं.