शब्दाचे सामर्थ्य १८६

जनसंघ, रा. स्व, संघावर मी टीका करताच, श्री. एस्. एम्. जोशी यांच्यासारखे राजकारणी विचारवंत 'म्हणजे ब्राह्मण समाजावरच ना ही टीका?' असे स्वतःचे विधान त्याला जोडून पुढे सरसावतात. याला काय म्हणावे ! श्री. एस्. एम्. जोशी यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे. परंतु माझ्या भाषणावरचे असे हे भाष्य जोशीबुवा वा त्यांचे सहकारी करीत आहेत. यातल्या वैयक्तिक बदनामीची मला चिंता वाटत नाही. पण या मंडळींनाच महाराष्ट्रातील निवडणूक - प्रचाराला जातीय स्वरूप द्यावयाचे आहे, की काय, अशी चिंता मनात निर्माण होते आणि खेद वाटतो.

वस्तुतः महाराष्ट्रातले सार्वजनिक जीवन गेल्या पाच शतकात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादापासून मुक्त झाले आहे. माझ्या थोर मित्रांना मी विनंती करेन की, मी जे उच्चारले नाही, माझ्या मनात जे नाही, त्याचा आरोप करून कृपया माझ्यावर अन्याय करू नका. माझी शक्ती कमी व्हावी, ही त्यांची इच्छा मी समजू शकतो. परंतु त्यासाठी या मार्गाचा अवलंब कशाला? एका चांगल्या पद्धतीने सार्वजनिक जीवन पुढे जात असताना, ते जीवन निवडणुकीच्या स्वार्थासाठी म्हणून मलिन करू नका, एवढेच मी म्हणेन. जातीय विचार हा माझ्या जीवनात अशक्य आहे, हे काय या मंडळींना माहिती नाही? खरे म्हणजे, माझ्या खासगी जीवनातल्या गोष्टींची सार्वजनिकरित्या वाच्यता मी करू नये. तसे सांगण्याची माझ्यावर कोणी वेळही आणू नये. परंतु आरोप केले जातात, तेव्हा खंत वाटते.

महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की, मी अगदी गरीब स्थितीत असताना शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी गाव सोडून बाहेर जावे लागले, परंतु जेथे गेलो, तेथे राहण्यासाठी वसतिगृह निश्चित करताना मी दहा वेळा विचार केला. जातीय नावावर चालणारी वसतिगृहे तेथे होती. सर्व सोयी-सवलती तयार होत्या. परंतु जातीय नावावर चालणा-या वसतिगृहात शिक्षणासाठी राहायचे काय, असा सवाल माझ्यासमोर निर्माण झाला आणि अखेरीस अशा वसतिगृहात राहायचे माझ्या मनाने नाकारले. जिथे कुठे लहान खोली मिळाली, तिथे राहिलो आणि शिक्षण घेतले. योगायोग असा, की त्या लहान खोलीत मला जोडीदार मिळाला, तो एक माझा ब्राह्मण मित्र.

गरीब घरातल्या शेतक-यांशी, हरिजन वर्गातल्या मंडळींशी माझे जेवढे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तेवढेच पुढारलेल्या ब्राह्मण वर्गातल्या लोकांशी आहेत. जनसंघ आणि रा. स्व. संघ यांच्याशी राजकीयदृष्ट्या मतभेद असले, तरी त्यांच्यापैकी अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इतकेच कशाला, मनातले दुःख कुणाला सांगायचे ठरवले, तर चारांतले तीन ब्राह्मण असतात. हरिजन, मुसलमान, लिंगायत, ब्राह्मण अशा सा-याच जाती-जमातींबद्दल माझ्या मनात जिव्हाळ्याच्या भावना आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रात कोणी जातीय वाद फैलावण्याचा प्रयत्‍न करणार असतील, तर जीव पणाला लावून महाराष्ट्रातील जातीयवादाविरुद्ध मी उभा राहीन, असा माझा पण आहे.

थोडे मागे वळून पाहिले, इतिहासाची पाने उलटली, तर रा. स्व. संघावर टीका करणारे कोण आढळतात? रा. स्व. संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे, ही टीका प्रथम सेवा दलाच्या गोटातून केली गेलेली आहे. सेवा दलाच्या मार्गदर्शकांना ही माहिती असावी, असलीच पाहिजे.