शब्दाचे सामर्थ्य १८३

गरज अशासाठी आहे की, देशातील प्रमुख सत्तेचे, कारभाराचे तारू दिशाहीन असलेल्यांच्या हाती गेले आहे. लोकांची गा-हाणी वाढत आहेत. गरीब, हरिजन, शेतकरी, कामगार, मजूर अस्वस्थ आहेत. या सर्वांना दिलासा देण्याचे आणि त्यांची गार्‍हाणी ही आपली स्वतःची गा-हाणी समजून उभे राहण्याचे काम करावे लागणार आहे. लोकांच्या दैनंदिन गा-हाण्यांनुसार कामगारांत, मजुरांत, शेतक-यांत, आदिवासींत प्रत्यक्ष जाऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काम करावे लागेल. त्यासाठी कामाची शिस्त सांभाळून कार्यक्रमाची मांडणी केली पाहिजे. अशिक्षितांच्या रोजगारीचा प्रश्न आहे, तसा सुशिक्षितांच्या रोजगारीचा प्रश्न तितकाच तीव्र असल्याने त्यासाठी वेगवेगळे काम सातत्याने करावे लागेल. जसा काळ जाईल, तसे हे प्रश्न अधिक सूक्ष्म बनतील. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या वागण्यात आणि बोलण्यात टोकदारपणा आणण्याची गरज आहे. विचारांचे वेगवेगळे संस्कार माणसावर होत राहतात. परंतु कार्यकर्त्याने पक्षासाठी एकदा दिलेल्या निष्ठा त्या विचाराधिष्ठित असतील, तर विचलित होऊ द्यावयाच्या नसतात. राजकीय बदलत्या परिस्थितीमुळे वैचारिक संघर्ष व वादळे अधूनमधून उठतात. त्यांपासून काही शिकावेही लागते. पण त्यांच्या दडपणाखाली मी स्वतः माझ्या पक्षावरील निष्ठांपासून कधी ढळलो नाही. काँग्रेस पक्षातच आहे आणि अखेरपर्यंत असेन. माझी ती उमेद आजही अभंग आहे.

देशातील नव्या परिस्थितीच्या संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निश्चित कार्यक्रमाचे बोट धरून ठामपणे उभे राहावे, असे मी सुस्पष्टपणे सांगतो आणि त्याच वेळी त्याची कारणमीमांसा करताना आजच्या सत्ताधा-यांच्या उणिवांचा परखडपणे समाचार घेतो, तेव्हा या आक्रमकतेचा, स्वतःला विचारवंत मानणारेही चुकीचा अर्थ लावून लोकांची मने कलुषित बनविण्याच्या प्रयत्‍नात असतात, याची मला जाणीव आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याखेरीज मी काय करणार! जनता पक्षासारख्या एका दिशाहीन असलेल्या पक्षाविरुद्ध जनतेला जागे करणे, या देशाचे तारू जनता पक्षाच्या हातांत राहणे कसे धोक्याचे आहे, याची कारणमीमांसा मांडणे यात चूक काय? मी आक्रमक भूमिका स्वीकारतो, याचा अर्थ जनता पक्षाच्या उणिवा, स्पष्टपणे, कोणाचा मुलाहिजा न ठेवता बोलून दाखवतो. परंतु माझ्या या कृतीचा राजकीय पातळीवरून प्रतिवाद करण्याचे टाळून, ज्यांच्या मनांत माझ्याविषयी पूर्वग्रह आहेत, लिहिण्या-बोलण्यांत विकृतता आहे, त्यांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला, तर त्यांची कीव न करावी, तर काय! या संदर्भात काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांचे स्वरूप पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज आहे, असे मला वाटते.

काँग्रेस पक्षाचे स्वरूप हे राष्ट्रीय आंदोलनाच्या चळवळीचे स्वरूप राहिलेले आहे. राष्ट्रीय चळवळीत सर्वच समाज सामील होता, हे त्याचे कारण आहे. या पक्षाचा जो कार्यक्रम आहे, संघटनेची आजची रचना आहे, वस्तुस्थिती आहे, ती पहिल्यावर काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्ष संबोधणेच सयुक्तिक ठरते.

काँग्रेस पक्षाला कोणी बहुजन समाजाचा पक्ष म्हणूनही संबोधतात. 'बहुजन' हा शब्द मी 'मासेस्' या अर्थाने वापरतो. बहुसंख्य समाज म्हणजे अमुक एका जातीचा समाज, असा त्याचा अर्थ नव्हे. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रांतात बहुजनसमाज या शब्दाला एक विशिष्ट, मर्यादित अर्थ प्राप्त करून दिला गेला आहे. काही विचारवंतांना या शब्दांतून तसा मर्यादित अर्थ काढण्याची खोड आहे, एवढेच फार तर त्या संदर्भात मी म्हणू शकेन. परंतु मी स्वतः तरी 'बहुजन' शब्दाचा अर्थ 'मासेस्' असाच केला आहे आणि आजही तोच अर्थ कायम आहे.