शब्दाचे सामर्थ्य १८९

हिंदुस्थानातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकगीतांशी त्याचा काही संबंध आहे किंवा कसे, याचा विचार करण्याची गरज आहे. बाहेरच्या देशांतील त्या त्या काळातील लोकसाहित्याचा आमच्या लोकसाहित्याशी काही संबंध जुळतो का, हेही पाहण्याची गरज आहे. कारण मला वाटते, भाषेचा अलंकार वेगळा असला, तरी त्या त्या काळातील लोकजीवनामध्ये बरेचसे साम्य असण्याची शक्यता आहे. कारण लोकसाहित्याचा महत्त्वाचा गाभाच असा की, लोकांनी त्यामध्ये स्वीकारण्यासारखे म्हणून काही जिंवत असे जरूर असते.

आमची अशी एक समजूत आहे की, खेडेगावामध्ये लिहिलेले, बोललेले ते लोकसाहित्य, अशी काही तरी ढोबळ चुकीची व्याख्या केली जाते. फार तर असे वर्णन करीन, की ज्या लोकजीवनाने त्यातील काहीतरी सौंदर्यस्थळांमुळे, त्यातील काहीतरी शहाणपणामुळे जे स्वीकारले आणि जे सर्वांनी मान्य केले, असा त्यातील जो गाभा, तेच शेवटी लोकसाहित्य होऊन बसले. लोकसाहित्यामध्ये एकतर गाण्याचा अगर नृत्याचाही भाग असतो. लोकगीत हे थोड्या लोकांनी गायचे आणि जास्त लोकांनी ऐकायचे, असे नसते. लोकसाहित्यामध्ये, लोकगीतामध्ये किंवा लोकनृत्यामध्ये एक सेन्स ऑफ ऑडिटोरिम ज्याला आपण म्हणू, त्याची आवश्यकता असते; म्हणजे सर्वांनी त्यात भाग घ्यावा. अशी परिस्थिती असणे - म्हणजेच ऐकणारे कुणीच नाही, पाहणारे कुणीच नाही, सगळे काम करणारे, सगळे गाणारे, सगळे नाचणारे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. मला वाटते. नंतर त्यातील निपुणता (स्पेशलायझेशन) वाढत गेली आणि गाणारे थोडे व ऐकणारे जास्त, तर समजणारे कमी, असे शेवटी-शेवटी व्हावयाला लागले असावे. हा कदाचित या स्पेशलायझेशनचा दोष असेल. तेव्हा लोकसाहित्यातील हा एक विचारात घेण्यासारखा भाग आहे. लोकसाहित्याबाबत हा वेगळा असा अभ्यासाचाही विषय होऊ शकेल. मला वाटते, महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टीने अधिक प्रयत्‍न करण्याची गरज आहे.

नृत्याच्या क्षेत्रात, मला कबूल केले पाहिजे की, महाराष्ट्राने आपल्या जीवनामध्ये काहीतरी आखले पाहिजे. अजूनही काहीतरी आमच्याजवळ आहे, असे बाहेरच्या लोकांना पटविण्याकरिता आम्ही दाखवू शकलो नाही, ही गोष्ट कबूल केली पाहिजे. या कामी कोणा तरी दोन-चार माणसांची कमिटी नेमून सगळेच काम त्यांनी केले पाहिजे, असे म्हणणेही बरोबर होणार नाही. आमचे लोकजीवन जर आम्हांला समजावून घ्यायचे असेल, आमचे जीवन इतरांना समजावून द्यायचे असेल, इतरांच्या लोकजीवनाशी आमचे काही तर साधर्म्य आहे, याची आम्हांला आणि इतरांना प्रचीती यायची असेल, तर त्यातला चांगला भाग आम्हांला शोधला पाहिजे. तो शोधायचा प्रयत्‍न आम्ही केला पाहिजे. आज त्याची गरज आहे. त्या दृष्टीने काही माणसे प्रयत्‍न करीत आहेत. पण कुठेतरी अजून अपुरेपणा वाटतो आहे. कुठेतरी काही तरी चुकतेय् ते पाहण्याची गरज आहे, मी आपणांस सांगू इच्छितो. कारण या प्रयत्‍नामध्ये आणखी मूलग्राही असा विचार करण्याची गरज आहे. या प्रयत्‍नांमध्ये अजूनही कुठेतरी कमतरता आहे, असे वाटत असेल, तर ती कमतरता तपासून पाहण्याची गरज आहे; हे अंगीकृत काम जे होत असते, ते काम पाच-दहा वर्षांची असेसमेंट करून तपासून घेण्याची जी आपणांमध्ये प्रवृत्ती आहे, ती फार महत्त्वाची आहे. मी तर नेहमीच सांगतो की, निव्वळ राजकारणात त्या गोष्टीची गरज आहे, असे नव्हे, तर ते नेहमीच्या व्यक्तिगत जीवनामध्येही त्याची गरज आहे; आणि ती गोष्ट म्हणजे आत्मटीका, सेल्फ क्रिटिसिझम, आज तिची गरज आहे. ही गरज अशासाठी की, आपण पाच-दहा वर्षे खपून जे काम केले, त्या कामाने प्रगती किती केली, किती क्षेत्रांत ती झाली, त्याची पाहणी करण्याची गरज आहे. त्याशिवाय आमचे काम अधिक प्रगतीने आम्हांला पुढे नेताच येणार नाही. मी या क्षेत्रात काम करणा-या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. विशेषतः, डॉ. सरोजिनी बाबरांना. त्या पीएच्. डी. झाल्यापासून त्यांनी त्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतले आहे. फार थोडी माणसे इतक्या ध्येयवादाने काम करतात.